तुमचा जुना अँड्रॉईड फोन अजूनही व्यवस्थित चालतोय, त्यामुळे तो बदलण्याची घाई तुम्ही नक्कीच करत नसाल. फोनमध्ये व्हॉट्सॲप असणं ही तुमच्या गरजेची बाब ठरत आहे. पण, व्हॉट्सॲप सुरु ठेवण्यासाठी आता एक गोष्ट महत्त्वाची ठरणार आहे, ती म्हणजे अँड्रॉईडचं व्हर्जन.
व्हॉट्सॲपने जुन्या अँड्रॉईड (Android) फोनसाठी आपला सपोर्ट बंद करण्याची घोषणा एप्रिल २०२६ मध्ये केली होती. त्यानुसार ८ सप्टेंबर २०२६ पासून अँड्रॉईड 5.0 (Lollipop) आणि अँड्रॉईड 5.1 वापरणाऱ्या फोनवर व्हॉट्सॲपचा सपोर्ट बंद करण्यात आला आहे. आता व्हॉट्सॲप वापरण्यासाठी फोनमध्ये किमान अँड्रॉईड 6.0 (Marshmallow) किंवा त्यापेक्षा नवीन व्हर्जन असणं आवश्यक असणार आहे. व्हॉट्सॲप मॅसेंजर आणि व्हॉट्सॲप बिझनेस या दोन्ही ॲप्ससाठी ही अट लागू असणार आहे.
म्हणजेच तुमचा फोन अजूनही अँड्रॉईड 5.x वर असेल आणि त्याला पुढच्या अँड्रॉईड व्हर्जनवर अपडेट करता येत नसेल, तर त्या फोनवर व्हॉट्सॲप वापरता येणार नाही. अशा फोनवर तुमचे जुने चॅट्स पाहता येणार नाहीत आणि नवीन मेसेजही पाठविता येणार नाहीत. त्यामुळे व्हॉट्सॲप वापरण्यासाठी तुमच्या फोनमध्ये कोणतं अँड्रॉईड व्हर्जन आहे, हे एकदा तपासणं गरजेचं आहे.
तुमच्या फोनचं Android व्हर्जन कसं तपासायचं?
तुमचा फोनमधील अँड्रॉईड व्हर्जन कसं तपासता येणार,
- फोनमधील सेटिंग्ज उघडा
- खाली स्क्रोल करून About Phone किंवा System पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर Software Information किंवा Android Version हा पर्याय शोधा, त्यापैकी एका पर्यायावर क्लिक करा
- तिथे दिसणारं Android Version तपासा
- जर तुमच्या फोनमध्ये Android 6.0 किंवा त्यापेक्षा नवीन व्हर्जन असेल, तर व्हॉट्सॲप वापरण्यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही
- पण Android 6.0 पेक्षा जुनं व्हर्जन असेल, तर मात्र व्हॉट्सॲप वापरता येणार नाही
तुमच्या फोनवर WhatsApp बंद होणार असेल, तर काय करायचं?
जर तुमचा फोन Android 5.0 किंवा त्यापेक्षा जुन्या व्हर्जनवर चालत असेल, तर फोन बदलण्यापूर्वी काही गोष्टी करून घेणं महत्त्वाचं आहे.
१. आधी फोन अपडेट होतोय का ते तपासा
Settings > System > System Update याप्रमाणे पुढे जा. तुमच्या फोनच्या कंपनीनं अँड्रॉईड 6.0 किंवा त्यापेक्षा नवीन व्हर्जन अपडेट दिलं आहे का, हे तपासा. तुमच्या फोनसाठी Android 6.0 किंवा त्यापेक्षा नवीन व्हर्जनचं अपडेट कंपनीनं दिलं असेल, तर ते अपडेट फोनमध्ये इन्स्टॉल करा.
२. WhatsApp चॅट्सचा बॅकअप घ्या
नवीन फोन घ्यावा लागला, तर जुने मेसेज गमावू नयेत यासाठी आधी व्हॉट्सॲप चॅट्सचा बॅकअप घ्या. व्हॉट्सॲप उघडून त्यावर उजव्या कोपऱ्यात तीन डॉट्स दिसतील तिथे क्लिक करा, त्यात पुढे Settings > Chats > Chat Backup > Back Up या प्रोसेसनुसार चॅट्सचा बॅकअप गूगल ड्राइव्हवर सेव्ह करता येईल.
३. फोन अपडेट होत नसेल, तर नवीन फोन घ्यावा लागेल
अँड्रॉईड 5.0 असलेले अनेक फोन २०१३ ते २०१५ या काळात बाजारात आले होते. तुमच्या फोनला अँड्रॉईड 6.0 किंवा त्यापुढील व्हर्जनचं अपडेट मिळत नसेल, तर व्हॉट्सॲप वापरण्यासाठी केवळ नवीन अँड्रॉईड किंवा iOS फोन घेण्याचाच पर्याय उरतो.
WhatsApp ने जुन्या Android फोनचा सपोर्ट का बंद केला?
व्हॉट्सॲप वेळोवेळी आपली सिस्टीम अपडेट करतं. ॲप अधिक सुरक्षित, वेगवान आणि नवीन फीचर्ससाठी सक्षम करण्यासाठी अपडेट्स ही ॲपमधील नियमित प्रक्रिया असते. याच प्रक्रियेचा भाग म्हणून अँड्रॉईड 5.0 आणि 5.1 सारख्या जुन्या व्हर्जनसाठी व्हॉट्सॲप सपोर्ट आता बंद करण्यात आला आहे.
त्यातील आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे ॲपची सुरक्षितता. जुन्या अँड्रॉईड व्हर्जनसाठी गूगलकडून आवश्यक सुरक्षा अपडेट्स (Security Patches) आता नियमितपणे मिळत नाहीत. त्यामुळे अशा फोनवर मालवेअर किंवा हॅकिंगचा धोका वाढू शकतो. त्याचा विपरीत परिणाम फोनमध्ये असलेल्या व्हॉट्सॲप चॅट्स आणि इतर वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेवरही होऊ शकतो.
दुसरं कारण म्हणजे जुन्या फोनची क्षमता. जुन्या डिव्हाइसमध्ये नवीन फीचर्स सुरळीत चालवण्यासाठी आवश्यक असलेली प्रोसेसिंग पॉवर आणि मेमरी कमी असू शकते. व्हॉट्सॲपमध्ये मेटा एआय आणि अधिक प्रगत मीडिया शेअरिंगसारखे नवीन फीचर्स येत आहेत. हे फीचर्स चालण्यासाठी जुन्या अँड्रॉईड व्हर्जनमध्ये आधुनिक सॉफ्टवेअर सिस्टीम असणं आवश्यक असते, ती नसल्यास आपल्याला नवे अपडेट मिळत नाहीत.
त्याशिवाय, खूप जुन्या अँड्रॉईड व्हर्जनसाठी ॲपची सपोर्ट कायम ठेवण्यासाठी टेक कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर तांत्रिक काम करावं लागतं. अशा जुन्या फोनचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या खूपच कमी झाल्यावर कंपन्या त्यांचा सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतात.
तुमच्यासाठी याचा अर्थ काय?
तुमचा फोन अँड्रॉईड 6.0 किंवा त्यापेक्षा नवीन व्हर्जनचा असेल, तर व्हॉट्सॲप वापरण्यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. पण, फोन अँड्रॉईड 5.0 किंवा 5.1 वर असेल, तर आधी अपडेट उपलब्ध आहे का ते तपासा. अपडेट मिळत नसेल, तर तुमचे व्हॉट्सॲप चॅट्स सुरक्षितपणे बॅकअप करून नवीन फोन घेण्याचा विचार करा.
थोडक्यात, फोन जुना आहे म्हणून तो लगेच बदलण्याची गरज नाही; आधी फक्त अँड्रॉईड व्हर्जन तपासा. तुमचा फोन अपडेट होऊ शकत असेल, तर त्याच फोनमध्ये व्हॉट्सॲपचा वापर सुरू ठेवता येणार आहे.
