पश्चिम आशियातील युद्ध आणि बंद झालेली होर्मुझ सामुद्रधुनी याचा फटका जगाला बसत आहे. द्रव स्वरूपातील नैसर्गिक वायू (एलएनजी – लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) कतार आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) या देशांकडून भारताला मोठ्या प्रमाणात पुरवला जात होता. युद्ध सुरू झाल्यानंतर हा पुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे भारताने एलएनजी आयात करण्यासाठी इतर मार्ग शोधले. आता इतर देशांकडून भारताला एलएनजीचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत आहे. दरम्यान, एलएनजी पुरवठ्यावर फारसा परिणाम होणार नाही, असा अंदाज अनेक देशांना होता. परंतु, तो अंदाज खोटा ठरला. अनेक देशांनी नागरिकांना एलएनजीचा वापर कमी करण्याचे आवाहन केले.
भारतात मार्च महिन्यात एलएनजीचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. मार्च मध्ये भारताला एलएनजी पुरवणारे सर्वात महत्वाचे देश यूएई आणि कतार यांमधून एकही जहाज भारतात आले नाही. त्यावेळी भारतातल्या एलएनजी आयातदारांनी इतर मार्ग शोधणे सुरू केले. भारतातील एलएनजीची तूट ओमान, नायजेरिया, अंगोला आणि अमेरिका या देशांनी भरून काढली होती. भारताला लागणाऱ्या एकूण एलएनजीपैकी ५० टक्के एलएनजी आयात करावा लागतो. आयात कराव्या लागणाऱ्या एकूण एलएनजीपैकी ६० टक्के एलएनजी यूएई आणि कतार या देशांमधून होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे भारतात येतो. हे दोन्ही देश जागतिक पातळीवर देखील महत्वाचे एलएनजी निर्यातदार देश आहेत.
ओमान व इराण दरम्यान अरूंद अशी होर्मुझ सामुद्रधुनी आहे. ही सामुद्रधुनी पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी व अरबी समुद्राशी जोडते. पर्शियन आखातातून जहाजांना बाहेर पडण्यासाठी हा महत्वाचा सागरी मार्ग आहे. पश्चिम आशियात युद्ध पेटल्यानंतर हा मार्ग इराणने बंद केला. या मार्गातून जगाला लागणाऱ्या एकूण तेल व गॅसपैकी २० टक्के तेल व गॅसची जहाजांमार्फत वाहतूक होते.
भारताचा एलएनजी पुरवठा एप्रिल महिन्यात कसा सुरळीत झाला?
कमोडिटी मार्केट एनालिटिक्स फर्म केप्लरच्या डेटानुसार, याचवर्षी मार्च महिन्यात १.६७ दशलक्ष टन, तर एप्रिल महिन्यात १.९५ दशलक्ष टन एलएनजीची भारताने आयात केली. २०२५ या वर्षांत भारताची सरासरी प्रति महिन्याची एलएनजी आयात २.०८ दशलक्ष टन होती. यावर्षी मार्च महिन्यात तुटवडा जाणवल्यानंतर एप्रिलमध्ये भारताची आयात वाढल्याचे दिसून येते. परंतु, तरी एप्रिल २०२५ च्या (२.१५ दशलक्ष टन) तुलनेत एप्रिल २०२६ मध्ये भारताच्या एलएनजी आयातीत ९.३ टक्क्यांनी घट झाली आहे.
होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर भारताने एलएनजीचा सर्वाधिक वापर होणाऱ्या खत निर्मिती क्षेत्रावर बंधने घातली. खत निर्मितीसाठी एलएनजीची आवश्यकता असते. मागील सहा महिन्यांच्या सरासरीच्या फक्त ७० टक्के एलएनजी खत निर्मितीसाठी देण्याचा भारताने निर्धार केला होता. एलएनजी नसल्याने सर्वाधिक नुकसान होत असलेल्या क्षेत्रांना एलएनजी मिळावा म्हणून सरकारने हा निर्णय घेतला होता. परंतु, एप्रिल महिन्यात ९५ टक्के, मे महिन्यात ९८ टक्के एलएनजी खत निर्मितीसाठी वापरण्यास सरकारकडून मुभा देण्यात आली आहे. आगामी खरीप हंगामात खतांची कमतरता भासू नये, म्हणून सरकारकडून दक्षता घेतली जात आहे.
भारताला कोणाकडून मिळतोय एलएनजी?
होर्मुझ सामुद्रधुनीतीला जहाजांची वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर ओमान, नायजेरिया आणि अमेरिका या देशांनी मार्च व एप्रिल महिन्यात भारताची एलएनजीची गरज भागवली. या तीन देशांनी भारताला आयात कराव्या लागणाऱ्या एलएनजीपैकी ६९ टक्के एलएनजी पुरवला. ओमान हा सर्वात मोठा पुरवठादार ठरला. ३० ते ३१ टक्के एलएनजी ओमानने भारताला पुरवला आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीपासून ओमान जवळ असल्याने हे साध्य झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडण्यापूर्वी भारताला एलएनजी पुरवठा करणारा कतार हा सर्वात मोठा देश होता. २०२५ मध्ये सरासरी ०.९५ दशलक्ष टन एलएनजी कतारने पुरवला होता. तर यूएईने सरासरी ०.२७ दशलक्ष टन एलएनजी भारताला पुरवला होता. होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर कतारने मार्च व एप्रिल या दोन महिन्यांत सरासरी ०.०६ दशलक्ष टन, तर यूएईने ०.१३ दशलक्ष टन एलएनजी भारताला पुरवला.
२०२५ मध्ये ओमानने भारताला सरासरी ०.१८ दशलक्ष टन एलएनजी पुरवठा केला होता. आता या वर्षीच्या मार्च व एप्रिल या दोन महिन्यांत ओमानने भारताला १.२ दशलक्ष टन एलएनजी पुरवठा केला आहे. ओमान हा देश पश्चिम आशियात आहे. ओमान आखात आणि अरबी समुद्र या देशाला लाभला आहे. हा देश निर्यातीसाठी होर्मुझ सामुद्रधुनीवर अवलंबून नाही. ओमानप्रमाणेच अमेरिका, नायजेरिया आणि अंगोला या देशांमधून मोठ्या प्रमाणात एलएनजी भारताला पुरवला जात आहे.
जागतिक पातळीवर एलएनजी पुरवठा सुरळीत की विस्कळीत?
सध्या जागतिक पातळीवर सर्वच देशांची एलएनजी मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. “जागतिक पातळीवरील एलएनजी निर्यात एप्रिल २०२६ मध्ये ३२.४ दशलक्ष टन झाली आहे. ती मागील वर्षी एप्रिल महिन्यात ३३.७ टक्के होती. त्यात ३.१८ टक्क्यांची घट झाली आहे. सध्या १६ टक्के एलएनजी निर्यातीवर होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्याने परिणाम झाला आहे”, अशी माहिती जेओफ्रे हुरे यांनी दिली. ते नैसर्गिक वायू आणि एलएनजी डेटा पुरवणाऱ्या ‘सेडीगॅझ’ या संस्थेचे सरचिटणीस आहेत.
कतार व यूएई या देशांकडून दर महिन्याला ६ दशलक्ष टन एलएनजी पुरवला जायचा. तो आता पुरवला जात नाही. ही अभूतपूर्व परिस्थिती आहे, असे जेओफ्रे म्हणाले. परंतु, ही तुट भरून काढण्यासाठी अमेरिका अतिरिक्त २ दशलक्ष टन, कॅनडा अतिरिक्त १ दशलक्ष टन आणि मलेशिया, नायजेरिया, रशिया यांसारखे इतर देश मिळून अतिरिक्त २.४ दशलक्ष टन एलएनजीची निर्मिती करून निर्यात करत आहेत.
“होर्मुझ सामुद्रधुनी उघडली नाही तरी जगाला दर महिन्याला ३२ ते ३३ दशलक्ष टन एलएनजी पुरवला जाईल. पण आता एलएनजीचा खूपच थोडा साठा शिल्लक राहीला आहे”, असे जेओफ्रे म्हणाले. चीन, दक्षिण कोरिया आणि पश्चिम युरोपमधील काही देशांनी एलएनजीची मागणी घटवली आहे. त्यामुळे पुरवठा व मागणी यात समतोल साधला जात आहे, असेही ते म्हणाले.
