भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दुबईतील एका भारतीय वंशाच्या उद्योगपतीला मनी लाँडरिंगसह इतर आर्थिक गुन्ह्यांमध्ये दोषी आढळल्यानंतर पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बलविंदर सिंग साहनी हे दुबईमध्ये अबू सबा म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना शुक्रवारी दुबईच्या फौजदारी न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
तुरुंगवासाच्या शिक्षेबरोबरच साहनी यांना ५,००,००० दिऱ्हॅम म्हणजेच सुमारे १.१४ कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. मुख्य म्हणजे न्यायालयाने अब्जाधीश व्यावसायिकाला देशाबाहेर काढण्यापूर्वी त्याच्याकडून १५० दशलक्ष दिऱ्हॅम म्हणजेच सुमारे ३४४ कोटी रुपये निधी जप्त करण्याचेही आदेश दिले आहेत. बलविंदर सिंग साहनी कोण आहेत? त्यांच्यावर आरोप काय? जाणून घेऊयात.

बलविंदर सिंग साहनी कोण आहेत?
बलविंदर सिंग साहनी यांचा जन्म ७ एप्रिल १९७२ रोजी झाला. बलविंदर सिंग साहनी राज साहनी ग्रुप (आरएसजी) चे संस्थापक व अध्यक्ष आहेत. हा ग्रुप पश्चिम आशिया, अमेरिका, भारत आणि दक्षिण आशियामध्ये रिअल इस्टेट, ऑटोमोटिव्ह, औद्योगिक उपकरणे आणि इतर गुंतवणुकींमध्ये गुंतलेला आहे. राज साहनी ग्रुपचे काही हाय-प्रोफाइल दुबई प्रॉपर्टी पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेले प्रकल्प खालीलप्रमाणे :
- कसर सबा – दुबई स्पोर्ट्स सिटीमध्ये १२३ दशलक्ष डॉलर्सचे निवासी संकुल
- बुर्ज सबा – जुमेराह व्हिलेज सर्कलमध्ये ५० दशलक्ष डॉलर्स किमतीची २४ मजली इमारत
- सबा रोटाना – उम्म सुकीमजवळील पंचतारांकित हॉटेल
- जेबेल अली सेंट्रल रोटाना – जेबेल अली मेट्रो स्टेशन जवळील चार-तारांकित हॉटेल
बलविंदर सिंग साहनी दुबईच्या उच्चभ्रू वर्तुळातील एक नामांकित व्यक्ती आहेत. ते अनेकदा त्याची रॉयल ब्लू कंदुरा, बेसबॉल कॅप घालून दिसतो. त्यांना लक्झरी कारची आवड असल्याने, या गाड्या जमा करण्याचीही आवड आहे. साहनी यांचे इन्स्टाग्रामवर ३.३ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ते इन्स्टाग्रामवर नेहमी गाड्यांचे फोटो शेअर करीत असत. त्यांच्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये ब्लॅक बुगाटीचा समावेश आहे.
त्यांनी सुरुवातीला ही गाडी त्यांच्या १०० दशलक्ष डॉलर्सच्या पाम जुमेराह हवेलीच्या मध्यभागी पार्क केली होती कारण- त्यांना सल्ला देण्यात आला होता की, काळी वस्तू त्यांना वाईट नजरेपासून वाचवेल, असे वृत्त ‘खलीज टाइम्स’ने दिले. त्यावेळी ते चर्चेत आले होते. “मला काळा रंग आवडत नाही,” असे साहनी त्यांच्या एका यूट्यूब मुलाखतीत म्हटले. कुवेतमध्येही बलविंदर सिंग साहनी यांनी प्रसिद्धी मिळवली होती. त्यांनी देशातील सर्वांत महागडा मोबाईल नंबर (०५८-८८८८८८८) खरेदी करण्यासाठी तब्बल ६,००,००० दिऱ्हॅम म्हणजेच १.३७ कोटी रुपये दिले होते.
साहनी कोण आहे?
साहनी यांनी १८ व्या वर्षी व्यवसाय सुरू केला आणि ऑटोमोटिव्ह स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी व्यवसाय व्यवस्थापन ही पदवी सोडली. त्यांच्या वडिलांनी आधीच कुवेतमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते, मात्र तरीदेखील साहनी २००६ मध्ये दुबईला स्थलांतरित झाले. त्यांनी हे एक धोकादायक पाऊल असल्याचे म्हटले. “हा एक खूप कठीण निर्णय होता,” असे त्यांनी आपल्या सुरुवातीच्या मुलाखतीत म्हटले होते. “कुवेतमध्ये माझा आदर केला जात असे. दुबई हे माझ्यासाठी पूर्णपणे नवीन शहर होते,” असे त्यांनी सांगितले. साहनी हे त्यांच्या व्यवसायासाठीच नव्हे तर देणग्यांसाठीदेखील ओळखले जातात, विशेषतः पंजाबमध्ये.
२००४ मध्ये त्यांचे वडील अमरिक सिंग यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी अमृतसरमध्ये ‘अपना घर’ नावाचे वृद्धाश्रम बांधले. २००७ मध्ये त्यांची आई हरबन्स कौर साहनी यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी त्याच शहरात क्षयरोग रुग्णालय आणि नंतर मूकबधिरांसाठी भारतातील सर्वांत मोठे रुग्णालय बांधले. कोविड-१९ साथीच्या काळात त्यांनी अबू धाबीच्या ‘टुगेदर वी आर गुड’ कार्यक्रमासाठी एक दशलक्ष दिऱ्हॅम दान केले आणि त्यांनी वैद्यकीय संशोधनासाठीदेखील निधी संकलनात भाग घेतला आहे. २०२० मध्ये त्यांना दुबईतील शीख पुरस्कारांमध्ये ‘बिझनेसमन ऑफ द इयर’ या पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले.
त्यांच्यावरील आरोप काय?
बलविंदर सिंग साहनी हे आर्थिक गुन्हेगारी नेटवर्क चालवीत असल्याच्या प्रकरणात दोषी आढळले आहेत. या प्रकरणात इतर ३४ जणदेखील दोषी आढळून आले आहेत. या गटावर शेल कंपन्यांद्वारे लाखो दिऱ्हॅम आणि संशयास्पद पैशांच्या हस्तांतराचा आरोप होता. गेल्या वर्षी बुर दुबई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर साहनी यांच्याविरुद्धचा खटला सुरू करण्यात आला. त्यानंतर त्यांची चौकशी सुरू झाली. १८ डिसेंबर २०२४ रोजी हे प्रकरण सरकारी वकिलाकडे सोपविण्यात आले. त्यानंतर संयुक्त अरब अमिराती आणि परदेशात महत्त्वपूर्ण आर्थिक डेटा आणि व्यावसायिक संबंध उघड झाले. या तपासामुळे ९ जानेवारी रोजी न्यायालयीन सत्र सुरू झाले आणि मनी लाँडरिंग प्रकरण उघडकीस आले.
या प्रकरणात साहनी यांचा मुलगाही मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या अनेकांवर त्यांच्या अनुपस्थितीत खटला चालवण्यात आला. अधिकाऱ्यांनी या कारवाईशी संबंधित मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने १५० दशलक्ष दिरहम (सुमारे ४० दशलक्ष डॉलर्स) निधी गोठवण्याचे, मोबाईल फोनसह विविध वैयक्तिक वस्तू जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने असा निर्णय दिला की, साहनी यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर हद्दपार केले जाणार आहे. साहनी यांना आणि त्यांच्या मुलाला जास्तीत जास्त शिक्षा झाली आहे; तर प्रकरणातील इतर दोषींना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि २,००,००० दिऱ्हॅम दंड, अशा शिक्षा ठोठावण्यात आल्या.