व्हॉट्सॲपची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटाविरोधात कॅलिफोर्नियातील एका न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. व्हॉट्सॲपकडून एंड टू एंड एनक्रिप्शनचा दावा केला जातो. परंतु, मेटामध्ये काम करणारे काही कर्मचारी व्हॉट्सॲपवरील मेसेजेस वाचू शकतात असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. जगभरातील काही याचिकाकर्त्यांनी एकत्रीत येऊन मेटाविरोधात याचिका दाखल केली आहे. कॅलिफोर्नियातील नॉर्दर्न डिस्ट्रिक्टमध्ये ही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात अलका गौर या एका भारतीय याचिककर्त्याचाही समावेश आहे.
व्हॉट्सॲपवर कोणते आरोप ?
व्हॉट्सॲपकडून एंड टू एंड एनक्रिप्शन पॉलिसी राबवली जाते, असे सांगण्यात येते. परंतु, याच पॉलिसीचे उल्लंघन व्हॉट्सॲपची पॅरेंट कंपनी मेटाकडून होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. व्हॉट्सॲप आणि मेटाकडून वास्तवात युजर्सचे मेसेजेस स्टोर केले जातात. तसेच त्या मेसेजेसचे विश्लेषण केले जाते. कोणत्याही व्हॉट्सॲप युजरचे चॅट मेटा कंपनीतील कर्मचारी पाहू शकतात, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
व्हॉट्सॲपकडून एंड टू एंड एनक्रिप्शन दावा केला जातो. परंतु, एंड टू एंड एनक्रिप्शनचेच मुख्यत: उल्लंघन होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. एंड टू एंड एनक्रिप्शनमध्ये पाठवलेला मेसेज थेट दुसऱ्या यूजरला मिळतो. व्हॉट्सॲप त्या मेसेजला एका वापरकर्त्याकडून दुसऱ्या वापरकर्त्याकडे पाठवण्याचे काम करते. तो मेसेज नेमकं काय आहे ? त्याबाबत व्हॉट्सॲपकडे कोणतीही माहिती नसते. परंतु, याच एंड टू एंड एनक्रिप्शन पॉलिसीचे उल्लंघन होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
एंड-टू-एंड एनक्रिप्शन पॉलिसीचे उल्लंघन
जगभरातील काही व्हॉट्सॲप वापरकर्त्यांनी मेटाकडून एंड टू एंड एनक्रिप्शन पॉलिसीचे उल्लंघन होत असल्याचा दावा केला आहे. त्यानुसार कॅलिफोर्नियात व्हॉट्सॲप व मेटा विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. मेटाकडून ‘क्लेप्टोग्राफिक बॅकडुअर’ (kleptographic backdoor) या तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याचा वापर करून व्हॉट्सॲपवरील मेसेज वाचले जात आहेत. तक्रारीनुसार, मेटामधील कर्मचारी मेटा इंजिनिअर्सला सांगून खासगी मेसेजचा अॅक्सेस मिळवत आहेत. ॲक्सेस मिळाल्यानंतर मेटा कर्मचारी यूनिक आयडीचा वापर करून कोणत्याही व्हॉट्सॲप वापरकर्त्याचे खासगी मेसेज पाहू शकतात, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. मेटा कर्मचाऱ्याला एकदा ॲक्सेस मिळाला की तो कोणत्याही व्हॉट्सॲप वापरकर्त्याचे संपूर्ण चॅटिंग पाहू शकतो. मेसेजेस कोणी पाठवले, कुठून पाठवले व किती वाजता पाठवले हे सगळे डिटेल्स मेटा कर्मचाऱ्याला मिळतात, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
याचिकेत व्हॉट्सॲपला विविध देशांनी ठोठावलेल्या दंडांचा उल्लेख
याचिकेत व्हॉट्सॲपला या आधी विविध देशांनी ठोठावलेल्या दंडांचा उल्लेख करण्यात आला आहे. वापरकर्त्यांना त्यांच्या खासगी माहितीच्या सुरक्षेबाबत फसवणारी माहिती दिल्याप्रकरणी यूएस फेडरल ट्रेड कमिशनने २०१९ मध्ये पाच अब्ज डॉलरचा दंड मेटाला ठोठावला होता. युरोपमध्ये मेटाला ‘जनरल डेटा प्रोटेक्शन रेगुलेशन’चे उल्लंघन केल्याप्रकरणी १.२ अब्ज युरोंचा दंड ठोठावला होता. २०१७ मध्ये मेटाने व्हॉट्सॲपला ताब्यात घेतल्यानंतर खोटी माहिती दिली होती, त्यामुळे मेटाला ११० दशलक्ष दंड ठोठावण्यात आला होता.
अमेरिकेतील फेडरल वायरटॅप कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. फेडरल वायरटॅप कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीची खासगी माहिती ऑनलाइन ॲपवरून जाणून घेण्यास टेक कंपन्यांना मज्जाव करण्यात आला आहे. मेटा व्हॉट्सॲप वापरकर्त्यांची माहिती वाचत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
मेटाचे आरोपांना प्रत्युत्तर काय ?
व्हॉट्सॲप विरोधात याचिका दाखल झाल्यानंतर व्हॉट्सॲपचे प्रमुख विल कॅथकार्ट यांनी ‘एक्स’वर प्रतिक्रिया दिली आहे. विल कॅथकार्ट यांनी याचिकाकर्त्यांचे सर्व दावे फेटाळले आहेत. “व्हॉट्सॲपवरील आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. व्हॉट्सॲप मेसेजेस वाचू शकत नाही. कारण एनक्रिप्शन कीज (Encryption Keys) या तुमच्या फोनमध्ये असतात. आम्हाला त्याचा अॅक्सेस मिळत नाही.”, असे कॅथकार्ट म्हणाले.
कॅथकार्ट यांनी इस्रायलच्या NSO ग्रुपवर आरोप केले आहेत. NSO ग्रुप हा इस्रायली सायबर इंटेलिजन्स फर्म म्हणून देखील ओळखला जातो. या ग्रुपने पेगासस सॉफ्टवेअर तयार करून पत्रकार व मानवी हक्कांसाठी लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांचे मोबाईल हॅक केल्याचे म्हटले जाते. कॅथकार्ट यांनी NSO ग्रुपने तथ्यहीन याचिका दाखल केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, व्हॉट्सॲपने २०१९मध्ये NSO ग्रुप विरोधात एक याचिका दाखल केली होती. त्या प्रकरणात व्हॉट्सॲपला १६८ दशलक्ष डॉलरची नुकसान भरपाई देण्याचे आदेश यूएस जुरीने NSO ग्रुपला दिले होते.

