Vitamin D deficiency ड जीवनसत्त्व म्हणजेच व्हिटॅमिन डी निरोगी जीवन जगण्यासाठी आवश्यक असा घटक आहे. भारतात मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध आहे, मात्र तरीही जवळपास १० पैकी नऊ लोकांमध्ये ड जीवनसत्त्वाची कमतरता आढळून येत आहे, असे ‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

घराबाहेर न पडणे, सनस्क्रीनचा वापर आणि प्रदूषणामुळे आपल्या शरीराला हे जीवनसत्त्व शोषून घेण्यात अडथळा निर्माण होतोय. पण, व्हिटॅमिन डीची कमतरता शरीरासाठी घातक ठरू शकते असे तज्ज्ञांचे सांगणे आहे. या जीवनसत्वाच्या कमतरतेने नक्की कोणते आजार जडू शकतात? त्याची लक्षणे कशी ओळखायची? त्यावर उपाय काय? यावर दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमधील अंतर्गत औषधांचे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर चॅटर्जी बोलले आहेत.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा परिणाम

डॉक्टर चॅटर्जी यांनी त्यांच्या एका ३० वर्षीय रुग्णाला आलेला अनुभव आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे त्याच्या आयुष्यात नक्की काय बदल घडले याविषयी सांगितले. “तो म्हणाला, माझी वैयक्तिक ऊर्जा पूर्णपणे संपली होती, मला सतत थकवा जाणवत असे. आदल्या दिवशी झालेली चर्चा, गोष्टी आणि घेतलेले निर्णय मला आठवत नसत. मी सर्व काही करून पाहिले. चांगला आहार घेतला. लवकर झोपलो. चालायला गेलो. प्रेरणादायी व्हिडीओ पाहिले, पण कशाचाही उपयोग झाला नाही,” असे त्याने मला सांगितले.

सततचा थकवा, कशाचीही ओढ न वाटणे, साधी कामे करणेही कठीण वाटणे, यांसारख्या गोष्टी तणाव, अपुरी झोप किंवा धावपळीच्या जीवनशैलीमुळे घडत असल्याचा अनेकांचा समज असतो. मात्र, काही प्रकरणांमध्ये याचे कारण अत्यंत साधे आणि अनेकदा दुर्लक्षित असते आणि ते कारण म्हणजे व्हिटॅमिन डीची कमतरता.

हाडांचे आरोग्य आणि व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डीचा संबंध साधारणपणे हाडांच्या आरोग्याशी जोडला जातो. आपल्यापैकी बहुतेकांना माहिती आहे की, व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करते आणि हाडे मजबूत ठेवते. पण, अनेकांना हे माहीत नसते की व्हिटॅमिन डी स्नायूंची ताकद, रोगप्रतिकारक शक्ती आणि अगदी मानसिक स्थिती नियंत्रित करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा याची पातळी कमी होते तेव्हा याची लक्षणे गोंधळात टाकणारी असू शकतात आणि ती ओळखणे कठीण होते.

याची लक्षणे कोणती?

सततचा थकवा हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे सर्वात सामान्य लक्षण आहे. हा थकवा म्हणजे दिवसभराच्या कामानंतर येणारा थकवा नाही. हा थकवा विश्रांती घेतल्यावरही कमी होत नाही. रात्रभर झोप घेऊनही लोकांना थकल्यासारखे वाटते. शरीरातील स्नायू आणि मेंदूसह अनेक ऊतींमध्ये व्हिटॅमिन डी रिसेप्टर्स असतात. याची कमी पातळी ऊर्जा निर्मिती आणि एकूण शारीरिक क्षमतेवर परिणाम करू शकते आणि त्यामुळेच सतत थकवा जाणवतो. नैराश्याची भावना, चिडचिड किंवा दैनंदिन कामांमधील रस कमी होणे यांचा संबंधही व्हिटॅमिन डीच्या कमतरतेशी असू शकतो. संशोधनानुसार, व्हिटॅमिन डी मेंदूतील काही रसायनांच्या निर्मितीवर परिणाम करते. ही रसायने मानसिक स्थिती नियंत्रित करतात.

स्नायूंचा कमकुवतपणा आणि अंगदुखी

विनाकारण जाणवणारा स्नायूंचा कमकुवतपणा, पाठदुखी किंवा सामान्य अंगदुखी ही या जीवसत्वाच्या कमतरतेची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. व्हिटॅमिन डी स्नायूंचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करते. त्याच्या कमतरतेमुळे सूक्ष्म अशक्तपणा येऊ शकतो. काही लोकांना पायऱ्या चढताना त्रास होतो, बसलेल्या स्थितीतून उठताना अडचण येणे किंवा कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय शरीरात वेदना जाणवू लागतात.

व्हिटॅमिन डी रोगप्रतिकारक शक्तीला आधार देते, त्यामुळे याची पातळी कमी असल्यास व्यक्तीला वारंवार सर्दी, श्वसनाचे संसर्ग होऊ शकतात किंवा आजारातून बरे होण्यास वेळ लागू शकतो. जर कोणाला नेहमीपेक्षा जास्त वेळा आजारी पडल्यासारखे वाटत असेल, तर जीवनसत्त्वांच्या कमतरतेची चाचणी करून घेणे फायदेशीर ठरते. ‘ब्रेन फॉग’ (मेंदूला आलेली सुस्ती), लक्ष केंद्रित करण्यात अडचण किंवा विसरभोळेपणा यांचाही संबंध व्हिटॅमिन डीच्या कमतरतेशी असू शकतो.

याचा सर्वाधिक धोका कोणाला?

व्हिटॅमिन डीला सनशाईन व्हिटॅमिन (सूर्यप्रकाशातील जीवनसत्व) म्हटले जाते, कारण सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर शरीर हे जीवनसत्व तयार करते. जे लोक घरात किंवा बंदिस्त ठिकाणी काम करतात, बाहेर कमी वेळ घालवतात, सनस्क्रीनचा अतिवापर करतात किंवा मर्यादित सूर्यप्रकाश असलेल्या भागात राहतात, त्यांना याचा धोका जास्त असतो. शहरी जीवनशैली, ऑफिसमधील कामे, वायू प्रदूषण ही व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची मुख्य कारणे असू शकतात.

व्हिटॅमिन डीच्या कमतरते निदान कसे होते?

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे निदान करणे सोपे आहे. साध्या रक्ताच्या चाचणीद्वारे रक्तातील व्हिटॅमिन डीची पातळी मोजता येते. अनेकदा नियमित आरोग्य तपासणीदरम्यान ही कमतरता लक्षात येते. एकदा निदान झाले की, वैद्यकीय मार्गदर्शनाखाली सप्लिमेंट्स आणि सुरक्षितपणे सूर्यप्रकाशात बसणे यांसारखे उपचार केले जातात. शरीरातील व्हिटॅमिनची पातळी किती कमी होती, यावर अवलंबून लक्षणे सुधारण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावे, कारण व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्सच्या अतिवापरामुळे विषबाधा होऊ शकते.

व्हिटॅमिन डीची कमतरता ओळखणे कठीण असण्याचे कारण म्हणजे त्याची लक्षणे तणाव, थकवा आणि अगदी नैराश्याशी मिळतीजुळती असतात. अनेक लोक केवळ जीवनशैलीत बदल करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यांना हे माहीत नसते की पोषक घटकांचा अभाव हे याचे खरे कारण असू शकते.