उन्हाळ्याचे दिवस म्हणजे प्रचंड उकाडा आणि गर्मी. या काळात गारेगार हवा देणारा एसी म्हणजे अनेकांना अक्षरश: देवदूतच वाटावा इतकी ही गर्मी असह्य होत असते. या पार्श्वभूमीवर आता अनेक घरांमध्ये आणि बहुतांश कार्यालयांमध्ये एसी अर्थात एअर कंडिशनर्स बसवलेले असतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की या एसींमध्ये खोली थंड ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे शीतक अर्थात गॅसेसचा वापर करण्यात आलेला असतो? शिवाय यापैकी काही गॅसेस हे पर्यावरणासाठी घातक देखील असतात. ज्यांमुळे वातावरणातील अत्यंत महत्त्वाच्या अशा ओझोनच्या थरावर देखील विपरीत परिणाम होत असतो. या लेखातून आपण आपल्या घरातल्या किंवा कार्यालयातल्या एसीमध्ये वापरण्यात येणाऱ्या शीतकांचे प्रकार आणि परिणाम जाणून घेऊयात!

आपल्या सर्वांनाच एसीमध्ये वापरण्यात येणाऱ्या या शीतकांची माहिती असणं आवश्यक आहे. जेणेकरून अजाणतेपणी आपण पर्यावरणाची हानी करण्यापासून वाचू शकू. तसेच, त्यानुसार आपल्या एसीची देखभाल, दुरुस्ती आणि त्यात सुधारणा करण्याबाबत आपल्याला निर्णय घेणं देखील सोपं होईल. सुरुवातीला बहुतेक एसींमधील शीतके सीएफसी अर्थात क्लोरोफ्लुरोकार्बनचं (Chlorofluorocarbons) उत्सर्जन करत असत. या वायूमुळे वातावरणातील ओझोनच्या थरावर विपरीत परिणाम होत असल्याचं निदर्शनास आलं. यानंतर एसी उत्पादकांनी वातावरणावर परिणाम करणारे सर्व शीतकं वापरातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

शीतके म्हणजे काय?

कोणत्याही एसीमधील शीतक (Refrigerant/Coolant) हे त्या खोलीतील उष्णता बाहेर फेकण्याचं काम करतो. या संपूर्ण प्रक्रियेसाठी ही शीतकं स्वत:च्या स्वरूपामध्ये बदल करत असतात. खोलीतील उष्णता जेव्हा ते शोषून घेतात, तेव्हा द्रवरूपात असलेली ही शीतकं वायूरुपात बदलतात. त्यानंतर जेव्हा एसीमधला कॉम्प्रेसर ही शीतकं पुन्हा कॉम्प्रेस करतो, तेव्हा ते पुन्हा द्रवरुपात येतात. आपल्या एसीसाठी सर्वोत्तम शीतक निवडण्यासाठी काही विशिष्ट गोष्टी पाहायला हव्यात. त्याचे थर्मोडायनॅमिक घटक, त्यातील विषारी घटक किंवा त्याची ज्वलनशीलता. सामान्यपणे अनेक प्रकारचे द्रव्य शीतक म्हणून वापरले जातात. पण २०व्या शतकामध्ये सीएफसी सर्वाधिक वापरलं जाणारं शीतक ठरलं होतं.

शीतकांचे प्रकार

क्लोरोफ्लुरोकार्बन (CFC) आणि हायड्रोक्लोरोफ्लुरोकार्बन (HCFC) – सुरुवातीच्या काळात सीएफसीचाच बहुतांश एसींमध्ये वापर केला जात होता. याला फ्रिऑन असं देखील म्हणतात. नंतर सीएफसीच्याऐवजी एचसीएफसीचा २१व्या शतकाच्या सुरुवातीपासून वापर सुरू करण्यात आला. आर-२२ हे सर्वाधिक वापरलं जाणारं हायड्रोक्लोरोफ्लुरोकार्बन आहे. एका अहवालानुसार २०१६मध्ये भारतातील ५० ते ६० टक्के एसींमध्ये एचसीएफसीचा वापर करण्यात आला होता. एचसीएफसी हे सीएफसीपेक्षा थोड्याफार प्रमाणात चांगले मानले जातात. कारण एचसीएफसीमध्ये देखील पर्यावरणाला हानीकारक ठरू शकेल अशा क्लोरीनचा समावेश आहे. भारत सरकारने २०३०पर्यंत एचसीएफसी शीतकांचा देखील वापर पूर्णपणे बंद करण्याचं नियोजन केलं आहे.

विश्लेषण : यंदा मान्सूनमध्ये सरासरी पावसात घट होणार म्हणजे नेमकं काय होणार?

हायड्रोफ्लुरोकार्बन – कालांतराने उत्पादकांनी एचसीएफसीमधून क्लोरीन बाजूला काढून एचएफसी अर्थात हायड्रोफ्लुरोकार्बन हे नवीन शीतक तयार केलं. एचएफसीमुळे ग्लोबल वॉर्मिंगचा धोका एकीकडे असताना ओझोनच्या थरावर परिणाम करणाऱ्या एचसीएफसीपेक्षा हे शीतक अधिक चांगलं असल्याचं मानलं जातं. आर-४१०ए हे सर्वाधिक वापरलं जाणारं एचएफसी शीतक आहे. आर-४१०ए हे आर-२२ पेक्षा चांगलं शीतक मानलं जातं. कारण यामुळे ओझोनच्या थराची हानी तर रोखली जातेच, मात्र त्यासोबतच विजेच्या दृष्टीनं देखील ते अधिक उपयुक्त आहे. याशिवाय आर-३२ आणि आर-१३४ए हे एचएफसीचे इतर दोन प्रकार देखील बाजारात उपलब्ध आहेत. आर-४१०ए पेक्षा आर-३२ मुळे ग्लोबल वॉर्मिंगचा धोका कमी आहे.

हायड्रोकार्बन – आर-२९० आणि आर-६००ए यांची वैज्ञानिक नावं अनुक्रमे प्रोपेन आणि आयएसओ-ब्युटेन अशी आहेत. भारतीय बाजारपेठेत सध्या उपलब्ध असलेली ही दोन सर्वाधिक पर्यावरणपूरक शीतकं आहेत. ही शीतकं पर्यावरणपूरक, पूर्णपणे हॅलोजनमुक्त आणि सर्वात कमी ग्लोबल वॉर्मिंगचा धोका असणारी आहेत. हायड्रोकार्बन हे आतीज्वलनशील असले, तरी एसी उत्पादक पुरेशी काळजी घेऊन त्यांचा वापर करत असल्यामुळे त्याचा धोका कमी ठरतो. शिवाय, त्यामुळे काही अपघात वगैरे झाल्याची कोणतीही घटना नजीकच्या काळात घडल्याचं समोर आलेलं नाही. त्यामुळे ते वापरासाठी सुरक्षित असल्याचं मानायला हरकत नाही.