-निशांत सरवणकर

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा आहे. अलीकडेच खार पोलीस ठाण्यात हल्ला झाला असा त्यांचा आरोप आहे. झेड सुरक्षा व्यवस्था पुरविणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (सीआयएसएफ) मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे  यांनी पत्र लिहून विचारले आहे की, हल्ला झाला त्यावेळी ही सुरक्षा व्यवस्था काय करीत होती? केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानेही कायदा व सुव्यवस्था राखणे ही राज्य वा शहर पोलिसांची जबाबदारी असताना, सोमय्या यांच्यावरील हल्ल्याच्या वेळी मुंबई पोलीस काय करत होते असा प्रतिसवाल केला आहे. अतिमहत्त्वाच्या वा महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा दिली जाते ती त्यांना धोका असल्यामुळेच. मग सोमय्या यांचे सुरक्षा रक्षक हल्लेखोरांना रोखू का शकले नाहीत? काय असते या सुरक्षा रक्षकांची जबाबदारी? विशेष सुरक्षेसाठी कोण पात्र आहे वगैरे मुद्द्यांचा हा ऊहापोह. 

केंद्रीय स्तरावरून कोणती यंत्रणा सुरक्षा पुरविते?  

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी), नॅशनल सिक्युरीटी गार्ड (एनएसजी) इंडो- तिबेटियन बॅार्डर पोलीस (आयटीबीपी), केंद्रीय राज्य राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) या सुरक्षा यंत्रणा देशातील अतिमहत्त्वाच्या वा महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा पुरवितात. 

धमकी असेल तरी प्रत्येकाला सुरक्षा मिळते?

नाही. फक्त अतिमहत्त्वाच्या व्यक्ती ज्या केंद्र सरकारात महत्त्वाच्या पदावर आहेत वा अशा प्रसिद्ध व्यक्ती ज्यांना अशी सुरक्षा पुरविणे आवश्यक आहे, त्यांना ही सुरक्षा पुरविली जाते. वैयक्तिक कोणालाही अशी सुरक्षा शक्यतो दिली जात नाही. सोमय्या (झेड सुरक्षा) मात्र अपवाद ठरले. कंगना राणावत हिला वाय सुरक्षा होती. गृहमंत्री, गृहसचिव यांच्या अध्यक्षतेखालील समिती कोणाला सुरक्षा पुरविता येईल याचा आढावा घेते. इंटेलिजन्स ब्युरो, रिचर्स अँड ॲनालिसिस (रॅा) यांनी दिलेल्या अहवालाच्या जोरावर केंद्राकडून सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतला जातो. संबंधित व्यक्तींना धोका असल्याचे स्पष्ट होताच ही सुरक्षा व्यवस्था पुरविली जाते. 

सुरक्षा पुरविताना काय पाहिले जाते? 

देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री तसेच इतर महत्त्वाचे मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, त्यांचे कुटुंबीय यांना प्रामुख्याने सुरक्षा पुरविली जाते. या सुरक्षेची वेगवेगळी वर्गवारी असते. त्यानुसार केंद्रीय पोलीस आणि कमांडो यांचा सुरक्षा साखळीत समावेश असतो. संबंधित व्यक्तीची सुरक्षा करणे ही या सुरक्षा रक्षकांची जबाबदारी असते. सोमय्या यांच्यावर दोनदा हल्ला होतो आणि त्यांची सुरक्षा यंत्रणा तो रोखू शकतनाही, याबद्दल आश्चर्य वाटते. 

सुरक्षा व्यवस्थेचे काय प्रकार आहेत? 

सुरक्षा व्यवस्थेचे सहा प्रकार आहेत – 

एक्स, वाय, वाय प्लस, झेड, झेड प्लस आणि एसपीजी. 

पंतप्रधान व कुटुंबीयांना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपकडून (एसपीजी) संरक्षण दिले जाते. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एसपीजी या विशेष सुरक्षा यंत्रणेची १९८८मध्ये निर्मिती करण्यात आली. पंतप्रधान, माजी पंतप्रधान व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी या यंत्रणेवर असते. 

उर्वरित पाच प्रकारात एक्स सुरक्षा ही सर्वांत कमी दर्जाची मानली जाते. यामध्ये दोन सशस्त्र पोलीस तैनात असतात. 

वाय सुरक्षा व्यवस्थेत ११ जणांचा समावेश असतो. एक किंवा दोन कमांडो, पोलीस सतत संबंधित व्यक्तींच्या सोबत असतात तर चार सशस्त्र पोलीस २४ तास चक्राकार पद्धतीने सुरक्षा व्यवस्था पाहतात. 

झेड सुरक्षा व्यवस्थेत २२ जणांचा समावेश असतो. पाच- सहा कमांडो, पोलीस सतत सोबत आणि दोन सशस्त्र पोलीस घराबाहेर सुरक्षा देत असतात. या व्यवस्थेत विशेष एस्कॅार्ट कार पुरविली जाते. बाबा रामदेव, आमीर खान व सोमय्या यांना झेड सुरक्षा आहे. 

झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत ५५ जणांचा समावेश असतो. दहा किंवा त्यापेक्षा अधिक कमांडो, पोलीस सतत सोबत आणि घराबाहेरही कमांडो सुरक्षा देत असतात. मार्शल आर्ट तसेच निःशस्त्र असतानाही समोरच्याशी दोन हात करण्याचे खास प्रशिक्षण दिलेले असते.

ही सुरक्षा सशुल्क असते का? 

केंद्र सरकार ज्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा पुरविते ती मोफत असते. मात्र त्यावेळी एखाद्या व्यक्तींचा सुरक्षा व्यवस्था पुरविते तेव्हा केंद्र सरकार शुल्क आकारू शकते. मुकेश अंबानी यांच्या जिवाला धोका असल्यामुळे केंद्र सरकारने त्यांना झेड सुरक्षा दिली. मात्र या सुरक्षा रक्षकांचे वेतन अंबानी यांच्याकडून वसूल केले जाते. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने सुमारे १९ हजार ४६७ जवान (२०१९ अखेर) तैनात केले आहेत. २०१८मध्ये ही संख्या २१ हजार ३०० होती. (स्रोत : ब्युरो ॲाफ पोलीस रिचर्स अँड डेव्हलपमेंट) 

मग सोमय्या यांच्यावरील हल्ल्याच्या वेळी ही सुरक्षा यंत्रणा कुठे होती?

सोमय्या यांना झेड सुरक्षा असून कमांडो सोबत असतानाही हल्ला झाला असेल तर या सुरक्षा व्यवस्थेला काय अर्थ आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. या सुरक्षारक्षकांनी अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचे संरक्षण करताना प्राणाची बाजी लावावी, असेच प्रशिक्षण असते. दहशतवादी हल्ला झाला तर अंगावर गोळ्या झेलण्याची क्षमता असलेले हे सुरक्षा कवच सोमय्या यांच्या गाडीवर आलेली चप्पल वा दगड रोखू शकले नाहीत. त्यामुळे या सुरक्षा कवचातील त्रुटींचा शोध घेणे आवश्यक बनले आहे.