मानवाशिवाय पृथ्वीवर जीवन सुरू राहील, ही कल्पना करणे अनेकांना कठीण वाटते. आपल्या प्रजातीला पृथ्वीवर फार मोठा कालावधी झालेला नाही, पण या कमी काळातही आपण पृथ्वीवर मोठे बदल घडवले आहेत. जमिनीपासून समुद्रापर्यंत सर्वत्र मानवी हस्तक्षेपाची छाप दिसते. तरीही पृथ्वीचा इतिहास सांगतो की कोणतीही प्रजाती कायम टिकत नाही. भविष्यात मानव नसतील, ही कल्पना थोडी अस्वस्थ करणारी असली तरी त्यानंतर पृथ्वीवर काय होईल, हे जास्त औत्सुक्याचे आहे.

मानव नष्ट झाल्यावर काय होईल?

मानव हजारो वर्षांपासून पृथ्वीच्या पर्यावरणात बदल घडवून आणत आहे. आपल्या वैज्ञानिक शोधांमुळे माणसाने जंगल, समुद्र आणि अगदी वातावरणही बदलले. पण पृथ्वीवरील अनेक प्रजाती वेगवेगळ्या कारणांनी कालांतराने नामशेष झाल्या. ज्या पद्धतीने निसर्गाची हानी होत आहे, पृथ्वीवर संहार घडत आहे, वातावरण बदलाचे भयंकर परिणाम आपल्याला सहन करावे लागत आहेत, ते पाहता समजा असे गृहित धरले की माणूसही काही वर्षांनंतर पृथ्वीवरून नामशेष होईल, तर त्यानंतर कोण राहील हे अधिक औत्सुक्याचे आहे. अनेक संशोधकांचे मत आहे की मानव नष्ट झाल्यावर निसर्ग पुन्हा स्वतःला जुळवून घेईल. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की मग पृथ्वीवर मानवाच्या जागी कोण येईल?

ऑक्सफर्डचा अभ्यास काय सांगतो?

ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापक टिम कॉल्सन यांनी जीवशास्त्र आणि उत्क्रांतीवर अनेक वर्षे संशोधन केले आहे. त्यांच्या मते, मानव नष्ट झाल्यास पृथ्वीवर काही नवीन आणि अनपेक्षित प्रजाती उदयास येऊ शकतात आणि त्या पर्यावरणातील महत्त्वाच्या भूमिका निभावू शकतात. त्यांच्या ‘द युनिव्हर्सनल हिस्ट्री ऑफ अस’ या पुस्तकात त्यांनी जीवनाचा संपूर्ण इतिहास मांडला आहे आणि भविष्यात काय घडू शकते याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्क्रांती म्हणजे कालांतराने जीवांमध्ये होणारे हळूहळू बदल, ज्यामुळे ते आपल्या वातावरणाशी अधिक चांगले जुळवून घेतात. बहुतांश जनुकीय बदल (म्युटेशन) हानिकारक असतात, पण काही बदल जिवाला टिकून राहण्याचा फायदा देतात. असे फायदेशीर बदल पुढील पिढ्यांमध्ये वाढत जातात.

कॉल्सन यांच्या मते म्युटेशनमुळेच जीवन पुढे जात राहते. पण ते सांगतात की कोणतीही प्रजाती कायमची टिकत नाही. ते लिहतात, “प्रत्येक प्रजातीचा शेवटी नाश होतो – त्यात मानवही अपवाद नाही. मात्र हा काळ खूप दूर असावा, अशी आशा आहे.” हे ऐकताना अस्वस्थ वाटू शकते, पण यामुळे एक गोष्ट लक्षात येते की कितीही यशस्वी प्रजाती असली तरी तिचा शेवट कधीतरी होतोच.

नवे जीव अधिक बुद्धिमान?

मानव नष्ट झाल्यावर पृथ्वीवरील परिसंस्था पुन्हा संतुलित होऊ शकतात. त्यामुळे नवीन प्रजाती विकसित होण्याची संधी मिळू शकते. भविष्यातील बुद्धिमान प्रजाती मानवांसारखीच असेलच असे नाही. कॉल्सन यांच्या मते, “बुद्धिमत्तेचे आणि गुंतागुंतीचे नवे प्रकार अनपेक्षित पद्धतीने विकसित होऊ शकतात.” काही जणांना वाटते की माकडांसारख्या प्रायमेट (एपसारख्या) प्रजाती मानवांची जागा घेऊ शकतात. पण कॉल्सन याबाबत शंका व्यक्त करतात. त्यांच्या मते प्रायमेट प्रजातींना मजबूत सामाजिक गटांवर अवलंबून राहावे लागते आणि त्यामुळे मोठ्या पर्यावरणीय बदलांशी जुळवून घेणे त्यांच्यासाठी कठीण ठरू शकते.

पहिल्या सजीवापासून मानवापर्यंतची उत्क्रांती

पृथ्वीवर सुमारे ३.५–४ अब्ज वर्षांपूर्वी समुद्रात अतिशय साधे, एकपेशीय जीव निर्माण झाले. हे आजच्या जीवाणूंसारखे होते. हेच पहिले सूक्ष्म सजीव. या प्रकारच्या काही सजीवांनी सुमारे २५० कोटी वर्षांपूर्वी सूर्यप्रकाशातून अन्न तयार करणे सुरू केले. यामुळे वातावरणात ऑक्सिजन वाढला. हे काम प्रामुख्याने सायनोबॅक्टेरिया (एक प्रकारचे शैवाल) यांनी केले. सुमारे २०० कोटी वर्षांपूर्वी केंद्रक असलेल्या अधिक विकसित पेशी तयार झाल्या. सुमारे ६० कोटी वर्षांपूर्वी अनेक पेशींनी बनलेले जीव निर्माण झाले. त्यातून पुढे वनस्पती आणि प्राणी विकसित झाले.

सुमारे ५० कोटी वर्षांपूर्वी मासे आणि इतर जटिल समुद्री प्राणी तयार झाले. जमिनीवर येणारे प्राणी सुमारे ३७ कोटी वर्षांपूर्वी उत्क्रांत झाले. सरपटणारे प्राणी, डायनोसोर आणि अन्य सस्तन प्राणी सुमारे २५–२० कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाले. सरपटणारे प्राणी, डायनासोर आणि नंतर सस्तन प्राणी निर्माण झाले. माकडासारखे प्राणी सुमारे ६–७ कोटी वर्षांपूर्वी विकसित झाले. माणसाचे पूर्वज सुमारे २०–३० लाख वर्षांपूर्वी विकसित झाले. आजचा आधुनिक माणूस म्हणजेच होमो सेपियन्स सुमारे ३ लाख वर्षांपूर्वी उदयाला आले.

मानवाच्या जागी ऑक्टोपस?

कॉल्सन एक वेगळीच शक्यता मांडतात – ती म्हणजे ऑक्टोपस (अष्टपाद). ऑक्टोपस अतिशय हुशार आणि परिस्थितीशी पटकन जुळवून घेणारे असतात. ते रंग बदलून एकमेकांशी संवाद साधू शकतात, गुंतागुंतीच्या समस्या सोडवू शकतात आणि वस्तू हाताळू शकतात. योग्य परिस्थिती मिळाली तर ते भविष्यात प्रगत संस्कृती निर्माण करू शकतील, असे कॉल्सन यांचे मत आहे. त्यांच्या मते, ऑक्टोपसची प्रगत मज्जासंस्था, वेगळी मेंदू रचना आणि समस्या सोडवण्याची क्षमता त्यांना बदलत्या जगात टिकण्यासाठी योग्य बनवते.

‘काही संशोधन केंद्रांमध्ये ऑक्टोपस रात्री त्यांना ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतून (टँकमधून) बाहेर पडून शेजारच्या टँकमध्ये जातात, असेही आढळले आहे. ते साधने वापरू शकतात, बाटल्या उघडू शकतात आणि त्यांच्यात कुतूहलही दिसते,’ असे कॉल्सन म्हणतात.

भविष्यात समुद्राची भूमिका महत्त्वाची?

जर मानव नसतील, तर पृथ्वीच्या भविष्यात समुद्र अधिक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. मात्र ऑक्टोपससमोर एक मोठी अडचण आहे – त्यांच्याकडे हाडांचा सांगाडा नसतो. त्यामुळे जमिनीवर वेगाने हालचाल करणे त्यांच्यासाठी कठीण आहे. तरीही उत्क्रांतीच्या प्रक्रियेत भविष्यात ते पाण्याबाहेर श्वास घेण्याची क्षमता विकसित करू शकतात आणि जमिनीवरील प्राण्यांची शिकार करू शकतात, अशी शक्यता कॉल्सन व्यक्त करतात.

ऑक्टोपसचे जग कसे असेल?

भविष्यात ऑक्टोपस समुद्राखाली मोठ्या वसाहती तयार करू शकतात, नवीन तंत्रज्ञान विकसित करू शकतात आणि कदाचित एक दिवस जमिनीवरही येऊ शकतात. कॉल्सन म्हणतात, “ऑक्टोपस समुद्राखाली प्रचंड शहरे उभारतील आणि श्वास घेण्यासाठी उपकरणे घालून जमिनीवर येऊन शिकार करतील का? काहीही घडू शकते. आपल्याला ते ठामपणे सांगताही येणार नाही.”

अचानक होणारे मोठे नाश, जनुकीय बदल आणि लोकसंख्येतील घट असे अनेक बदल, अनेक अनपेक्षित घटक उत्क्रांतीवर प्रभाव टाकतात. पृथ्वीवरील जीवनाचे भविष्य अनेक घटकांवर अवलंबून आहे. उत्क्रांतीचा मार्ग कधी कधी अनपेक्षित वळण घेतो. तरीही कॉल्सन म्हणतात त्याप्रमाणे जर मानव आणि इतर प्रायमेट प्रजाती नष्ट झाल्या, तर ऑक्टोपस भविष्यात समुद्रातील सर्वात बुद्धिमान जीव बनू शकतात. कॉल्सन यांचा असा दावा नाही की हे नक्कीच घडेल. पण यामुळे निसर्ग मानवाशिवाय कसा बदलू शकतो याचा विचार करण्यास प्रवृत्त केले जाते. पृथ्वीच्या इतिहासात अनेक मोठे संकटे आली, तरी जीवन टिकून राहिले. त्यामुळे भविष्यातही काही ना काही स्वरूपात बुद्धिमान जीवन पुन्हा उदयास येऊ शकते.