scorecardresearch

विश्लेषण: फुटबॉल विश्वातील नवतारे! यंदा विश्वचषकात या युवा खेळाडूंनी वेधले लक्ष!

या स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करून स्वतःचा दर्जा सिद्ध करण्याची, नावलौकिक मिळवण्याची विशेषतः युवा खेळाडूंना संधी

विश्लेषण: फुटबॉल विश्वातील नवतारे! यंदा विश्वचषकात या युवा खेळाडूंनी वेधले लक्ष!
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतही काही युवा खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले (फोटो – रॉयटर्स/ लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

-अन्वय सावंत

फुटबॉल विश्वचषक ही खेळांतील सर्वांत मोठी आणि लोकप्रिय स्पर्धा मानली जाते. विश्वचषकावर नाव कोरणे हे प्रत्येकच सहभागी संघाचे स्वप्न असते. मात्र खेळाडूंसाठी वैयक्तिक दृष्ट्याही विश्वचषक स्पर्धा महत्त्वाची असते. या स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करून स्वतःचा दर्जा सिद्ध करण्याची, नावलौकिक मिळवण्याची विशेषतः युवा खेळाडूंना संधी असते. यंदा कतार येथे सुरू असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतही काही युवा खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. याच खेळाडूंवर एक नजर.

रिचार्लिसन (आघाडीपटू, ब्राझील)

ब्राझीलच्या संघाचे दोन दशकांपासूनचा विश्वचषक विजयाचा दुष्काळ संपवण्याचे स्वप्न अधुरे राहिले. मात्र, ब्राझीलच्या काही युवा खेळाडूंनी यंदाच्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आणि यात २५ वर्षीय रिचार्लिसनचे नाव आघाडीवर होते. रिचार्लिसनने ब्राझील फुटबॉलमध्ये प्रतिष्ठेची मानली जाणारी ९ क्रमांकाची जर्सी परिधान करताना आघाडीपटूची भूमिका चोख बजावली. क्लब फुटबॉलमध्ये टॉटनहॅमचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रिचार्लिसनने विश्वचषकाच्या पाच सामन्यांत तीन गोल केले. त्याने सर्बियाविरुद्ध सलामीच्या लढतीत दोन गोल नोंदवले होते आणि यापैकी दुसरा गोल आतापर्यंतच्या स्पर्धेतील सर्वोत्तम गोल होता. त्याने ‘ओव्हरहेड किक’ मारून गोल करत चाहत्यांना थक्क करून सोडले.

व्हिनिशियस ज्युनियर (आक्रमक, ब्राझील)

रिचार्लिसनने ‘ओव्हरहेड किक’ मारून केलेल्या गोलसाठी आक्रमक व्हिनिशियस ज्युनियरने साहाय्य केले होते. रिचार्लिसन आणि नेयमार यांच्यासह व्हिनिशियसने ब्राझीलच्या आक्रमणाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. आक्रमणात डाव्या बाजूने खेळणारा व्हिनिशियस चेंडूवर ताबा मिळवून थेट प्रतिस्पर्ध्याच्या गोलकक्षाकडे धावतो. तसेच वेगवान खेळ करणाऱ्या व्हिनिशियसला रोखणे प्रतिस्पर्धी बचावपटूंना अवघड जाते. क्लब फुटबॉलमध्ये रेयाल माद्रिदकडून खेळणाऱ्या २२ वर्षीय व्हिनिशियसने गेल्या काही हंगामांत सातत्यपूर्ण कामगिरी करताना आपला ठसा उमटवला आहे. त्याने गेल्या हंगामातील ५२ सामन्यांत २२ गोल, तर सध्याच्या हंगामात २१ सामन्यांत १० गोल केले आहेत.

ज्युड बेलिंगहॅम (मध्यरक्षक, इंग्लंड)

इंग्लंडचा १९ वर्षीय मध्यरक्षक ज्युड बेलिंगहॅम सध्याच्या घडीला विश्वातील सर्वांत प्रतिभावान युवा खेळाडूंपैकी एक मानला जातो. चेंडू मिळताच संयम राखून योग्य पास देणे, प्रतिस्पर्ध्याच्या खेळाडूकडून चेंडू काढून घेणे आणि चेंडूवर ताबा मिळवताना प्रतिस्पर्धी संघाच्या बचावावर हल्ला करणे, ही बेलिंगहॅमच्या खेळाची वैशिष्ट्ये आहेत. त्याने यंदाच्या विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली. इंग्लंडच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंतच्या प्रवासात बेलिंगहॅमची भूमिका महत्त्वाची होती. त्याने सलामीच्या लढतीत इराणविरुद्ध गोलही नोंदवला. बेलिंगहॅम सध्या जर्मनीतील क्लब बोरुशिया डॉर्टमंडचे प्रतिनिधित्व करतो. मात्र, लिव्हरपूल, चेल्सी आणि रेयाल माद्रिद यांसारखे युरोपातील आघाडीचे क्लब त्याला आपल्या संघात दाखल करून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

जोस्को ग्वार्डियोल (बचावपटू, क्रोएशिया)

लुका मॉड्रिच आणि माटेओ कोव्हाचिच या क्रोएशियाच्या तारांकित मध्यरक्षकांप्रमाणे बचावपटू जास्को ग्वार्डियोलचा प्रवास डिनामो झाग्रेब क्लबपासून सुरू झाला. त्याने २०१९-२०च्या हंगामात झाग्रेबकडून व्यावसायिक फुटबॉलमध्ये पदार्पण केले. त्यानंतर जर्मन क्लब आर लिपझिगने त्याला संघात समाविष्ट करून घेतले. गेल्या काही काळापासून त्याचे चेल्सीसोबत नाव जोडले जात आहे. मात्र, विश्वचषकातील त्याच्या दर्जेदार कामगिरीनंतर चेल्सीसह युरोपातील अन्य आघाडीचे संघही त्याला खरेदी करण्यासाठी उत्सुक असतील. डाव्या पायाने खेळणारे बचावपटू क्वचितच आढळतात आणि ग्वार्डियोलची हीच बाब खास ठरते. उंचपुरा, दणकट शरीरयष्टीचा २० वर्षीय ग्वार्डियोल भक्कम बचावासाठी ओळखला जातो. त्याने विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलच्या नेयमारला अनेकदा रोखले. तसेच तो आक्रमणातही योगदान देऊ शकतो.

गावी (मध्यरक्षक, स्पेन)

यंदाच्या विश्वचषकातील स्पेनच्या संघात बऱ्याच युवा खेळाडूंचा समावेश होता. यापैकी १८ वर्षीय मध्यरक्षक गावीने सर्वांत प्रभावशाली कामगिरी केली. मेसी, शावी, इनिएस्टा यांसारखे दिग्गज फुटबॉलपटू घडवणाऱ्या बार्सिलोनाच्या ‘ला मसिया’ अकादमीत गावीने फुटबॉलचे धडे गिरवले. त्याने वयाच्या १६व्या वर्षी बार्सिलोनाच्या वरिष्ठ संघाकडून पदार्पण केले. बार्सिलोनाकडून केवळ पाच सामने खेळल्यानंतर त्याची स्पेनच्या संघात निवड झाली. त्याने वयाच्या १७व्या वर्षी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण करताना ८५ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. शावी आणि इनिएस्टा यांच्याप्रमाणे चेंडूवर नियंत्रण, अचूक पास, कमी जागेतही चेंडू खेळवता ठेवणे ही गावीच्या खेळाची वैशिष्ट्ये आहेत. यंदाच्या विश्वचषकात कोस्टा रिकाविरुद्ध त्याने गोलही केला. यंदा स्पेनचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले, पण गावी, पेड्री, अंसू फाटी यांसारख्या युवकांमुळे स्पेनच्या संघाचे भविष्य उज्ज्वल आहे.

जमाल मुसियाला (मध्यरक्षक, जर्मनी)

जर्मनीला सलग दुसऱ्यांदा साखळी फेरीचा टप्पा ओलांडण्यात अपयश आले. मात्र, जर्मनीचा १९ वर्षीय मध्यरक्षक जमाल मुसियालाने अप्रतिम कामगिरी करताना सर्वांचे लक्ष वेधले. मध्यरक्षक असूनही एखाद्या आघाडीपटूप्रमाणे गोल करण्याची मुसियालामध्ये क्षमता आहे. तसेच तो इतरांसाठी संधीही निर्माण करू शकतो. क्लब फुटबॉलमध्ये बलाढ्य बायर्न म्युनिकचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुसियालाचा जन्म जर्मनीत झाला. वयाच्या सातव्या वर्षी तो इंग्लंडमध्ये वास्तव्यास गेला. त्याने चेल्सीच्या अकादमीत फुटबॉलचे धडे गिरवले. तसेच तो इंग्लंडच्या विविध वयोगटांतील संघांकडून खेळला. मात्र, इंग्लंड वरिष्ठ संघात संधी न मिळाल्याने त्याने जर्मनीचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला. त्याने गेल्या दोन हंगामांमध्ये बायर्नकडूनही चमकदार कामगिरी केली आहे.

कोडी गाकपो (आक्रमक, नेदरलँड्स)

नेदरलँड्सच्या संघाने यंदा विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली. नेदरलँड्सच्या या यशात आक्रमकपटू कोडी गाकपोची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. २३ वर्षीय गाकपोने साखळी फेरीतील तीनही सामन्यांत (सेनेगल, इक्वेडोर आणि कतारविरुद्ध) गोल केले. बाद फेरीत त्याला गोल करता आला नाही, पण त्याने अन्य विभागांत योगदान दिले. क्लब फुटबॉलमध्ये नेदरलँड्समधील पीएसव्ही संघाचे गाकपो प्रतिनिधित्व करतो. मात्र, इंग्लंडमधील आघाडीचा संघ मँचेस्टर युनायटेड त्याला खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याने पीएसव्हीकडून यंदाच्या हंगामात २४ सामन्यांत १३ गोल केले आहेत.

गोन्सालो रामोस (आघाडीपटू, पोर्तुगाल)

विश्वचषकाची उपउपांत्यपूर्व फेरी, प्रथमच विश्वचषकाच्या सामन्यात सुरुवातीपासून खेळण्याची संधी मिळणे आणि त्यातही देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडूची जागा घेणे…पोर्तुगालच्या गोन्सालो रामोसवर ही अशक्यप्राय वाटणारी जबाबदारी होती. मात्र, याचे दडपण घेण्याऐवजी त्याने या संधीचे सोने केले. उपउपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी ख्रिस्तियानो रोनाल्डोला अंतिम ११मधून वगळण्यात आले आणि त्याच्या जागी पोर्तुगालच्या आक्रमणाची धुरा २१ वर्षीय रामोसवर सोपवण्यात आली. त्याने ही धुरा यशस्वीपणे सांभाळताना हॅटट्रिक नोंदवली. विश्वचषकाच्या बाद फेरीत हॅटट्रिक करणारा तो ३२ वर्षांतील पहिला खेळाडू ठरला. तो क्लब फुटबॉलमध्ये पोर्तुगीज संघ बेन्फिकाचे प्रतिनिधित्व करतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-12-2022 at 09:02 IST

संबंधित बातम्या