Michael Worldwide Box Office-Michael Biopic 2026 Hollywood: मायकल जॅक्सनच्या आयुष्यावर आधारित Michael नावाचा बायोपिक २४ एप्रिल २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात जगभरात साधारण ३१४ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २,६०० कोटी रुपये) कमावून बॉक्स ऑफिसवर विक्रम केला आहे. या चित्रपटात मायकल जॅक्सनची भूमिका त्याचा पुतण्या जाफर जॅक्सन (Jaafar Jackson) याने साकारली आहे. त्याचा मायकल जॅक्सनसारखा हुबेहूब दिसणारा लूक आणि त्याच ताकदीचा डान्स पाहून जगभरातील चाहतेही थक्क झाले आहेत. चित्रपटामुळे मायकल जॅक्सनची गाणी पुन्हा एकदा लोकप्रिय झाली आहेत. मे (२०२६) महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो जागतिक डिजिटल आर्टिस्ट रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला असून टेलर स्विफ्ट आणि बीटीएस (BTS) सारख्या सध्याच्या सुपरस्टार्सना त्याने मागे टाकले आहे. शिवाय, चित्रपटामुळे तरुणांमध्ये मायकलच्या डान्स स्टेप्सचे ‘चॅलेंजेस’ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहेत. थोडक्यात सांगायचे तर, या चित्रपटामुळे ‘किंग ऑफ पॉप’ची जादू पुन्हा एकदा संपूर्ण जगावर पाहायला मिळत आहे.
कोण होता मायकल जॅक्सन?
मायकल जॅक्सन (Michael Jackson) हा जगातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अमेरिकन गायक, गीतकार आणि नर्तक होता. तो ‘किंग ऑफ पॉप’ (King of Pop) या नावाने ओळखला जात होता. त्याचा जन्म २९ ऑगस्ट १९५८ रोजी झाला. त्याने वयाच्या पाचव्या वर्षी त्याच्या भावांबरोबर ‘जॅक्सन ५’ (Jackson 5) या बँडमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. १९८० च्या दशकात तो जागतिक स्तरावर प्रसिद्धीच्या शिखरावर होता. त्याचा ‘थ्रिलर’ (Thriller) हा अल्बम जगातील आजवरचा सर्वाधिक विक्री झालेला अल्बम मानला जातो. मायकल जॅक्सन त्याच्या अनोख्या नृत्यशैलीसाठी प्रसिद्ध होता. ‘मूनवॉक’ (Moonwalk) ही त्याची सिगनेचर असलेली डान्स स्टेप आजही जगभरात लोकप्रिय आहे. त्याचे ‘रोबोट’ आणि ‘अँटी-ग्रॅव्हिटी लीन’ सारखे प्रकार पाहून प्रेक्षक थक्क होत असत. ‘Beat It’, ‘Billie Jean’, ‘Black or White’ आणि ‘Bad’ ही त्याची काही प्रचंड गाजलेली गाणी आहेत. त्याने १५ ग्रॅमी पुरस्कार आणि अनेक ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’ आपल्या नावे केले आहेत. २५ जून २००९ रोजी या ‘किंग ऑफ पॉप’च्या निधनाच्या बातमीने संपूर्ण जग सुन्न झाले. वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी या कलाकाराचा असा अंत होणे, ही केवळ शोकांतिका नव्हती, तर वैद्यकीय नैतिकता आणि ग्लॅमरच्या जगामागच्या विदारक वास्तविकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना होती.

मला थोडे दूध द्या
२५ जून २००९ रोजी लॉस एंजेलिसमधील मायकल जॅक्सनच्या घरात जे काही घडले, त्याने जगाचा इतिहास बदलून टाकला. एका जागतिक सुपरस्टारचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, तर तो वैद्यकीय निष्काळजीपणा आणि औषधांच्या अतिरेकी आहारी जाण्याचा परिणाम होता. “मला थोडे दूध द्या,” हे त्याचे शेवटचे शब्द आजही त्याच्या चाहत्यांच्या काळजात घर करून आहेत.
अखेरची रात्र: नियतीचा क्रूर खेळ
२४ जून २००९ ची रात्र. मायकल जॅक्सन आपल्या आगामी ‘दिस इज इट’ (This Is It) या भव्य पुनरागमन दौऱ्याच्या तालमी करून घरी परतला होता. त्याचे शरीर थकलेले आणि मन अस्वस्थ होते. जॅक्सन गेल्या कित्येक वर्षांपासून एका गंभीर आजाराने त्रस्त होता. तो म्हणजे ‘निद्रानाश’ (Insomnia). त्याला नैसर्गिक झोप येणे कठीण झाले होते. त्याचा वैयक्तिक डॉक्टर कॉनराड मरे (Dr. Conrad Murray) त्याच्यावर उपचार करत होता. त्या रात्री मरेने जॅक्सनला झोप येण्यासाठी व्हॅलियम, लोराझेपाम आणि मिडाझोलम यांसारखी अनेक गुंगीची औषधे दिली. पण जॅक्सनच्या शरीराला या औषधांची इतकी सवय झाली होती की, त्यापैकी कशाचाही परिणाम त्याच्यावर होत नव्हता.

मला थोडे दूध द्या: शेवटची विनंती
सकाळचे १० वाजत आले होते, पण जॅक्सन अजूनही जागाच होता. तो व्याकुळ झाला होता. त्याने डॉक्टर मरेकडे वारंवार एका औषधाची मागणी केली, या औषधला तो प्रेमाने ‘दूध’ (Milk) म्हणायचा. हे ‘दूध’ म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ‘प्रोपोफोल’ (Propofol) नावाचे एक अत्यंत जहाल भूल देणारे औषध (Anesthetic) होते. याचा पांढरा रंग दुधासारखा असल्याने जॅक्सन त्याला दूध म्हणत असे. जॅक्सनने कळवळून विनंती केली, “प्लीज, मला थोडे दूध द्या जेणेकरून मी झोपू शकेन. कारण मला माहीत आहे की, केवळ हेच माझ्यासाठी काम करते.” अखेर मरेने जॅक्सनला २५ मिलीग्राम प्रोपोफोल दिले. जॅक्सन शांत झोपला आणि ती झोप कायमचीच ठरली.
वैद्यकीय क्षेत्रातील भयानक चूक
प्रोपोफोल हे औषध सामान्यतः शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णालयात, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि विशेष मॉनिटरिंग उपकरणांच्या साहाय्याने दिले जाते. ते घरात, कोणत्याही मॉनिटरिंग उपकरणाशिवाय देणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच होते. डॉक्टर मरे काही वेळासाठी खोलीबाहेर गेला आणि जेव्हा परतला, तेव्हा जॅक्सनचा श्वास थांबला होता. जॅक्सनला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. २००९ (ऑगस्ट) साली शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले की, जॅक्सनचा मृत्यू प्रोपोफोल आणि लोराझेपामच्या अतिसेवनामुळे झालेल्या ‘कार्डियाक अरेस्ट’मुळे (हृदयविकाराचा झटका) झाला होता. हा मृत्यू नैसर्गिक नसून तो ‘मनुष्यवध’ (Homicide) असल्याचे घोषित करण्यात आले.
डॉक्टर कॉनराड मरे: रक्षक की भक्षक?
फेब्रुवारी २०१० साली डॉक्टर कॉनराड मरेवर ‘अनावधानाने केलेल्या मनुष्यवधाचा’ (Involuntary Manslaughter) (भारतात याला सदोष मनुष्यवध म्हणतात) गुन्हा दाखल करण्यात आला. खटल्यादरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. मरेला जॅक्सनच्या उपचारासाठी दरमहा १.५ लाख डॉलर्स मानधन मिळत होते. फिर्यादी पक्षाने असा युक्तिवाद केला की, पैशांच्या मोहापायी मरेने वैद्यकीय नीतिमत्ता गुंडाळून ठेवली आणि जॅक्सनच्या जीवाशी खेळ केला. दुसरीकडे, डॉक्टरच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की, जॅक्सनला औषधांचे व्यसन जडले होते आणि मरे खोलीबाहेर असताना त्याने स्वतःहून औषधाचा मोठा डोस घेतला असावा. मात्र, मरेने आवश्यक उपकरणे न ठेवणे आणि जॅक्सनला एकटे सोडणे हा त्याचा सर्वात मोठा गुन्हा ठरला. २०११ साली मरेला दोषी ठरवून चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

ग्लॅमरच्या जगाचा काळा चेहरा
मायकल जॅक्सनचा मृत्यू केवळ एका कलाकाराचा अंत नव्हता, तर तो प्रसिद्धीच्या जगामागील भयंकर दडपणाचा बळी होता. जगाला नाचवणारा हा माणूस स्वतःच्या झोपेसाठी एका डॉक्टरवर आणि जहाल औषधांवर अवलंबून होता. पैसा, प्रसिद्धी आणि यश यांमागे धावताना मानवी शरीर आणि मनाची कशी वाताहत होते, याचे जॅक्सन हे एक जिवंत उदाहरण ठरले.
एका शोकांतिकेची शिकवण
मायकल जॅक्सनच्या निधनाला दीड दशक उलटून गेले असले, तरी त्याच्या अकाली जाण्याचे सावट आजही पॉप जगतावर कायम आहे. त्याचे संगीत आजही जगभरातील लाखो चाहत्यांना प्रेरणा देते, मात्र त्याच्या आयुष्याचा करुण अंत हा जगासाठी एक कायमचा ‘धडा’ ठरला आहे. प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान असलेला माणूस एकाकीपणाच्या किती खोल गर्तेत असू शकतो आणि चुकीचे वैद्यकीय सल्ले एखाद्याचे आयुष्य कसे उद्ध्वस्त करू शकतात, याचेच जळजळीत वास्तव या घटनेतून अधोरेखित होते.
