Military force could Trump use against Iran इराणमधील सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांच्याविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. खामेनींच्या विरोधातील आंदोलनांनी आता हिंसक वळण घेतले आहे. अमेरिकेची इराणबद्दलची भूमिका अधिक कठोर होत चालली आहे. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीपासून सत्तेत असलेल्या धार्मिक व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी देशभरातील हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. सुरुवातीला ढासळत्या आर्थिक परिस्थितीमुळे सुरू झालेल्या या आंदोलनांचे आता व्यापक राजकीय संघर्षात रूपांतर झाले आहे.
या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, जर इराणी प्रशासनाने आंदोलकांवरील हिंसक कारवाई सुरूच ठेवली, तर अमेरिका लष्करी हस्तक्षेप करू शकते. १३ जानेवारी रोजी ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्मवरून इराणी आंदोलकांना थेट संबोधित केले आणि लिहिले, “इराणी देशभक्तांनो, आंदोलन सुरू ठेवा आणि मारेकरी व अत्याचार करणाऱ्यांची नावे जपून ठेवा. त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. आंदोलकांची निर्घृण हत्या थांबेपर्यंत मी इराणी अधिकाऱ्यांबरोबरच्या सर्व बैठका रद्द केल्या आहेत. मदत लवकरच पोहोचेल. MIGA!!!”
MIGA चा अर्थ ‘मेक इराण ग्रेट अगेन’ आहे. मात्र, ही मदत नेमकी कोणत्या स्वरूपाची असेल, हे राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केलेले नाही. या महिन्याच्या सुरुवातीलाच ट्रम्प यांनी लष्करी कारवाईचे संकेत दिले होते. “इराण नेहमीप्रमाणे शांततापूर्ण आंदोलकांची हिंसक हत्या करत असेल, तर अमेरिका त्यांच्या बचावासाठी धावून येईल,” असे सांगतानाच त्यांनी म्हटले की आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत.” यामुळे इराणच्या सत्ताधाऱ्यांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत आणि तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यास काय परिणाम होतील? ट्रम्प कोणत्या शस्त्रांचा वापर करू शकतात? एआय युद्धतंत्राच्या वापराची शक्यता किती? जाणून घेऊयात…
इराणमधील अमेरिकेची लष्करी उपस्थिती
ट्रम्प यांची भूमिका आक्रमक असली, तरी गेल्या वर्षीच्या १२ दिवसांच्या युद्धाच्या तुलनेत सध्या या भागात अमेरिकन सैन्याची तैनात कमी आहे . जून २०२५ मध्ये, ‘यूएसएस जेराल्ड फोर्ड’ ही जगातील सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका व्हर्जिनियाहून भूमध्यसमुद्राकडे रवाना झाली होती, ज्यातून अमेरिकेने आपली शक्ती दाखवून दिली होती. त्यानंतर ही युद्धनौका आता कॅरिबियन समुद्रात ‘यूएस साउदर्न कमांड’च्या ‘ऑपरेशन साउदर्न स्पीयर’ मोहिमेसाठी तैनात करण्यात आली आहे. या युद्धनौकेबरोबर असणाऱ्या युद्धनौकांचा ताफाही आता भूमध्यसमुद्रातून बाहेर पडला आहे.
‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज’ (सीएसआयएस) च्या ऑक्टोबर २०२५ च्या विश्लेषणानुसार, ‘यूएसएस जेराल्ड फोर्ड’ला कॅरिबियनमधून पुन्हा भूमध्य समुद्रात येण्यासाठी २० नॉट (३७ किमी/तास) वेगाने साधारण १० दिवस लागतील. तिथून पर्शियन गल्फ आणि इराणच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी एक आठवडा लागेल. त्याचप्रमाणे, इराण आणि हुथी बंडांपासून संरक्षण करण्यासाठी दक्षिण कोरियाहून तैनात केलेले ‘पॅट्रियट’ हवाई संरक्षण युनिटही उपकरणांच्या अपग्रेडेशनसाठी ३० ऑक्टोबर २०२५ रोजी परतले आहे.
असे असूनही, या भागात अमेरिकेचे लष्करी तळांचे मोठे जाळे आहे. बहरीन, इजिप्त, इराक, जॉर्डन, कुवेत, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती अशा किमान आठ देशांमध्ये अमेरिकेचे १९ लष्करी तळ आहेत. यापैकी कतारमधील ‘अल उदईद एअर बेस’ हा सर्वात महत्त्वाचा असून तिथे १०,००० सैन्य तैनात आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, काही सैनिकांना बुधवारी संध्याकाळपर्यंत हा तळ सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. यामुळे अमेरिकेकडून संभाव्य हल्ला होण्याची आणि इराणकडून त्याला प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता वाढली आहे.
२०२५ मधील इराणच्या अणुकेंद्रंवरील हल्ला
ट्रम्प प्रशासन वारंवार गेल्या वर्षी इराणच्या अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा उल्लेख मोठे लष्करी यश म्हणून करते. २०२५ मध्ये, अमेरिकेच्या ‘बी-२’ स्टेल्थ बॉम्बर्सनी इराणच्या अणुकेंद्रांवर लांब पल्ल्याचे हल्ले केले होते. यात जगातील सर्वात मोठे १४ बॉम्ब टाकण्यात आले होते आणि अमेरिकेचे कोणतेही नुकसान न होता ही मोहीम फत्ते झाली होती. ते हल्ले केवळ अणुकेंद्रांवर केंद्रित होते. मात्र, आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी राबवली जाणारी ही मोहीम पूर्णपणे वेगळी असेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
अणुकेंद्रांऐवजी आता ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (आयआरजीसी), बासिज मिलिशिया आणि इराणी पोलीस दलाच्या कमांड सेंटर्सना लक्ष्य केले जाऊ शकते. परंतु, यापैकी अनेक केंद्रे दाट लोकवस्तीच्या भागात असल्याने नागरी जीवितहानी होण्याचा धोका मोठा आहे. यामुळे अमेरिकेच्या मूळ उद्देशाला धक्का लागू शकतो आणि इराण सरकारला अपप्रचाराची संधी मिळू शकते.
ट्रम्प कोणत्या शस्त्रांचा वापर करणार?
२०२५ च्या हल्ल्यात बी-२ बॉम्बर्सचा वापर झाला असला तरी, आता ‘टोमॅहॉक क्रूझ मिसाईल्स’चा वापर केला जाण्याची शक्यता आहे. ही क्षेपणास्त्रे अमेरिकन पाणबुड्या किंवा युद्धनौकांमधून इराणच्या किनारपट्टीपासून दूर राहून डागता येतात. दुसरा पर्याय म्हणजे ‘जॉइंट एअर-टू-सरफेस स्टँडऑफ मिसाईल’ (JASSM). हे क्षेपणास्त्र १००० पौंड वजनाचे असून त्याची रेंज १००० किलोमीटर आहे. हे एफ-१५, एफ-१६, एफ-३५ यांसारख्या लढाऊ विमानांमधून किंवा बी-५२ बॉम्बर्समधून डागता येते.
याशिवाय मानवरहित ड्रोन्सचाही वापर केला जाऊ शकतो. सध्या या भागात अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका नसल्याने तात्काळ पर्यायांवर मर्यादा आहेत. सर्वात जवळची युद्धनौका ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ सध्या दक्षिण चीन समुद्रात हजारो मैल दूर आहे. त्यामुळे नजीकच्या काळात होणारे हवाई हल्ले पर्शियन गल्फमधील हवाई तळांवरूनच केले जातील.
एआय आणि सायबर युद्धाचा वापर होणार?
पारंपरिक शस्त्रांशिवाय अमेरिका आता सायबर आणि इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्राचाही वापर करत आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडने इराणची डिजिटल दडपशाही यंत्रणा विस्कळीत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यात ‘स्टारलिंक’ सॅटेलाइट सिग्नल सुरक्षित ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक जॅमिंगचा वापर केला जाऊ शकतो.
यामुळे सरकारकडून इंटरनेट बंद केले तरी आंदोलकांना एकमेकांशी संपर्क ठेवता येईल. सायबर हल्ल्यांच्या माध्यमातून इराणचे हवाई संरक्षण जाळे आणि ड्रोन कमांड यंत्रणा निकामी केली जाऊ शकते. याबरोबरच, अमेरिकेने इस्त्रायल आणि कतारमध्ये ‘पॅट्रियट’ आणि ‘थाड’ क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केली आहे. ही यंत्रणा एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना रोखण्यास सक्षम आहे.
