तुमच्या व्हॉट्सॲपवर ‘युजरनेमचा’ नवा अपडेट आला असेलच, तुम्ही युजरनेम बनवला देखील असेल. पण, फोन नंबरऐवजी ‘युजरनेम’ वापरून एकमेकांशी संपर्क साधण्याचे व्हॉट्सॲपचे हे नवे फीचर लवकरच गुंडाळले जाणार आहे. या फीचरमुळे बनावट खाती आणि ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढू शकतात, अशी भीती केंद्र सरकारने व्यक्त केली आहे, त्यामुळे आयटी मंत्रालयाने मेटाच्या मालकीच्या व्हॉट्सॲपला हे फीचर सध्या लागू न करण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच तीन दिवसांत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्यासही सांगितले आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला व्हॉट्सॲपने ‘युजरनेम’ फीचर आणण्याची घोषणा केली होती. यामध्ये वापरकर्त्यांना जर त्यांचा फोन नंबर लपवायचा असेल तर त्यांच्या खात्यासाठी एक वेगळे (युनिक) युजरनेम तयार करण्याचा फीचर आला होता, ज्यामुळे एखाद्या नव्या व्यक्तीशी संपर्क साधताना मोबाईल क्रमांक देण्याची गरज भासणार नाही. समोरची व्यक्ती केवळ युजरनेमच्या आधारेच मेसेज किंवा कॉल करू शकेल, असे फीचर उपलब्ध होणार होते.
व्हॉट्सॲपच्या मते, वापरकर्त्यांची गोपनीयता (Privacy) अधिक सुरक्षित करण्यासाठी हे फीचर आणले जात आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते याच फीचरचा गैरफायदा घेत फसवे लोक दुसऱ्यांच्या नावाने किंवा बनावट ओळख वापरून लोकांची दिशाभूल करू शकतात. परिणामी, तोतयागिरी आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यताही निर्माण होत आहे.
विशेष म्हणजे, टेलिग्राम आणि सिग्नल यांसारख्या मेसेजिंग अॅप्समध्ये युजरनेमवर आधारित संपर्काचे फीचर आधीपासूनच वापरले जात आहे. मात्र, भारतात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप असल्याने व्हॉट्सॲपच्या या फीचरकडे सरकारसह सायबर सुरक्षा तज्ज्ञांचेही विशेष लक्ष लागले आहे.
व्हॉट्सॲपने यापूर्वीच हे फीचर पुढील काही महिन्यांत टप्प्याटप्प्याने सुरू केले जाईल असे जाहीर केले होते. सरकारच्या नोटिशीनंतर कंपनीनेही आपली भूमिका स्पष्ट करत युजरनेम फीचरमधील गैरवापर रोखण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाय केले आहेत असे स्पष्ट केले होते.
सरकारने व्हॉट्सॲपला पाठवलेल्या नोटिशीत म्हटले की, या फीचरमुळे ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, डिजिटल अरेस्ट, घोटाळे आणि तोतयागिरी यांसारखे सायबर गुन्हे वाढीस लागतील, अशी चिंता व्यक्त केली. कारण युजरनेमच्या माध्यमातून बोगस व्यक्तींना अनोळखी वापरकर्त्यांशी सहज संपर्क साधणे आणि त्यांची दिशाभूल करणे सहज शक्य होऊ शकते.
सरकारने आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. सामान्य नागरिक, सरकारी अधिकारी, बँका किंवा सरकारी संस्थांच्या युजरनेम सारखेच बोगस युजरनेम तयार करून फसवणूक केली जाऊ शकते, यामुळे आर्थिक फसवणुकीलाही चालना मिळू शकते. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाने या फीचरबाबत चिंता व्यक्त करत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे. आता सरकार या फीचरमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांचे सखोल मूल्यमापन (Risk Assessment) करणार आहे. नवे फीचर सध्याच्या कायदेशीर चौकटीशी सुसंगत आहे की नाही याचीही तपासणी केली जाणार आहे.
नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, फसवणूक करणारे लोक प्रसिद्ध व्यक्ती, मोठ्या संस्था किंवा सरकारी संघटनांच्या नावाशी मिळतीजुळती युजरनेम तयार करून इतर वापरकर्त्यांशी संपर्क साधू शकतात. अशा वेळी ते स्वतःची खोटी ओळख सांगून लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करू शकतात.
सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, तंत्रज्ञानाची फारशी माहिती नसलेल्या किंवा अशा बनावट युजरनेममधील फरक ओळखता न येणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा मोठा धोका ठरू शकतो. यापूर्वीही व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ‘डिजिटल अरेस्ट’सारख्या फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत, त्यामुळे युजरनेमचे हे नवे फीचर अशा सायबर गुन्हेगारांसाठी आयते कोलित ठरू शकते, अशी सरकारची चिंता आहे.
आणखी एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने नमूद केले की, ‘व्हॉट्सॲपकडून स्पष्टीकरण मिळाल्यानंतर सरकार या फीचरची सखोल तपासणी करणार आहे. अंतर्गत तपासणीदरम्यान जर युजरनेमच्या माध्यमातून होणारी तोतयागिरी रोखण्यासाठी पुरेसे सुरक्षा उपाय करत नसल्याचे सरकारला वाटले, तर हे फीचर पूर्णपणे थांबवण्याचाही विचार केला जाऊ शकतो.’
दरम्यान, भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनीही या फीचरबाबत आक्षेप घेतला आहे. पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, खऱ्या युजरनेमशी मिळतीजुळते असणारे बनावट युजरनेम तयार करून सायबर फसवणूक वाढू शकते. त्यांच्या मते, ‘एकीकडे अधिकृतरीत्या पडताळणी झालेले युजरनेम असतील, तर दुसरीकडे त्यांच्यासारखी असणारी न पडताळलेली युजरनेमही तयार होऊ शकतात. अशा परिस्थितीत अनेक वापरकर्ते फसवणुकीला बळी पडू शकतात.
मोबिक्विचे सीईओ बिपीन प्रीत यांनी या फीचरची कल्पना चांगली नसल्याचे म्हटले आहे. या फीचरमुळे फसवणूक आणि खोटी ओळख वापरण्याच्या घटनांना चालना मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, व्हॉट्सॲपने मात्र या फीचरमुळे होणारी तोतयागिरी रोखण्यासाठी अनेक सुरक्षा उपाय केल्याचा दावा केला आहे. व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने सांगितले की, सार्वजनिक जीवनातील प्रमुख व्यक्ती, सरकारी संस्था, सेलिब्रिटी आणि मेटाकडून व्हेरिफाईड झालेल्या खात्यांशी संबंधित महत्त्वाची युजरनेम आधीच सुरक्षित स्थितीत आहेत, त्यामुळे हे युजरनेम केवळ संबंधित व्यक्ती किंवा संस्थांनाच वापरता येतील. तसेच, त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेली युजरनेमही सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. त्यांचा गैरवापर केला जाणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे.
कंपनीने असेही स्पष्ट केले की, युजरनेम फीचर अद्याप सुरू झालेले नाही आणि ते यावर्षाअखेरीस टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिले जाणार आहे.
याशिवाय, व्हॉट्सॲपने या फीचरमध्ये सायबर फसवणूक रोखण्यासाठी सुरक्षेच्या अनेक टप्प्यांचा समावेश केल्याचे नमूद केले आहे, ज्यामध्ये फोन नंबरही गरजेचा असणार आहे. एखाद्या व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी समोरच्या व्यक्तीचे अचूक युजरनेम माहीत असणे आवश्यक असेल. तसेच, एखादी व्यक्ती किंवा त्याचे खाते किती नव्या लोकांशी संपर्क साधू शकते, यावर मर्यादा लावल्या जातील. तसेच, एखाद्याचे युजरनेम वारंवार शोधण्याचे किंवा वापरण्याचे प्रयत्न कटाक्षाने रोखले जातील. याशिवाय, तोतयागिरी किंवा गैरवापराच्या पद्धती ओळखून अशी खाती शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी विशेष यंत्रणाही विकसित करण्यात आल्या आहेत, असा दावा देखील व्हॉट्सॲपने केला आहे.
यापूर्वी हे फीचर जाहीर करताना व्हॉट्सॲपने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये नमूद केले की, ‘युजरनेम फीचर हे व्हॉट्सॲपवरील गोपनीयता अधिक सुरक्षित करण्याच्या दिशेने उचललेले आमचे नवे पाऊल आहे. यामध्ये कोणतीही ब्राऊजिंगची सुविधा किंवा युजरनेम सुचवण्याची सुविधा असणार नाही, त्यामुळे एखाद्या व्यक्तीशी प्रथमच संपर्क साधण्यासाठी समोरच्या व्यक्तीचे अचूक युजरनेम माहीत असणे आवश्यक असणार आहे.’
व्हॉट्सॲपने असेही म्हटले की, तुम्ही एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदाच मेसेज पाठवत असाल, जिने तुमचा नंबर सेव्ह केलेला नसेल, तर तुमचा फोन नंबर त्या व्यक्ती राहत असलेल्या देशापेक्षा दुसऱ्या देशातील आहे का, ही माहिती समोरच्या व्यक्तीला दाखवली जाऊ शकते. वापरकर्त्यांना ते नेमके कोणाशी संपर्क साधत आहेत, याची कल्पना यावी, त्यांची सुरक्षितता निश्चित व्हावी आणि अनोळखी व्यक्तींकडून होणारा संपर्क टाळता यावा हा या फीचर मागचा उद्देश आहे.
फीचर याच आठवड्यात सुरू झाले. व्हॉट्सॲपने वापरकर्त्यांना त्यांच्या पसंतीचे युजरनेम आधीच राखीव करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, जेणेकरून एकाच नावाचा वापर अनेक जण करू शकणार नाहीत. तसेच क्रिएटर्स, लघुउद्योजक आणि संस्थांना त्यांच्या फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरील सध्याचे युजरनेमच व्हॉट्सअॅपवरही वापरण्याची सुविधा दिली जाणार आहे.
दरम्यान, तोतयागिरी किंवा युजरनेमचा गैरवापर झाल्याचा संशय आल्यास संबंधित खाते आणि मेसेजेसची तक्रार करण्याचे आवाहन व्हॉट्सअॅपने केले आहे. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर नियमांचे उल्लंघन करणारे युजरनेम हटवणे किंवा संबंधित खाते बंद करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
