व्हॉट्सॲपचे दीर्घकाळ सीईओ असलेले विल कॅथकार्ट हे आपल्या पदावरून पायउतार होणार आहेत, अशी घोषणा ‘मेटा’ने सोमवारी (२२ जून) केली. भारतीय फिनटेक क्रेड (CRED)चे संस्थापक कुणाल शाह यांची ‘मेटा’ने व्हॉट्सॲपच्या सीईओपदी नियुक्ती केली आहे. हा भारतासाठी गौरवाचा क्षण मानला जात आहे. विल कॅथकार्ट हे व्हॉट्सॲपचे मागील सात वर्षांपासून सीईओ आहेत. कॅथकार्ट यांच्यावर ‘मेटा’ आता दुसरी जबाबदारी सोपवणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कुणाल शाह यांची नियुक्ती करण्यात आली. कॉलसेंटरमधील नोकरीपासून शाह यांनी करिअरची सुरूवात केली होती. व्हॉट्सॲपचे सीईओ बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास कसा आहे, याबाबत जाणून घेऊयात.

कुणाल शाह यांनी २०१८ मध्ये क्रेड (CRED) या स्टार्टअपची सुरूवात केली होती. क्रेड हा एक क्रेडिट कार्ड पेमेंट प्लॅटफॉर्म आहे. वेळेवर बिल भरणाऱ्या यूझर्सना क्रेडवर रिवॉर्ड्स दिले जातात. कुणाल शाह यांना व्हॉट्सॲपच्या प्रमुख पदाची जबाबदारी अशावेळी दिली जात आहे, ज्यावेळी मेटाने क्रेडमध्ये ९०० दशलक्ष डॉलर गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. क्रेडचे व्हॅल्युएशन ४.५ अब्ज (बिलियन) डॉलर करण्यात आले आहे. भारताच्या वेगाने वाढणाऱ्या डिजिटल इकॉनॉमीत मेटा गुंतवणूक करत आहे. कुणाल शाह यांच्या नियुक्तीने भारतीयांचे जगातील टेक क्षेत्रात असलेले वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

कॉल सेंटर ते व्हॉट्सॲप सीईओपर्यंतचा प्रवास कसा राहिला?

कुणाल शाह यांच्या करिअरची सुरूवात बोर्डरूम (कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बसतात ती जागा) पासून झालेली नाही. त्यांच्या करिअरची सुरूवात अत्यंत सामान्यपणे झाली होती. त्यांचा जन्म अहमदाबादमध्ये, तर शिक्षण मुंबईत झाले. विल्सन कॉलेजमधून त्यांनी फिलोसॉफीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी एमबीएत प्रवेश घेतला परंतु, अर्ध्यातूनच एमबीए सोडले. २००० साली त्यांनी एका कॉल सेंटर मध्ये नोकरी स्वीकारली होती. तिथूनच त्यांना जागतिक पातळीवरील व्यवसाय व ग्राहकांची ओळख झाली.

एक्सिस बँकेने कुणाल शाहांचा कोणता ब्रँड खरेदी केला?

कुणाल शाह यांनी २०१० मध्ये संदीप टंडन यांच्यासोबत मिळून फ्रिचार्ज (FreeCharge) ची स्थापना केली होती. फ्रिचार्जवरून लोकांना फोनचे व इतर बिल भरता येत होते. त्या बदल्यात त्यांना रिवॉर्ड्स मिळायचे. भारतात स्मार्टफोन्सची संख्या वाढल्यानंतर फ्रिचार्ज हा देशातील एक महत्वाचा इंटरनेट ब्रँड बनला. पाच वर्षांनंतर स्नॅपडीलने (Snapdeal) फ्रिचार्जला खरेदी केले. त्यावेळी ते भारतातील सर्वात मोठे स्टार्ट अप अॅक्विझिशन ठरले होते. त्यानंतर २०१७ मध्ये एक्सिस बँकने फ्रिचार्जला खरेदी (अक्वायर) केले.फ्रिचार्जच्या यशानंतर कुणाल शाह यांनी एंजल इनव्हेस्टर (मोठा गुंतवणूकदार) म्हणून काम केले. त्यांनी अनेक टेक्नॉलॉजी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली.

कुणाल शाह यांनी CRED ला यशस्वी कसे केले?

२०१८ मध्ये कुणाल शाह यांनी क्रेड (CRED) ची स्थापना केली. सुरूवातीला क्रेड या प्लॅटफॉर्मवरून फक्त क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरता येत होते. २०१९ ते २०२५ या कालावधीत कुणाल शाह यांनी क्रेड यूजर्सची संख्या शुन्यापासून वाढवत १७ दशलक्ष यूजर्सपर्यंत नेली. क्रेडवर दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्येही त्यांनी विस्तार केला. पेमेंट्स, कर्ज वाटप, विमा, कॉमर्स, वेल्थ, क्रेडिट कार्ड यांच्याशी संबंधित सुविधा त्यांनी CRED वर उपलब्ध केल्या. तसेच ९०० दशलक्ष डॉलरचा निधी जागतिक बाजारातून गोळा केला. तसेच बायबॅकसारखी योजना राबवली. आज क्रेडचे वार्षिक उत्पन्न जवळपास ३२०० कोटी रूपये आहे. कुणाल शाह यांनी अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. त्यात रेझरपे, स्पिनी, अनअकॅडमी, गो-जेकचा समावेश आहे.

मार्क झुकरबर्ग यांनी कुणाल शाह यांची निवड का केली?

कुणाल शाह हे व्हॉट्सॲपचे पुढील सीईओ बनतील अशी घोषणा सोमवारी (२२ जून) करण्यात आली. मार्क झुकरबर्ग यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, व्हॉट्सॲपचे विद्यमान सीईओ विल कॅथकार्ट यांच्यावर नवीन प्रॉडक्ट तयार करण्याची जबाबदारी सोपवली जाईल. शाह यांची काहीतरी निर्माण करण्याची मानसिकता आणि त्यांचा जागतिक दृष्टीकोन यांमुळे ते व्हॉट्सॲपचे नेतृत्व करण्यासाठी अत्यंत योग्य ठरतात. मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, मेटाचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर ख्रिस कॉक्स यांनी व्हॉट्सॲपचे सीईओ शोधताना थेट कुणाल शाह यांच्याशी संपर्क साधला. कुणाल शाह हे व्हॉट्सॲपचे काम भारतातूनच सुरू करणार आहेत. त्यानंतर ते कॅलिफोर्नियातील मेटाच्या मुख्यालयात काम करण्यासाठी दाखल होतील. शाह यांनी त्यांच्या क्रेडमधील कर्मचाऱ्यांसाठी लिहिले, “टीम क्रेड, तुम्ही तुमच्या दहापट क्षमतेनं काम करावं, अशी अपेक्षा मी तुमच्याकडून अजूनही करतोय.”

झुकरबर्ग यांनी व्हॉट्सॲपचे नेतृत्व करण्यासाठी शाह यांची निवड का केली? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. व्हॉट्सॲप या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचे सर्वात मोठे मार्केट भारतात आहे. व्हॉट्सॲपला भारतात डिजिटल पेमेंट क्षेत्रात प्रगती करायची आहे. फोनपे व गुगलपे सारखे यश व्हॉट्सॲप पे ला भारतात मिळवता आले नाही. भारतात व्यवसाय वाढवण्यात व्हॉट्सॲपला अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे भारतीय असलेल्या व या क्षेत्रातील अनुभव असलेल्या कुणाल शाह यांची झुकरबर्ग यांनी निवड केली आहे.