उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये नव्याने लग्न केलेल्या एका २८ वर्षीय तरुणाने लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी मित्रांच्या सांगण्यावरून व्हायग्राच्या गोळ्या घेतल्या. मात्र, उत्साहाच्या भरात या तरुणाने जास्त गोळ्या खाल्ल्याने त्याला जवळपास २० दिवस लैंगिक अवयवांशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागला. अखेर डॉक्टरांना त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. यामुळे तात्कालिक प्रश्न सुटला, मात्र, या तरुणावर त्याचा आयुष्यभरासाठी परिणाम होणार आहे. याच पार्श्वभूमीवर व्हायग्राचं औषध नेमकं काय आहे? आणि त्याचं अतिसेवन केल्याने नेमका काय दुष्परिणाम होतो यावरील खास विश्लेषण…

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

ज्या घटनेमुळे सध्या व्हायग्राच्या अतिसेवनाच्या दुष्परिणामांची चर्चा सुरू झाली त्या घटनेत संबंधित तरुणाने सामान्य मात्रेपेक्षा चारपट अधिक व्हायग्राचा डोस घेतला होता. वैद्यकीय अहवालात तरुणाने एका दिवसात २०० एमजी डोस घेतला होता. त्यानंतर या तरुणाच्या लैंगिक अवयवांना कोणत्याही लैंगिक उत्तेजनेशिवाय आलेली ताठरता तब्बल २० दिवस काय राहिली. यानंतर तरुणाला रुग्णालयात दाखल करून शस्त्रक्रिया करण्याची नामुष्की आली. याशिवाय या तरुणाला आयुष्यभर सामोरं जावं लागेल असा दुष्परिणामही झाला.

व्हायग्रा औषध नेमकं कसं काम करतं?

उच्च रक्तदाबावरील औषध शोधत असताना लक्षात आलेल्या दुष्पारिणामांचा अभ्यास करताना व्हायग्रा औषधाचा शोध लागला. यामुळे पुरुषांमधील लैंगिक अवयवांच्या ताठरतेविषयीच्या आजारावर उपचार करणं शक्य झालं. यानंतर या औषधाची मोठी बाजारपेठ निर्माण झाली. जगभरात डॉक्टरांनी सुचवल्याप्रमाणे या औषधाचं सेवन केलं जातंय.

पुरुषाच्या शरीरात संप्रेरक (Enzyme) लैंगिक अवयवातील रक्तवाहिन्यांचं आकुंचनाला गती देतं. व्हायग्रा नेमक्या याच संप्रेरकाचा काम थांबवून लैंगिक अवयवांचं आकुंचन होणं बंद करतं. व्हायग्रा औषध सध्या बाजारात २५ एमजी, ५० एमजी आणि १०० एमजी गोळ्यांच्या स्वरुपात उपलब्ध आहे. २४ तासात याची एकच गोळी खाण्याचा सल्ला अनेक डॉक्टर्स देतात. व्हायग्रा गोळीचा परिणाम साधारणपणे २-५ तासांच्या दरम्यान राहतो. गोळ्यांचा परिणाम विविध घटकांवर अवलंबून असतो.

व्हायग्राच्या अतिसेवनाचे परिणाम काय?

व्हायग्रा गोळी सामान्य मात्रेत खाल्ल्यानंतर इतरही दुष्परिणाम जाणवू शकतात. त्यात डोकेदुखी, चेहरा लाल पडणे, नाक बंद झाल्यासारखं वाटणे या लक्षणांचा समावेश आहे. हे सर्वसामान्य दुष्परिणाम असून काही काळाने दूर होतात. मात्र, डोकं हलकं वाटणं हे त्यातील काहीसं काळजीत टाकणारं लक्षण आहे. यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. मात्र, काही वेळाने पुन्हा शरीर सामान्य स्थितीत येते.

हेही वाचा : विश्लेषण : हृदयविकाराचा झटका आणि हृदय बंद पडणे यात फरक काय?

दुसरीकडे व्हायग्रा गोळ्यांचं अतिसेवन झाल्यास पुरुषाच्या लैंगिक अवयवाची ताठरता ४ तासांपेक्षा अधिक काळ राहते. यामुळे अवयवाच्या संवेदनशील उतींचं (tissues) नुकसान होऊ शकतं. यावर तातडीने उपचार न केल्यास लैंगिक अवयवाला कायमस्वरुपी नुकसानही होऊ शकते. व्हायग्रा गोळ्यांचं अतिसेवन केल्यास गोळ्या खाणाऱ्या व्यक्तीचा रक्तदाब अचानक कमी होतो. त्याचा परिणाम थेट ह्रदयाच्या कार्यावर होतो. गंभीर परिणाम म्हणजे ह्रदय विकाराचा झटका देखील येऊ शकतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is viagra tablets and what are the side effects of its overdose pbs
First published on: 11-06-2022 at 19:04 IST