अयोध्येतील श्री राम मंदिर सध्या चर्चेत आहे. श्री राम मंदिराच्या बांधकामासाठी भाविकांनी दिलेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. देणगीची चोरी झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आल्याने राजकीय वादळ निर्माण झाले आहे. विरोधी पक्षांकडून होत असलेल्या आरोपांच्या केंद्रस्थानी एक व्यक्ती आहे. ती म्हणजे चंपत राय. चंपत राय हे श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे सरचिटणीस होते. देणग्यांची चोरी तसेच अपहार झाल्याचा आरोप झाल्यानंतर व ८ जणांना या प्रकरणी पोलिसांनी अटक केल्यानंतर चंपत राय यांनी २६ जून रोजी त्यांच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. राम मंदिराच्या बांधकामासाठी आलेल्या निधीची देखरेख करण्याचे काम चंपत राय यांच्याकडे होते. जवळपास ७ ते साडेसात कोटी रूपयांचा अपहार झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात आरोपानंतर राजीनामा देणारे चंपत राय हे पहिले ‘हाय प्रोफाइल’ नेते ठरले. दरम्यान, चंपत राय यांचे नाव या प्रकरणात आरोपी म्हणून नोंदवण्यात आलेले नाही. रसायनशास्त्राचे प्राध्यापक ते विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष असा प्रवास केलेले चंपत राय कोण आहेत? त्यांच्यावर काय आरोप झाले याबाबत जाणून घेऊ.

चंपत राय कोण आहेत?

चंपत राय यांचा जन्म १९४६ मध्ये उत्तर प्रदेशातील बिजनोर येथे झाला. बाल वयातच त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचा प्रभाव पडला होता. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करणे सुरू केले होते. राम मंदिर आंदोलनात सहभाग घेण्यापूर्वी चंपत राय हे बिजनोर मधील आरएसएम डिग्री कॉलेजमध्ये केमिस्ट्री (रसायनशास्त्र) शिकवत होते. इंदिरा गांधींच्या कार्यकाळात आणीबाणीत चंपत राय यांना त्यांच्या कॉलेजमधून अटक करण्यात आली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या संबंधांमुळे राय यांना अटक करण्यात आली होती, असे त्यांचे समर्थक सांगतात. जवळपास १८ महिने राय कारावासात होते, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.

त्यांना ‘एनसायक्लोपेडिया ऑफ अयोध्या’ का म्हटले जाते?

कारावासातून मुक्तता झाल्यानंतर राय यांनी शिक्षण क्षेत्र सोडून पूर्णवेळ समाजकार्य करण्याचा निर्णय घेतला होता. १९८० मध्ये ते विश्व हिंदू परिषदेत सामील झाले. त्यांची अल्पावधीतच पदोन्नती होत गेली. चंपत राय हे विश्व हिंदू परिषदेचे सचिव व नंतर आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष झाले. १९८० पासून ते राम मंदिर आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले होते. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडली तेव्हा चंपत राय यांनी कारसेवकांच्या एका समूहाचे नेतृत्व केले होते. अयोध्या शहराचे सखोल ज्ञान असल्यामुळे चंपत राय यांचे समर्थक त्यांना ‘एनसायक्लोपेडिया ऑफ अयोध्या’ असे संबोधतात. चंपत राय यांनी विवाह केला नाही, पूर्ण जीवन राम मंदिर आंदोलनासाठी वाहून टाकले, असे त्यांचे समर्थक सांगतात.

विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विजय शंकर तिवारी यांनी ट्विटरवर (एक्स) म्हटले, “चंपत राय यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य राम मंदिर आंदोलनाला दिले. केमिस्ट्रीचे प्राध्यापक ते विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष असा प्रवास केलेले चंपत राय हे रामलल्ला मंदिर बांधकामाचे साक्षीदार आहेत. कोणतेही खोटे आरोप त्यांच्या चारित्र्यावर डाग पाडू शकत नाहीत. त्यांनी रामासाठी जीवन वाहून टाकल्याचा त्यांचे आयुष्य हाच पुरावा आहे.” काही अहवालांनुसार, चंपत राय यांनी जैन तत्वज्ञानावर पुस्तकही लिहिले आहे.

चंपत राय यांनी राजीनामा का दिला?

चंपत राय यांनी त्यांचा ड्रायव्हर रामशंकर यादव उर्फ टीन्नु याला अटक झाल्यानंतर राजीनामा दिला. देणग्यांची मोजणी करणाऱ्या व एका माजी बँक अधिकाऱ्याचा अटक करण्यात आलेल्या एकूण आठ जणांमध्ये समावेश आहे. देणगीत अपहाराचा आरोप झाल्यानंतर चंपत राय हे आरोपांच्या केंद्रस्थानी आहेत. सुरूवातीला त्यांनी अपहार झाल्याचे आरोप फेटाळले होते, परंतु, नंतर योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) स्वागत केले. योगी आदित्यनाथ यांचे सरकार काही महत्त्वाच्या व्यक्तींना वाचवण्यासाठी चंपत राय यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव टाकत आहे, असा आरोप समाजवादी पक्षाने केला होता. तसेच आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी चंपत राय हेच “मुख्य चोर” असल्याचे म्हटले होते. तसेच न्यासच्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींची नावे दाखल झालेल्या गुन्ह्यात का नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. चंपत राय यांनी नैतिक जबाबदारी म्हणून त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

देणगी चोरीचे हे प्रकरण अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या देणग्यांमध्ये कथित अपहार झाल्याशी संबंधित आहे. देणगी हाताळणाऱ्या आणि मोजणी करणाऱ्या व्यक्तींनी या देणगीचा वापर स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी केला, असा संशय तपास अधिकाऱ्यांना आहे. एफआयआरमध्ये मंदिराच्या ‘यात्री सुविधा केंद्रा’त रोख रक्कम मोजण्याचे काम पाहणाऱ्या प्रभारी अधिकाऱ्यासह इतरांची नावे आहेत. आरोपींवर चोरी, फसवणूक, विश्वासघात आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांमधील कोट्यवधी रुपये गायब असल्याचा दावा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. त्यांनी हा मुद्दा भाविकांसाठी “अत्यंत संवेदनशील” असल्याचे सांगत यावर राम मंदिर ट्रस्ट आणि उत्तर प्रदेश सरकारने बाळगलेल्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अधिकाऱ्यांनी देणगी मोजणीचे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्यास का नकार दिला, असा सवालही यादव यांनी उपस्थित केला.

राम मंदिराची देखरेख करणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने सुरूवातीला आरोप फेटाळले होते. अंतर्गत ऑडिटमध्ये कोणतीही तफावत आढळून आलेली नाही, असे न्यासचे सरचिटणीस चंपत राय यांनी म्हटले होते. दरम्यान, भाजपाचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी आपल्याला देणग्यांच्या कथित गैरवापराची माहिती असल्याचा दावा केला होता. मात्र, त्याचे तपशील जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला. यानंतर हे प्रकरण अधिक चिघळले. वाद वाढल्यानंतर मंदिर ट्रस्टने या प्रकरणाची सरकारी चौकशी करण्याची मागणी केली. १४ जून रोजी योगी सरकारने या आरोपांच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले. या समितीने २३ जून रोजी आपला प्राथमिक अहवाल सादर केला. त्यानंतर गुरुवारी (२५ जून) आठ जणांविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला.