Premium

International Kissing Day: चुंबनाची परंपरा नक्की कोणाची? भारताची की मेसोपोटेमियाची? काय सांगतेय नवीन संशोधन ?

Who invented the tradition of kissing? परंतु नवीन संशोधनाने भारतात चुंबन विकसित झाले या संशोधनाला आव्हान दिले आहे.

international kissing day
आंतरराष्ट्रीय चुंबन दिवस

International Kissing Day, 2023 चुंबन हे भारताचे की मेसोपोटेमियाचे असा वाद सध्या जागतिक स्तरावर नव्याने सुरू झाला आहे. आजपर्यंत वैदिक भारतीयांना अधर चुंबनाचे म्हणजेच ओठावरील चुंबनाचे प्रणेते मानले जात होते. अॅलेक्झांडर द ग्रेट याने इसवी सन पूर्व ३२६ मध्ये म्हणजेच आजपासून जवळपास तब्बल २५०० वर्षांपूर्वी भारतातून मायदेशी परत जाताना प्रणय चुंबनाची परंपरा आपल्यासोबत युरोपात नेली, असा एक प्रसिद्ध सिद्धांत आहे. परंतु याच सिद्धांताला छेद जाणारे नवीन संशोधन चुंबनाचे मूळ मेसोपोटेमिया संस्कृतीत असल्याचा दावा करणारे आहे. हे नवीन संशोधन ‘सायन्स जर्नल’मध्ये प्रकाशित झाले आहे. ‘चुंबनाचा प्राचीन इतिहास’ या शीर्षकाखाली कोपनहेगन विद्यापीठाल Troels Pank Arbøll व ऑक्सफर्ड विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ Sofie Rasmussen यांनी हा संशोधनप्रबंध प्रकाशित केलेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चुंबनातून जंतूसंसर्ग !

या शोधप्रबंधात म्हटल्याप्रमाणे पूर्वी इतर अभ्यासकांनी मांडलेल्या संशोधनानुसार इसवी सन पूर्व १५०० असा कालखंड सांगितलेल्या वैदिक वाङ् मयात प्रणय चुंबनाची प्राचीन नोंद सापडते. परंतु नव्या संशोधनानुसार मेसोपोटेमिया संस्कृतीतील चुंबनाचा प्राचीन पुरावा इसवीसन पूर्व २५०० या कालखंडातील आहे. मेसोपोटेमिया म्हणजे आजच्या इराण व इराक या भागात आढळलेली प्राचीन संस्कृती. जगातील चार प्राचीन नागरी संस्कृतींमध्ये मेसोपोटेमिया व भारतीय सिंधू संस्कृतीचा समावेश होतो. या नवीन संशोधनानुसार प्राचीन चुंबनाचा पुरावा भारतातील नाही, तर मध्य पूर्वेतील संस्कृतींमध्ये आढळतो असे नमूद करण्यात आले आहे. पारंपरिक धारणेनुसार HSV-1 या जंतूंचा संसर्ग प्रणय चुंबनातून झाला असे मानण्यात येत होते, या धारणेत किती सत्यता आहे याचा पडताळा करण्याचा प्रयत्न या संशोधनात करण्यात आला आहे.

आणखी वाचा :विश्लेषण: Same-sex relationship: समलिंगी संकल्पना भारतासाठी नवीन आहे का ?

चुंबनाचा इतिहास नेमका किती जुना ?

चुंबन ही एक नैसर्गिक प्रेरणा आहे. त्यामुळेच सृष्टीच्या प्रारंभापासून ते अस्तित्त्वात असणारच, म्हणूनच ते कोणत्याही एका संस्कृतीची मक्तेदारी असू शकत नाही. असे असले तरी चुंबनाचा वस्तुनिष्ठ पुरावा मानवी उत्क्रांतीतील ‘निएंडरथल्’ व मानवाच्या इतर पूर्वजांनी तब्बल एक लाख वर्षांपूर्वी घेतलेल्या चुंबनाचा सापडतो, हे या नव्या संशोधनाच्या माध्यमातून सिद्ध करण्यात आले आहे. दस्तावेजीय पुराव्यांनुसार भारतात चुंबनाचा सर्वात प्राचीन पुरावा असल्याचे मानले जात होते. टेक्सास ए अॅण्ड एम विद्यापीठाचे मानववंशशास्त्रज्ञ व प्राध्यापक दिवंगत वॉन ब्रायंटन यांनी केलेल्या संशोधनाचा दाखला अनेकदा या सिद्धांताचे समर्थन करण्यासाठी दिला जातो. ब्रायंटन यांच्या म्हणण्यानुसार इसवीसन पूर्व १५०० वर्षांपूर्वी वैदिक वाङ् मयात अधरावर स्पर्श करून करण्यात येणाऱ्या चुंबनाचे पुरावे आहेत. त्यांच्याच मतानुसार अलेक्झांडर द ग्रेटने भारतीय चुंबनाचा प्रसार युरोपात केला. ब्रायंटन यांनी नमूद केल्याप्रमाणे जगात इतरत्र कुठेही प्रणय अधर चुंबनाचे इतके प्राचीन पुरावे सापडत नाही, ते केवळ भारतात वेदांमध्येच सापडतात. प्रेमिकांमध्ये एकमेकांवर नाक घासण्याचे संदर्भ भारतात सापडतात. हे प्रेमिकांमधील स्नेहाचे लक्षण आहे. …हाच तो क्षण, पुढे चुंबन स्वरूपात अस्तित्त्वात आला, असा सिद्धांत त्यांनी मांडला आहे. वैदिक साहित्यानंतर महाभारत, कामसूत्र अशा अनेक ग्रंथांमध्ये ‘अधर प्रणया’चे संदर्भ सापडतात. परंतु नवीन संशोधनाने भारतात चुंबन विकसित झाले या संशोधनाला आव्हान दिले आहे.

नवीन संशोधन काय सांगतेय ?

नवीन संशोधनानुसार, प्राचीन मेसोपोटेमिया आणि इजिप्तमध्ये साधारणपणे इसवी सन पूर्व २५०० पासून कामूक स्वरूपाचे चुंबन अस्तित्त्वात होते. किंबहुना या संदर्भात त्यांनी चुंबनाचे असलेले ठोस पुरावे दाखवून दिले आहेत. हा पुरावा प्रामुख्याने मेसोपोटेमियातील मातीच्या फलकावर लिहिलेल्या सुमेरियन आणि अक्कडियन भाषांमधील नोंदींमधून मिळतो. सुमेरियन प्राचीन ग्रंथांमध्ये कामूक चुंबनाचा संदर्भ येतो. अक्कडियन भाषेत, चुंबनाचे संदर्भ दोन श्रेणींमध्ये येतात – पहिला संदर्भ “मैत्रीपूर्ण आणि कौटुंबिक स्नेह” या अर्थाने आहे. तर दुसरा संदर्भ “कामुक कृती”शी संबंधित आहे. शिवाय, संशोधकांनी नोंदविल्याप्रमाणे मेसोपोटेमिया संस्कृतीशी संबंधित ऐन साखरी (बेथलेहेम जवळ) आणि माल्टा या पुरातत्त्वीय स्थळांवर सापडलेली दोन प्रागैतिहासिक शिल्प ही लेखनाचा शोध लागण्यापूर्वी मानवांने रोमँटिकपणे चुंबन घेण्यास सुरुवात केली होती, याचा सबळ पुरावा सादर करतात. त्यामुळेच चुंबनाचे जनकत्त्व भारतीय संस्कृतीत नसून ते मेसोपोटेमिया या संस्कृतीत आहे, असा दावा या नव्या संशोधनात करण्यात आला आहे.

आणखी वाचा : विश्लेषण : ‘हनी ट्रॅप’ का ठरत आहे भारतीय संरक्षण यंत्रणेसाठी डोकेदुखी ?

नवीन संशोधकांच्या दाव्यात किती तथ्यता आहे?

नवीन संशोधनात अभ्यासकांनी म्हटल्याप्रमाणे हे नक्कीच खरे आहे की चुंबन हे कुठल्याही एका संस्कृतीची मक्तेदारी असू शकत नाही. ही एक नैसर्गिक प्रेरणा आहे. परंतु ऐतिहासिक व पुरातत्त्वीय पुराव्यांच्या आधारे ज्या वेळेस चुंबनासारख्या प्रक्रियेची प्राचीनता पडताळून पाहिली जाते, त्या वेळेस अनेक गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्यात मुख्य बाब म्हणजे कालखंड. एखाद्या प्रसंगाची, घटनेची किंवा क्रियेची प्राचीनता ठरविताना काळ महत्त्वाचा असतो. नवीन संशोधनात नमूद केल्याप्रमाणे वैदिक वाङ् मयाचा काळ इसवी सनपूर्व १५०० इतका देण्यात आला आहे. म्हणजेच आजपासून ३८०० वर्षांपूर्वी वैदिक काळ अस्तित्त्वात होता. परंतु इथे एक लक्षात घेण्याचा मुद्दा असा की वेगवेगळ्या अभ्यासकांनी वैदिक काळासाठी दिलेली तारीख वेगवेगळी आहे. प्रसिद्ध पुरातत्त्व अभ्यासक डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांनी नमूद केल्याप्रमाणे वैदिक काळ हा हडप्पा संस्कृतीशी समकालीन आहे. म्हणजेच त्यांच्या म्हणण्यानुसार वैदिक संस्कृती हीच हडप्पा म्हणजे सिंधू संस्कृती आहे. संस्कृत अभ्यासक वैदिक काळ हा इसवी सन पूर्व ४००० ते ६००० असा मानतात. वैदिक काळ नेमका कुठला यावर अभ्यासकांमध्ये मतमतांतरे असली तरी इसवीसन पूर्व १५०० ही तारीख कालबाह्य झाली आहे, हे नक्की. म्हणूनच या तारखेला प्रधान मानून चुंबनाच्या प्राचीनतेचा तर्क मांडणे तत्वतः चुकीचे ठरणारे आहे.

वैदिक वाङ् मयात येणारे चुंबनाचे- शृंगाराचे संदर्भ

भारतीय संस्कृतीत चार पुरुषार्थ महत्त्वाचे मानले जातात, त्यात अर्थ, धर्म, काम, मोक्ष यांचा समावेश होतो. म्हणजेच भारतीय संस्कृतीत काम हा पुरुषार्थ मानवी आयुष्यातील महत्त्वाचा घटक समाजाला जातो. काम हे वेदांमध्ये उत्पादक बीज मानले गेले आहे. ऋग्वेदातील पुरुरवा – उर्वशी तसेच यम – यमी यांच्या संवादात कामवासनेचे व प्रेमाचे वर्णन आले आहे. वैदिक वाङ् मयातील कथा- प्रसंगावरून सामान्य माणसाच्या आयुष्यात कामजीवनाचे असलेले महत्त्व विशद होते. अथर्ववेदात काम किंवा इच्छा ही वैश्विक शक्ती मानलेली आहे. किंबहुना सर्व देवतांमध्ये या शक्तीला उच्च स्थान प्रधान केलेले आहे. याच वैश्विक शक्तीलाच अथर्ववेदामध्ये अग्नी असे संबोधले आहे. ब्राह्मण ग्रंथात वर्णिलेल्या फलउत्पादक विधींमध्ये शृंगारचेष्टांना स्थान दिलेले आहे. ऋग्वेदाच्या विवाह सुक्तात समागमनाचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे. शतपथ ब्राह्मणात यज्ञ वेदीला स्त्री तर अग्नीला तिचा पती म्हणून संबोधले आहे. उपनिषदात समागम प्रक्रियेचे प्रतिकात्मक विवेचन आलेले आहे. वात्सायनाचे कामसूत्र हा कामशास्त्रावर आधारित पहिलाच ग्रंथ नाही, तर भारतीय संस्कृतीत या विषयावर संशोधनाची मोठी परंपरा आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Who exactly invented the tradition of kissing india or mesopotamia what does the new research say svs