Vitamin D deficiency Risks: तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित व्हिटॅमिन D चे सप्लिमेंट्स घेत आहात, डोस कधीही चुकवत नाही, तरीही ब्लड रिपोर्टमध्ये व्हिटॅमिन D ची पातळी वाढत नसल्याचे पाहून निराशा झाली आहे का? अशा वेळी “या गोळ्यांचा काहीच उपयोग होत नाहीये,” असा विचार मनात येणे स्वाभाविक आहे. पण थांबा! नेहमीच चूक त्या गोळ्यांची किंवा सप्लिमेंटची असते असे नाही. खरी अडचण तुमच्या शरीरात लपलेली असू शकते; म्हणजेच तुमचे शरीर ते सप्लिमेंट किती प्रमाणात शोषून घेते आणि त्याचा वापर कसा करते, यावर सगळे अवलंबून असते. कोणतेही सप्लिमेंट शरीराला फायदेशीर ठरण्यासाठी ते व्यवस्थित ‘अ‍ॅब्जॉर्ब’ (शोषले) होणे गरजेचे असते. परंतु, आपल्या काही अगदी छोट्या आणि सामान्य चुकांमुळे व्हिटॅमिन D शरीरात नीट शोषले जात नाही आणि परिणामी, सतत गोळ्या घेऊनही रक्तातील त्याची पातळी वाढत नाही.

प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ आणि हार्ट ट्रान्सप्लांट स्पेशालिस्ट डॉ. दिमित्री यारानोव (अ‍ॅडव्हान्स्ड हार्ट फेल्युअर आणि मेकॅनिकल सर्क्युलेटरी सपोर्ट क्षेत्रातील तज्ज्ञ) यांनी व्हिटॅमिन D सप्लिमेंट्स घेताना लोकांकडून होणाऱ्या नेमक्या याच चुकांवर प्रकाश टाकला आहे.
१५ जून रोजी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये ते म्हणतात, “आज जगभरात जवळपास एक अब्ज लोक व्हिटॅमिन D च्या कमतरतेचा सामना करत आहेत. अनेक जण तर अनेक महिने किंवा वर्षानुवर्षे सप्लिमेंट्स घेत आहेत; तरीही त्यांच्या रक्तातील व्हिटॅमिन D ची पातळी जशीच्या तशीच आहे, त्यात कोणतीही अपेक्षित सुधारणा झालेली नाही.”

नेमकी चूक कुठे होते?

समस्या गोळीत नाही, तर घेण्याच्या पद्धतीत आहे! डॉ. यारानोव यांच्या मते, नियमित सप्लिमेंट्स घेऊनही जर व्हिटॅमिन D ची पातळी वाढत नसेल, तर त्या गोळ्या खराब किंवा बनावट आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. उलट, बहुतांश वेळा आपण त्या गोळ्या कशा आणि कोणत्या पद्धतीने घेतो, यातच खरी गोम असते.

यामागची काही मुख्य कारणे त्यांनी स्पष्ट केली आहेत:

  • अपुरा डोस: काही लोकांमध्ये व्हिटॅमिन D ची कमतरता इतकी प्रचंड असते की, ते घेत असलेला नेहमीचा डोस ती कमतरता भरून काढण्यासाठी अगदीच तोकडा पडतो.
  • इतर पोषकतत्त्वांची कमतरता: शरीरात व्हिटॅमिन D व्यवस्थित शोषले (absorb) जाण्यासाठी आणि त्याचे चयापचय (metabolism) नीट होण्यासाठी इतरही काही साहाय्यक पोषकतत्त्वांची गरज असते. जर शरीरात या घटकांचीच कमतरता असेल, तर सप्लिमेंट घेऊनही त्याचा शरीराला काहीच फायदा होत नाही.

डॉ. यारानोव पुढे म्हणतात, “माझ्या क्लिनिकमध्ये मला अशा केसेस नेहमीच पाहायला मिळतात. अनेक जण अनेक महिने न चुकता व्हिटॅमिन D च्या गोळ्या घेत असतात; पण जेव्हा आम्ही त्यांचे ब्लड रिपोर्ट पाहतो, तेव्हा पातळी अजूनही खालावलेलीच दिसते. यावरून हेच स्पष्ट होते की, मूळ समस्या सप्लिमेंटमध्ये नसून, ते घेण्याच्या चुकीच्या पद्धतीत, अपुऱ्या डोसमध्ये किंवा शरीरात ते अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी लागणाऱ्या इतर पोषक घटकांच्या कमतरतेमध्ये असते.”

१. व्हिटॅमिन D चुकीच्या पद्धतीने (रिकाम्या पोटी) घेणे

  • डॉ. यारानोव सांगतात की, व्हिटॅमिन D हे ‘फॅट-सोल्युबल’ (Fat-soluble) म्हणजेच चरबीत विरघळणारे जीवनसत्त्व आहे. याचा अर्थ असा की, शरीराला हे जीवनसत्त्व व्यवस्थित शोषून घेण्यासाठी आहारातील चांगल्या चरबीची (Healthy Fats) अत्यंत गरज असते. म्हणूनच, ही गोळी कधीही रिकाम्या पोटी घेऊ नये.
  • डॉक्टरांच्या मते, “व्हिटॅमिन D हे फॅट-सोल्युबल असल्यामुळे, ते रिकाम्या पोटी घेण्याऐवजी जर तुम्ही चांगल्या फॅट्स असलेल्या जेवणाबरोबर घेतले, तर शरीरात त्याचे शोषण (Absorption) कमालीचे सुधारते.”
  • आरोग्यदायी चरबीचे उत्तम पर्याय: गोळी घेताना आहारात दूध, दही, तूप, अंडी, सुकामेवा (बदाम, अक्रोड) किंवा अ‍ॅव्होकॅडो यांसारख्या पदार्थांचा समावेश असावा, जेणेकरून शरीराला त्या गोळीचा पूर्ण फायदा मिळेल.

२. चुकीचा किंवा अपुरा डोस घेणे

डॉ. यारानोव यांच्या मते, आपल्याकडे प्रत्येकाच्या शरीरातील व्हिटॅमिन D ची कमतरता सारखीच असेल, असा एक मोठा गैरसमज असतो. त्यामुळेच सर्वांसाठी एकच डोस लागू होईल, असे मानणे ही दुसरी मोठी चूक ठरते. वास्तविक पाहता, काहींमध्ये ही कमतरता अगदी किरकोळ (सौम्य) असू शकते, तर इतरांमध्ये ती प्रचंड प्रमाणात असू शकते. अशा वेळी, शरीरातील व्हिटॅमिन D ची पातळी फक्त ‘टिकवून ठेवण्यासाठी’ (Maintenance Dose) दिला जाणारा नेहमीचा डोस, शरीरातील मोठी कमतरता भरून काढण्यासाठी अगदीच अपुरा पडतो. म्हणूनच, नेमका किती डोस हवा आहे हे जाणून घेण्यासाठी आधी रक्ताची योग्य तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

Vitamin D deficiency
Vitamin D deficiency

डॉक्टर सांगतात, “प्रत्येकाच्या शरीराची गरज वेगळी असते. फक्त पातळी टिकवून ठेवण्याचा डोस, शरीरातील मोठी तूट भरून काढू शकत नाही. तुमच्या शरीराला नेमक्या किती डोसची गरज आहे, हे जाणून घेण्याचा एकमेव खात्रीशीर मार्ग म्हणजे ‘रक्त तपासणी’ (Blood Test) करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने डोस ठरवणे.”

३. साहाय्यक पोषकतत्त्वांकडे दुर्लक्ष करणे (मॅग्नेशियमची कमतरता)

बहुतांश लोकांना असे वाटते की, व्हिटॅमिन D शरीरात एकटेच काम करते. पण डॉ. यारानोव यांच्या मते, ही तिसरी आणि सर्वात मोठी चूक आहे. व्हिटॅमिन D चा शरीराला पूर्ण फायदा मिळवून देण्यासाठी ‘मॅग्नेशियम’ (Magnesium) या खनिजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. जर तुमच्या शरीरात मॅग्नेशियमची पातळी कमी असेल, तर तुम्ही कितीही महागड्या व्हिटॅमिन D च्या गोळ्या खाल्ल्या, तरी त्यांचा म्हणावा तसा परिणाम दिसून येत नाही.

Vitamin D deficiency
Vitamin D deficiency

यामागचे वैज्ञानिक कारण स्पष्ट करताना डॉक्टर म्हणतात, “व्हिटॅमिन D हे शरीरात एकट्याने काम करू शकत नाही. आपण घेतलेल्या सप्लिमेंटला शरीरात ‘अ‍ॅक्टिव्हेट’ (सक्रिय) करण्यासाठी मॅग्नेशियमची गरज असते. त्यामुळे शरीरात मॅग्नेशियमच कमी असेल, तर व्हिटॅमिन D चे काम अतिशय मर्यादित राहते आणि त्याचा अपेक्षित फायदा शरीराला मिळत नाही.”

मॅग्नेशियम वाढवण्यासाठी काय खशाल?

व्हिटॅमिन D चा रिझल्ट सुधारण्यासाठी आहारात बदाम, काजू, अंबाडीच्या बिया (Flax seeds), भोपळ्याच्या बिया (Pumpkin seeds), हिरव्या पालेभाज्या आणि डार्क चॉकलेट यांसारख्या मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर ठरते.