Who is Amar Subramanya New AI Chief of Apple : गूगल आणि मायक्रोसॉफ्टपाठोपाठ आता अॅपलनेही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या स्पर्धेत उडी घेतली आहे. आयफोन तयार करणाऱ्या या कंपनीने आपल्या कृत्रिम बुद्धिमत्ता विभागात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलांमध्ये अमेरिकेतील भारतीय वंशाचे संशोधक अमर सुब्रह्मण्य यांची अत्यंत महत्वाची भूमिका असणार आहे. त्यांच्याकडे अॅपलने आपल्या एआय विभागाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. यापूर्वी २०१८ पासून ही जबादारी जॉय जियानंद्रिया यांच्याकडे होती; पण पुढील वर्षी ते निवृत्त होणार असल्याने त्यांच्या जागेवर नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय वंशाचे अमर सुब्रह्मण्य नेमके आहेत तरी कोण? त्यांनी यापूर्वी कोणकोणत्या पदांवर काम केले आहे? त्याविषयीचा हा आढावा…
अॅपल ही स्मार्टफोनचे उत्पादन करणारी आघाडीची कंपनी आहे. मोबाईल वापरकर्त्यांमध्ये या कंपनीच्या फोनची वेगळीच क्रेझ आहे. अॅपलचा नवीन आयफोन केव्हा येणार याची वाट ग्राहक आतुरतेने पाहत असतात. परंतु, एआयच्या शर्यतीत मागे राहिलेल्या ॲपलला सध्या विविध अडचणींचा सामना करावा लागतो आहे. आपल्या उत्पादनांमध्ये नवीन वैशिष्ट्ये जोडण्यास कंपनीकडून विलंब होत असल्याने त्यांना तीव्र टीकेचा सामना करावा लागत आहे. यादरम्यान अमर सुब्रह्मण्य यांची अॅपलच्या एआय विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने कंपनीला या क्षेत्रात पकड मिळवण्याची अपेक्षा आहे.
कोण आहेत अमर सुब्रह्मण्य?
- अमर सुब्रह्मण्य हे भारतीय वंशाचे संशोधक असून, त्यांनी यापूर्वी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट या दिग्गज कंपन्यांमध्ये काम केले आहे.
- त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार- मायक्रोसॉफ्टमध्ये ते सर्वांत शेवटी कॉर्पोरेट उपाध्यक्ष म्हणून एआय विभागात कार्यरत होते.
- मायक्रोसॉफ्टमध्ये येण्यापूर्वी त्यांनी गूगलमध्ये तब्बल १६ वर्षे काम केले होते, अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे.
- सुब्रह्मण्य यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये ‘जेमिनी असिस्टंट’साठी अभियांत्रिकी प्रमुख म्हणूनही काम पाहिले आहे.
- ४६ वर्षीय सुब्रह्मण्य यांना एआय क्षेत्रात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमीही भक्कम आहे.
- २००१ मध्ये त्यांनी बेंगळुरू विद्यापीठातून इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स विषयातून अभियंत्रिकीमध्ये बीईची पदवी घेतली आहे.
- २००७ मध्ये सुब्रह्मण्य यांनी मायक्रोसॉफ्ट रिसर्च ग्रॅज्युएट विषयात फेलोशिप मिळवली.
- २००९ मध्ये त्यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठातून पीएच.डी. पूर्ण केली.
- त्यांचा प्रबंध सेमी-सुपरवाइज्ड लर्निंग आणि ग्राफिकल मॉडेल्स या विषयांवर आधारित होता.
- गूगलमधील १६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी संशोधन भूमिकेपासून सुरुवात केली होती.
- २०२३ पर्यंत सुब्रह्मण्य हे गूगल जेमिनी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख होते.
- जुलै २०२५ मध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये कॉर्पोरेट व्हीपी म्हणून प्रवेश केला.
- त्यानंतर त्यांनी कंपनीच्या चॅटबॉट ‘को-पायलट’ या प्रकल्पावर काम केले.
- आता सुब्रह्मण्य हे अॅपलच्या एआय विभागाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
आणखी वाचा : Trump vs Maduro : डोनाल्ड ट्रम्प यांना न जुमानणारे निकोलस मादुरो नेमके आहे तरी कोण?
अॅपलच्या नेतृत्वातील बदल का महत्त्वाचा?
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात एआय हे कंपन्यांसाठी सर्वांत मोठे रणांगण झाले आहे. गूगल आणि मायक्रोसॉफ्टच्या तुलनेत अॅपल कंपनी या शर्यतीत मागे पडल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच कंपनीने ओपन एआयबरोबर करार करून चॅट जीपीटीसह इतर तंत्रज्ञानांना आपल्या उत्पादनांमध्ये समाविष्ट केले आहे. अॅपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांनी सुब्रह्मण्य यांच्या कौशल्याबद्दल विश्वास व्यक्त केला. त्यांनी कंपनीत सक्रिय प्रवेश केल्याने अॅपलचा एआय विभाग आणखीनच मजबूत होईल, असे कूक यांनी म्हटले आहे. विश्लेषकांच्या मते- प्रतिस्पर्धी कंपन्या एआय डेटा सेंटर्स आणि मॉडेलमध्ये अब्जावधीची गुंतवणूक करीत असताना अॅपलने सुरुवातीला आपला जुनाच दृष्टिकोन कायम ठेवला होता. त्यादरम्यान वापरकर्त्यांनी टीकेची झोड उठवल्यामुळे कंपनीने आपल्या या विभागात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
अॅपलला एआय विभागात काय समस्या होती?
गेल्या काही वर्षांत अॅपलला आपल्या एआयच्या विभागात अनेक अडचणी आल्या आहेत. कंपनीने नवीन आणि प्रगत स्मार्टफोनचे लाँचिंगही उशिराने केल्याचे पाहायला मिळत आहे. वर्षभरापूर्वी अॅपलने आपल्या नवीन सीरिजची घोषणा केली होती; परंतु अद्यापही या सीरिजचे स्मार्टफोन उपलब्ध न झाल्याने वापरकर्ते प्रश्न उपस्थित करीत आहेत. अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांचा एआय विभागात काम करणाऱ्या जॉन यांच्यावरील विश्वास उडाला असल्याच्या बातम्याही आल्या आहेत. यादरम्यान अमर सुब्रह्मण्य यांच्या नियुक्तीमुळे कंपनीच्या एआय विभागाला नवीन बळ मिळेल, अशी अपेक्षा आहे. अमर यांना गूगल आणि मायक्रोसॉफ्टचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी बंगळुरू विद्यापीठात शिक्षण घेतले आणि नंतर अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठातून पीएच.डी. पूर्ण केली आहे.
हेही वाचा : पाकिस्तान पुन्हा भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत? सीमावर्ती भागात नेमकं काय घडतंय? बीएसएफने दिली माहिती
अॅपलच्या एआय फोनची सर्वत्र चर्चा
१० जून रोजी कंपनीने अॅपल इंटेलिजन्सचे अनावरण केले होते. हा अॅपल इंक द्वारे विकसित केलेला कृत्रिम बुद्धिमत्ता प्लॅटफॉर्म असल्याचे सांगितले जाते. पल इंटेलिजन्स हे आयफोन आणि आयपॅडमध्ये जनरेटिव्ह AI च्या वैशिष्ट्यांसह उपलब्ध असणार आहे. या नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने वापरकर्त्यांना रेकॉर्ड केलेले कॉल ट्रान्स्क्राइब (प्रतिलेखन) करता येणार आहे. त्याशिवाय ईमेल लिहिणे आणि नोट्सचे सारांशाने संकलनही करता येणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गुगलने अशाच वैशिष्ट्यांचे अनावरण केले होते, ज्यामध्ये ऑडिओ रेकॉर्डिंगचे थेट प्रतिलेखनदेखील समाविष्ट होते. सॅमसंग कंपनीदेखील या रिंगणात आहे. या कोरियन इलेक्ट्रॉनिक्स फर्मने ऑडिओ रेकॉर्डिंग आणि फोन कॉल्सवर प्रक्रिया करण्यासाठी तसेच वेबपेजेसचा सारांश देण्यासाठी त्याच्या फ्लॅगशिप डिव्हाइसवर चालणारे नेटिव्ह एआय मॉडेल उत्पादनांमध्ये समाविष्ट करण्यास सुरुवात केली आहे.
