Trump on Indias Apache helicopter order अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या ऑगस्टमध्ये रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी भारतावर अतिरिक्त २५ टक्के शुल्क लादले होते, ज्यामुळे एकूण कर ५० टक्क्यांवर पोहोचला. या कराचा फटका भारताला बसतोय. आता हे शुल्क वाढवून ५०० टक्के केले जाणार असल्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी द्विपक्षीय ‘रशिया सॅंक्शन्स बिल’ला (रशियावरील निर्बंधांचे विधेयक) पाठिंबा दिल्यानंतर ही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशातच ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या अपाचे हेलिकॉप्टर खरेदीबाबत खळबळजनक विधान केले आहे, जो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ट्रम्प नक्की काय म्हणाले? नेमकी वस्तुस्थिती काय? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…

ट्रम्प नक्की काय म्हणाले?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीकडील विधानांमुळे भारताबरोबरच्या तणावात भर पडली आहे. भारताने अमेरिकेकडे ६८ अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरची ऑर्डर दिल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर या हेलिकॉप्टरच्या वितरणास इतका उशीर झाला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विलंबावर चर्चा करण्यासाठी आपली भेट घेण्याची इच्छा व्यक्त केल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला आहे. मात्र, वस्तुस्थिती काही वेगळीच असल्याचे समोर येत आहे. रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्राहम एका अशा विधेयकाला पाठिंबा देत आहेत, ज्यानुसार रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिकेकडून ५०० टक्क्यांपर्यंत कर लादला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवरच ट्रम्प यांचे हे विधान आले आहे.

वॉशिंग्टनमधील रिपब्लिकन रिट्रीटमध्ये बोलताना ट्रम्प यांनी दावा केला की, “भारताने अपाचे हेलिकॉप्टर्स मागवले होते आणि त्यांना ते पाच वर्षांपासून मिळाले नाहीत. पंतप्रधान मोदी मला भेटायला आले.” ‘सर, प्लीज मी तुम्हाला भेटू शकतो का?,’ असे मोदी यांनी विचारल्याचा दावाही त्यांनी केला. पुढे बोलताना ट्रम्प यांनी मोदींबरोबर असलेल्या चांगल्या संबंधांबद्दलही विधान केले. ते म्हणाले “माझे त्यांच्याबरोबर (मोदी) अत्यंत चांगले संबंध आहेत.” मात्र, ट्रम्प यांनी दावा केला की पंतप्रधान मोदी हे टॅरिफच्या मुद्द्यावर नाराज आहेत. “ते माझ्यावर फारसे खूश नाहीत, कारण तुम्हाला माहिती आहे, सध्या त्यांना खूप जास्त टॅरिफ भरावे लागत आहेत; कारण त्यांनी रशियाकडून तेलाची खरेदी थांबवली नाही.”

भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे मोठ्या प्रमाणावर कमी केल्याचा उल्लेखही त्यांनी केला. ट्रम्प म्हणाले की, “त्यांनी (भारताने) रशियाकडून तेल खरेदी मोठ्या प्रमाणात कमी केली आहे.” ट्रम्प पुढे म्हणाले, “आयात शुल्कामुळे आपण श्रीमंत होत आहोत, हे सर्वांना समजेल अशी आशा आहे. मला हे सांगायचे आहे की, या आयात शुल्कामुळे ६५० अब्ज डॉलर्स (सुमारे ५८,५३,००० कोटी रुपये) आपल्या देशात येणार आहेत.”

नेमकी वस्तुस्थिती काय?

तथ्य तपासले असता ट्रम्प यांचा दावा कोणत्याही पुराव्याविना असल्याचे स्पष्ट होते, असे वृत्त ‘फर्स्टपोस्ट’ने दिले आहे. भारताने ‘बोइंग AH-64E अपाचे गार्डियन’ हेलिकॉप्टर दोन टप्प्यांत खरेदी केली आहेत. पहिला करार सप्टेंबर २०१५ मध्ये बराक ओबामा यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या शेवटी झाला होता. या करारानुसार, भारताने भारतीय वायुसेनेसाठी (आयएएफ) २.२ अब्ज डॉलर्स (१९,८०९ कोटी रुपये) किमतीची २२ अपाचे हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी स्वाक्षरी केली होती. ही हेलिकॉप्टर वेळेवर वितरित करण्यात आली आणि ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात २०२० पर्यंत शेवटची युनिट्स भारतात पोहोचली.

त्यानंतर ती हवाई दलात सामील करण्यात आली. दुसरा करार फेब्रुवारी २०२० मध्ये ट्रम्प यांच्या भारत भेटीदरम्यान झाला, ज्यामध्ये भारतीय लष्कराच्या एव्हिएशन कॉर्प्ससाठी सहा अपाचे हेलिकॉप्टरचा समावेश होता. हा करार ६०० ते ८०० दशलक्ष डॉलर्सच्या (५,४०२–७,२०३ कोटी रुपये) दरम्यान होता. याच कराराच्या वितरणात वारंवार विलंब झाला. मात्र, तो करारही आता पूर्ण झाला आहे. माहितीनुसार, डिसेंबर २०२५ पर्यंत अमेरिकेने सर्व २८ अपाचे हेलिकॉप्टर भारताला सुपूर्द केली आहेत. गेल्या काही महिन्यांत ट्रम्प यांनी भारताबाबत केलेल्या अनेक बिनबुडाच्या दाव्यांपैकी हा एक आहे.

भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे कमी केल्याचा दावाही त्यांनी केला. आता त्यांनी (भारताने) रशियाकडून तेल खरेदी करणे मोठ्या प्रमाणात कमी केले आहे,” असे ट्रम्प म्हणाले. २०२५ मध्ये व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर ट्रम्प यांनी एप्रिलमध्ये ‘लिबरेशन डे’ टॅरिफ जाहीर केले. त्यांनी ऑगस्टमध्ये भारतावर २५ टक्के शुल्क लावले आणि त्यानंतर रशियन कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल आणखी २५ टक्के कर लादला. मे महिन्यात झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीचे श्रेयही ट्रम्प यांनी घेतले होते.

परंतु, भारताने वारंवार स्पष्ट केले आहे की यामध्ये कोणताही तिसरा देश सामील नव्हता आणि पाकिस्तानी डीजीएमओने आपल्या भारतीय समकक्षाशी संपर्क साधल्यानंतर ही शस्त्रसंधी झाली होती. ट्रम्प यांच्या विधानावर भारताने अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की मोदी इतर जागतिक नेत्यांचा किंवा राष्ट्रप्रमुखांचा उल्लेख करताना ‘सर’ हे संबोधन वापरत नाहीत.

‘सर’ शब्दावरून वाद

ट्रम्प यांनी अनेकदा अशा काल्पनिक गोष्टी सांगितल्या आहेत, त्यामध्ये त्यांनी गव्हर्नरपासून ते अमेरिकन जनरलपर्यंत सर्वांनी त्यांना ‘सर’ म्हणून संबोधल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी एकदा असा दावा केला होता की, त्यांच्या कार्यकाळाच्या पहिल्या आठवड्यात एक अमेरिकन जनरल त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, “सर, आमच्याकडे दारूगोळा नाही.” २०१७ मध्ये त्यांनी असाही दावा केला होता की, त्यांच्या एका विधेयकाच्या स्वाक्षरीच्या वेळी शेतकरी रडत होते. “एक शेतकरी म्हणाला सर, तुम्ही माझे आयुष्य मला परत दिले, तुम्ही माझी मालमत्ता मला परत दिली,” असा ट्रम्प यांचा दावा होता.

मात्र, ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती आणि असा कोणताही प्रकार तिथे घडला नव्हता. तज्ज्ञांनी बऱ्याच काळापासून अशा दाव्यांच्या सत्यतेवर शंका उपस्थित केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, जेव्हा ट्रम्प ‘सर’ शब्दाचा वापर करतात, तेव्हा तो एक संकेत असतो की ते बढाई मारत असतात किंवा पूर्णपणे बनावट घटना सांगत असतात.