Raihan Vadra engaged to Aviva Baig : काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांच्या घरात लवकरच सनई-चौघडे वाजण्याची शक्यता आहे. त्यांचे पुत्र रेहान वाड्रा याचा नुकताच साखरपुडा झाल्याची माहिती समोर आली आहे. रेहानने आपली मैत्रीण अवीवा बेग हिच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही एकमेकांना सात वर्षांपासून ओळखत असल्याचे सांगितले जात आहे. बेग कुटुंबाचे आधीपासूनच गांधी कुटुंबाशी कौटुंबिक संबंध असल्याची माहिती एनडीटीव्हीने आपल्या वृत्तात दिली आहे. यादरम्यान प्रियांका गांधी यांच्या होणारी सूनबाई नेमकी आहे तरी कोण? याचीच चर्चा समाजमाध्यमांवर रंगली आहे. त्याविषयीचा हा आढावा…

रेहान वाड्राने उकरला साखरपुडा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहान व अवीवा यांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला आहे. दिल्लीमध्ये राहणाऱ्या अवीवा बेगने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर त्या संदर्भातील माहिती शेअर केली आहे. कुटुंबीयांची संमती घेतल्यानंतरच आपण रेहानबरोबर साखरपुडा केल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. रेहान व अवीवा यांच्या विवाह जानेवारी महिन्यात होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. परंतु, गांधी किंवा बेग कुटुंबीयांनी अद्यापही त्याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे दोघांच्या विवाहाची तारीख आणि त्याबाबतच्या चर्चा अद्याप तरी हवेतच असल्याचे दिसून येत आहे.

कोण आहे अवीवा बेग?

अवीवा बेग ही दिल्लीतील एका प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबातील आहे. तिचे वडील इम्रान बेग दिल्लीतील प्रसिद्ध उद्योजक आणि आई नंदिता बेग लोकप्रिय डिझायनर आहेत. विशेष बाब म्हणजे प्रियांका गांधी-वाड्रा आणि नंदिता बेग या जुन्या मैत्रिणी असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या इंदिरा भवनच्या इंटेरिअर डिझाइनमध्ये नंदिता बेग यांनी प्रियांका गांधी यांना मदत केल्याची माहिती आहे. या कौटुंबिक स्नेहामुळेच रेहान आणि अवीवा अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याचे एनडीटीव्हीने आपल्या वृत्तात म्हटले आहे. अवीवाने आपले प्राथामिक शिक्षण दिल्लीतील बाराखंबा रोडवरील प्रतिष्ठित ‘मॉडर्न स्कूल’मधून पूर्ण केले. त्यानंतर तिने ओ. पी. जिंदाल ग्लोबल विद्यापीठातून ‘मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम’ या विषयात पदवी मिळवलेली आहे.

आणखी वाचा : तोंडातून येणारी सततची दुर्गंधी देते कॅन्सरचा इशारा? आरोग्य तज्ज्ञांचा दावा काय?

अवीवा बेगला फोटोग्राफीचाही छंद

अवीवा ही केवळ अभ्यासातच नव्हे, तर खेळातही आघाडीवर असल्याचे सांगितले जाते. तिने राष्ट्रीय स्तरावर फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केल्याची माहिती आहे. त्याशिवाय अवीवाला फोटोग्राफीचीही आवड आहे. तिने एटेलियर ११ या फोटोग्राफिक स्टुडिओ व प्रॉडक्शन या कंपनीची स्थापना केलेली आहे. अवीवाने अनेक नामांकित कला प्रदर्शनांत सहभाग घेतलेला आहे. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तिने फोटोग्राफीचा छंद जोपासला आहे. अवीवाने काढलेले फोटो दोन मोठ्या एक्झिबिशनमध्ये झळकले होते. रेहान आणि अवीवा या दोघांचे छंद आणि करिअरची क्षेत्रे सारखीच असल्याने त्यांच्या जोडीची याआधीही समाजमाध्यमांवर बरीच चर्चा रंगली होती.

रेहान वाड्रा सध्या काय करतो?

रेहान वाड्राने त्याचे शिक्षण डेहराडूनमधील डून शाळेतून पूर्ण केले आहे. विशेष बाब म्हणजे- याच शाळेतून त्याचे मामा व खासदार राहुल गांधी आणि आजोबा राजीव गांधी यांनी शिक्षण घेतले होते. रेहानने लंडनमधील ‘स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज’ या विद्यापीठातून राजकारण विषयात उच्च शिक्षण घेतले आहे. परंतु त्याने अद्यापही राजकारणात पाऊल ठेवलेले नाही. प्रियांका गांधी-वाड्रा आणि राहुल गांधी यांच्या राजकीय कार्यक्रमात तो अधूनमधून दिसून येतो. मात्र, रेहानला राजकारणाची आवड नसल्याचे त्याच्या एका निकटवर्तीयाने एनडीटीव्हीला सांगितले आहे. वयाच्या दहाव्या वर्षापासून रेहानला फोटोग्राफीची आवड आहे. त्याने वाइल्ड लाइफ, स्ट्रीट, तसेच व्यावसायिक फोटोग्राफी केली आहे. अनेक एक्झिबिशनमध्ये रेहानने काढलेले फोटो झळकले आहेत. २०२१ मध्ये नवी दिल्लीतील बिकानेर हाऊसमध्ये रेहानने काढलेल्या फोटोंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. ‘डार्क पर्सेप्शन’ असे त्या प्रदर्शनाचे नाव होते.

हेही वाचा : Salman Khan’s Battle Of Galwan: सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’वर चीनचे गंभीर आरोप; गलवान संघर्ष पुन्हा चर्चेत का आलाय?

रेहानने जोपासला आजोबांचा छंद

फोटोग्राफीपूर्वी रेहानला क्रिकेटची प्रचंड आवड होती; परंतु २०१७ मध्ये शाळेत क्रिकेट खेळताना त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. तेव्हापासून रेहान हा क्रिकेटपासून दूर असल्याचे सांगितले जाते. नंतर त्याने फोटोग्राफीकडे वळण्याचा निर्णय घेतला. मला ब्लॅक अँड व्हाइट फोटोशूटची प्रचंड आवड असल्याची माहिती रेहानने एनडीटीव्हीला दिली आहे. प्रियांका गांधी-वाड्रा व राजीव गांधी यांनाही फोटोग्राफीची आवड होती. सध्या मी आजोबा राजीव गांधी यांनी केलेल्या फोटोग्राफीचा अभ्यास करीत असल्याचे रेहानने सांगितले आहे. दरम्यान, रेहान व अवीवा यांची बऱ्याच वर्षांपासून ओळख आहे. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि आता दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांच्याही कुटुंबांनी त्यांच्या लग्नाला संमती दिल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, त्यांच्या लग्नाची तारखेची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वाड्रा आणि बेग कुटुंबीय त्यांच्या सोईनुसार रेहान व अवीवा यांच्या लग्नाबाबतचा निर्णय घेतील, असे एनडीटीव्हीच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.