Who is Abhijeet Dipke Cockroach Janata Party Founder : भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी अलीकडेच एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान देशातील काही बेरोजगार तरुण झुरळाप्रमाणे असल्याचे विधान केले होते. त्यांच्या या टिप्पणीवर विविध क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर देशात ‘कॉक्रोच जनता पार्टी’ ही व्यंगात्मक राजकीय चळवळ जन्माला आली. अवघ्या तीन दिवसांतच २० लाखांहून अधिक तरुणांनी या चळवळीत सहभाग नोंदवल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक कोण? असा प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका तरुणाने अमेरिकेच्या बोस्टन शहरातून ही चळवळ सुरू केल्याचे सांगितले जाते, त्याविषयी…

कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक कोण?

समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीची सुरुवात अभिजीत दिपके या ३० वर्षीय तरुणाने केली आहे. मूळचा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेला हा तरुण सध्या अमेरिकेच्या बोस्टन शहरात शिक्षण घेत आहे. भारताचे सरन्यायाधीशांनी केलेल्या टिप्पणीनंतर त्याने ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या नावाने एक वेबसाईट तयार केली आणि इन्स्टाग्राम व एक्सवर खातेही उघडले. अत्यंत कमी कालावधीतच ही व्यंगात्मक राजकीय चळवळ संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरली. ‘मिंट’च्या वृत्तानुसार, अभिजीतने पुण्यातून पत्रकारितेची पदवी पूर्ण केली आणि त्यानंतर तो उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेला. नुकतीच त्याने अमेरिकेतील ‘बोस्टन युनिव्हर्सिटी’मधून पब्लिक रिलेशन्स (जनसंपर्क) या विषयात उच्च शिक्षण पूर्ण केले. सध्या आपण नोकरीच्या शोधात असल्याचे अभिजीतने एका मुलाखतीत सांगितले.

अभिजीतला राजकारणातही दांडगा अनुभव

अभिजीतला राजकीय क्षेत्रातही दांडगा अनुभव आहे. २०२० ते २०२३ या काळात त्याने दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आदमी पार्टीसाठी काम केले होते. २०२० मध्ये जेव्हा ‘आप’ने दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला, तेव्हा अभिजीतकडे पक्षाच्या मीम-आधारित डिजिटल प्रचाराची धुरा होती. त्याच्या या मोहिमेमुळेच आम आदमी पार्टीला तरुणांचे मोठे समर्थन मिळाल्याचे संगितले जाते. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा अभिजीतला विचारण्यात आले की- त्याने ‘आम आदमी पार्टी’ का सोडली? तेव्हा तो म्हणाला, “मला आयुष्यात खूप पुढे जायचे असल्याने मी एक वर्षाचा ब्रेक घेतला आणि पुढील शिक्षणासाठी तयारी सुरू केली. २०२४ मध्ये वैयक्तिक आयुष्य आणि आर्थिक स्थैर्यावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आल्याचे मला जाणवले. त्यानंतर मी शिक्षणासाठी काही विद्यापीठांमध्ये अर्ज केले आणि अखेरीस मला बोस्टन विद्यापीठात प्रवेश मिळाला”.

कॉकरोच जनता पार्टीची स्थापना का केली?

“कॉक्रोच जनता पार्टीची संकल्पना कुठलेही नियोजन किंवा खूप विचार करून सुरू केली नव्हती. भारताच्या सरन्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भातील वाद मी समाजमाध्यमांवर वाचला. खरेतर त्यांनी केलेले विधान ऐकून मलाही प्रचंड राग आला होता. त्यानंतर एक कल्पना सुचली की सगळेच कॉक्रोज एकत्र आले तर…? मग मी एक्सवर पोस्ट केली आणि तिथूनच या व्यंगात्मक मोहिमेला बळ मिळाले”, असे अभिजीतने बीसीसीला सांगितले. “जर हे वक्तव्य सत्ताधारी पक्षातील एखाद्या नेत्याने केले असते, तर त्याची इतकी चर्चा झाली नसती. मात्र, पण हे विधान अशा व्यक्तीकडून आले, ज्यांच्याकडून आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणाची अपेक्षा असते. या चळवळीचा मुख्य उद्देश केवळ सरन्यायाधीशांच्या विधानाचा निषेध करणे नसून, देशातील तरुणांच्या खऱ्या समस्यांना वाचा फोडणे हा आहे. देशातील वाढती बेरोजगारी, स्पर्धा परीक्षेतील सातत्याने होणारी पेपरफुटी, राजकारणाबद्दल वाढत चाललेली निराशा आणि व्यवस्थेकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना, या मुद्द्यांमुळेच ही व्यंगात्मक चळवळ सुरू केल्याचे अभिजीतने स्पष्ट केले आहे.

कॉकरोच जनता पार्टीच्या जाहीरनाम्यात काय?

यादरम्यान कॉक्रोच जनता पार्टीने आपल्या वेबसाईटवर पाच कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहेत. जर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) सत्तेत आल्यास कोणत्याही सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतरचे बक्षीस म्हणून ‘राज्यसभेची जागा’ दिली जाणार नाही. सीजेपी किंवा विरोधी पक्षाच्या राज्यात एखाद्याचे नाव मतदान यादीतून वगळल्यास निवडणूक आयोगाविरोधात यूएपीए अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. तसेच, देशातील महिलांना सर्व क्षेत्रांत ५० टक्के आरक्षण दिले जाईल. प्रभावशाली उद्योगपतींच्या मालकीच्या सर्व प्रसारमाध्यमांचे परवाने रद्द केले जातील, त्याशिवाय कोणताही आमदार किंवा खासदार आपला मूळ पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेल्यास त्याला पुढील २० वर्ष निवडणूक लढवता येणार नाही, अशा आश्वासनांचा या जाहीरनाम्यात समावेश आहे.

कॉकरोच जनता पार्टीच्या सदस्यत्वासाठी कोणत्या अटी?

कॉकरोच जनता पार्टीचे सदस्य होण्यासाठी काही अटीही घालून देण्यात आलेल्या आहेत. त्यातील पहिली अट- उमेदवार बेरोजगार असावा. दुसरी अट- उमेदवाराने शारीरिकदृष्ट्या सुस्त, मानसिकदृष्ट्या व्यस्त असणे गरजेचे आहे. तिसरी अट- उमेदवार २४ तास समाजमाध्यमांवर सक्रिय असायला हवा, तर चौथी अट- उमेदवाराने व्यवस्थेविरोधात परखड मत मांडायला हवे. सध्या तरुणांमध्ये या अजब पात्रता निकषांची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीच्या वादळाने फॉलोअर्स बाबतीत भाजपालाही मागे टाकल्याचे समोर आले आहे. अवघ्या पाच दिवसांत या व्यंगात्मक राजकीय चळवळ सोशल मीडियावर एक कोटीहून अधिक फॉलोअर्स मिळवले आहेत. गुरुवारी सकाळी ९.३० वाजेपर्यंत, इन्स्टाग्रामवर हा आकडा एक कोटीहून अधिक आणि ट्विटरवर जवळपास १,६०,००० पर्यंत पोहोचला होता. इन्स्टाग्रामवर भाजपाचे ८७ लाख फॉलोअर्स आहेत, तर काँग्रेसचे १.३२ कोटी असल्याचे समोर आले आहे.