AI impact on Indian IT sector 2026 : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील आघाडीची कंपनी अँथ्रोपिकने नुकताच एक सविस्तर अभ्यास प्रसिद्ध केला. या अभ्यासात एआयमुळे जगभरातील नोकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करण्यात आले. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वाधिक फटका कोणत्या क्षेत्रातील नोकऱ्यांना बसू शकतो याची माहितीदेखील या अभ्यासातून देण्यात आली. अँथ्रोपिकच्या या नव्या अभ्यासामुळे जगभरात एकच खळबळ उडाली असून नोकरदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्याविषयीचा हा आढावा…
अँथ्रोपिकच्या अभ्यासात नेमके काय?
एआयने मानवी रोजगार खाऊन टाकण्याविषयी केल्या जात असलेल्या भाकितांमध्ये एलएलएमचा (लार्ज लँग्वेज मॉडेल) मोठा वाटा आहे. यामध्ये प्रामुख्याने कॉम्प्युटर प्रोग्रामर्स, कस्टमर सर्व्हिस प्रतिनिधी आणि फायनान्स क्षेत्रातील विश्लेषकांचा समावेश आहे. या क्षेत्रातील नोकऱ्या सर्वात जास्त जोखमीच्या श्रेणीत ठेवण्यात आल्या आहेत. सध्या काही क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मर्यादित असला तरीही भविष्यात बहुतेक कामे त्याद्वारेच होतील. विशेषतः व्यवसाय आणि वित्त, व्यवस्थापन, संगणक विज्ञान, गणित, अभियांत्रिकी, कायदा आणि कार्यालयीन प्रशासन या क्षेत्रांमधील अनेक कामांवर एआयचा मोठा प्रभाव पडू शकतो. त्याउलट बांधकाम, शेती, संरक्षण सेवा आणि वैयक्तिक देखभाल सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये एआयचा सैद्धांतिक वापर मर्यादित असू शकतो, त्यामुळे या क्षेत्रांतील नोकऱ्या इतर काही क्षेत्रांच्या तुलनेत एआयच्या परिणामापासून अधिक सुरक्षित राहू शकतात, असे अँथ्रोपिकने आपल्या अभ्यासात नमूद केले आहे.
कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका?
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होऊ शकतो हे समजून घेण्यासाठी संशोधकांनी तीन प्रमुख आधारांचा वापर केला. सर्वप्रथम त्यांनी अमेरिकेच्या सरकारी डेटाबेसमधून ८०० प्रकारच्या नोकऱ्यांशी संबंधित सर्व कामांची यादी तयार केली. त्यानंतर एआयमुळे कोणती कामे अधिक वेगाने पूर्ण होऊ शकतात याबाबतचा सविस्तर अभ्यास केला. यादरम्यान कामाच्या ठिकाणी लोक ‘क्लाउड’सारख्या एआयचा वापर नक्की कशासाठी करत आहेत, याची आकडेवारीही गोळा करण्यात आली. या मोजमापाची तुलना अमेरिकन सरकारच्या रोजगारवाढीच्या अंदाजांशी व बेरोजगारीच्या सर्वेक्षणांशी करण्यात आली. त्याद्वारे एआयचा अधिक प्रभाव असलेल्या नोकऱ्यांमध्ये बेरोजगारीचा दर तपासण्यात आला.
आणखी वाचा : एकाच ब्लड टेस्टने ओळखता येणार सर्व प्रकारचे कॅन्सर? तज्ज्ञांचे मत काय? संशोधन काय सांगते?
तरुण कामगारांना मोठा फटका
अहवालातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे- ‘चॅट जीपीटी’ वापरात आल्यापासून तरुण कामगारांच्या भरतीत मोठी घट झाल्याचे दिसून आले. विशेषतः २२ ते २५ वयोगटातील तरुणांमधील नोकऱ्यांचे प्रमाण २०२२ च्या उत्तरार्धापासून सुमारे १४ टक्क्यांनी कमी झाले. सध्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करीत नसल्या तरीही नवीन भरतीसाठी दरवाजे बंद झाल्याचे अभ्यासातून दिसून आले. ग्रॅज्युएट प्रोग्राम्स, एंट्री-लेव्हल अॅनालिस्ट पदे आणि ज्युनिअर डेव्हलपर पदांची भरती विशेषतः कमी झाली आहे. या परिणामांचा मोठा प्रभाव दिसून येईपर्यंत एंट्री-लेव्हल रोजगार बाजार किमान दोन वर्षांपेक्षा जास्त काळ प्रभावित झालेला असू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. एआयच्या प्रभावाखाली येणाऱ्या नोकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैशिष्ट्ये इतर नोकरदारांपेक्षा लक्षणीयरीत्या वेगळी असल्याचेही अभ्यासातून समोर आले आहे.
एआयचा प्रभाव कोणावर अधिक?
अभ्यासानुसार एआयच्या प्रभावाखाली येणाऱ्या नोकऱ्यांमध्ये काही विशिष्ट गटांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. एआयचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या गटामध्ये महिलांचे प्रमाण ५४.४ टक्के आहे; तर सुरक्षित गटामध्ये हे प्रमाण केवळ ३८.८ टक्के आहे. पदवीपर्यंतचे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेल्या व्यक्तींच्या नोकऱ्यांवर एआयचा सर्वाधिक प्रभाव दिसून येत आहे. पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या एआयचा कमी प्रभाव असलेल्या गटाच्या तुलनेत जवळपास चार पट अधिक आहे. उच्च जोखीम असलेल्या गटामध्ये श्वेतवर्णीय आणि आशियाई कर्मचाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्या तुलनेत हिस्पॅनिक आणि कृष्णवर्णीय कर्मचाऱ्यांवरील प्रभाव कमी दिसून आला आहे. या नोकऱ्यांमधील कर्मचाऱ्यांचे सरासरी वय इतर सुरक्षित गटातील कर्मचाऱ्यांपेक्षा थोडे जास्त आहे.
आयटी क्षेत्राला एआयचा मोठा फटका?
अँथ्रोपिकचा हा अभ्यास अमेरिकन डेटावर आधारित असला तरीही भारतातील रोजगारावरही एआयचा प्रभाव झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. देशातील महत्त्वाच्या उद्योगांसाठी हा मोठा धोका ठरण्याची शक्यता आहे. भारतामध्ये लोकसंख्येच्या मोठ्या भागामध्ये गणित आणि विज्ञान विषयांतील कौशल्यांची कमतरता असल्याचेही समोर आले आहे. त्यातच शिक्षण, संशोधन आणि विकासावर होणारा कमी खर्च ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. गेल्या महिन्यात भारतातील आयटी सेवा क्षेत्रावर एआयमुळे मोठा दबाव निर्माण झाल्याचे दिसून आले. एआयमुळे अनेक पारंपरिक कामे कालबाह्य होण्याची शक्यता व्यक्त झाल्याने या क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. एआयमुळे पुढील चार वर्षांत आयटी सेवा कंपन्यांच्या महसुलामध्ये ९ ते १२ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. दरवर्षी महसूल वाढीवर जवळपास २ टक्क्यांचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे भाकीत मोतीलाल ओसवाल या संस्थेच्या विश्लेषकांनी केले आहे.
हेही वाचा : युद्धाचा भडका उडूनही सोने-चांदीचा भाव का कोसळला? तज्ज्ञांनी सांगितली ५ महत्वाची कारणे
एआयच्या लाटेमुळे नोकऱ्या जाणार?
एआयमुळे अनेक क्षेत्रांत झपाट्याने बदल होत आहेत. त्याचा वापर वाढल्याने आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर पर्सिस्टंट सिस्टीम्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे यांनी जगातील एआयची लाट आणि त्यामुळे होणारा परिणाम यावर भाष्य केले आहे. भारतामध्ये माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम प्रगती होत आहे. सध्या दिसून येत असलेली एआयची लाट दीर्घकाळ कायम राहणार आहे, त्यामुळे या क्षेत्रात काम करण्याच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. उद्योगांना या तंत्राचा चांगला फायदा होणार असल्याने आपण या नव्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. माहिती-तंत्रज्ञानामध्ये आलेली पहिली लाट ही कनेक्टिव्हिटीची, दुसरी लाट मंच आणि विविध प्रणाली यांची होती. सध्या आलेली लाट ही कृत्रिम प्रज्ञेची असल्याचे सांगताना कृत्रिम प्रज्ञेचा मंच मोठा असून, त्यामध्ये काम करण्यासाठी नव्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत आणि कामाची कोणतीही कमतरता नाही, असे देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.
