scorecardresearch

Premium

सुखपालसिंग खैरा यांना अटक का झाली, नेमके प्रकरण काय? जाणून घ्या…

सुखपालसिंग खैरा यांना २८ सप्टेंबर रोजी चंदीगड येथून अटक केले. फाजिलका पोलिसांनी ही कारवाई केली.

Cong_MLA_Sukhpal_Khaira
काँग्रेसचे आमदार सुखपालसिंग खैरा (Express Photo by Gurmeet Singh)

पंजाबमध्ये काँग्रेसचे आमदार सुखपालसिंग खैरा यांना फाजिलका पोलिसांनी ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणात अटक केली आहे. पंजाब पोलसांच्या विशेष तपास पथकाने २०१५ सालच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणाचा तपास केला. याच तपासाच्या आधारावर खैरा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या या अटकेनंतर पंजाबमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी आम आदमी पार्टीकडून (आप) सुडाचे राजकारण केले जात आहे, असा आरोप केला. तर खैरा यांच्यावर कायद्यानुसारच कारवाई झालेली आहे, असा दावा आप पक्षाकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर खैरा यांना ज्या आरोपाखाली अटक झाली आहे, ते प्रकरण काय आहे? खैरा यांची राजकीय कारकीर्द कशी राहिलेली आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या…

७ दिवसांच्या पोलीस कोठडीची केली होती मागणी

सुखपालसिंग खैरा यांना २८ सप्टेंबर रोजी चंदीगड येथून अटक केले. फाजिलका पोलिसांनी ही कारवाई केली. २०१५ सालच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने केलेल्या तपासाच्या आधारे ही अटकेची कारवाई करण्यात आली. अटकेनंतर खैरा यांना जलालाबाद जिल्ह्यातील उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. पोलिसांनी खैरा यांची ७ दिवसांसाठी पोलीस कोठडी मागितली होती. मात्र न्यायदंडाधिकाऱ्यांनी खैरा यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सध्या खैरा हे फाजिलका पोलीस मुख्यालयात आहेत.

sanjay singh
‘आप’ खासदार संजय सिंह यांना ५ दिवसांची ईडी कोठडी
ex crpf employee sexually assaulted girl
अकोला : रक्षक बनला भक्षक; बंदुकीचा धाक दाखवत तरुणीवर…
obc reservation
ओबीसी आंदोलकांना सरकारचे चर्चेचे निमंत्रण; ओबीसी महासंघाची भूमिका काय?…
rotten betel nuts seized in nagpur, nagpur rotten betel nuts
धक्कादायक! नागपुरात २.६० कोटींची सडकी सुपारी जप्त… प्रकरण काय पहा…

२०१५ सालचे ड्रग्ज तस्करीचे प्रकरण आहे तरी काय?

फाजिलका पोलिसांनी ९ मार्च २०१५ रोजी ड्रग्ज तस्करी संदर्भात एक गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात गुरुदेवसिंग आणि त्यांच्या साथीदारांकडून २ किलो हेरॉईन, २४ सोन्याची बिस्किटे, एक देशी पिस्तुल, ०.३१५ बोअरचे पिस्तुल, दोन पाकिस्तानी सीमकार्ड असे सामान गुरदेवसिंग आणि त्यांच्या साथीदाराकडून जप्त करण्यात आले होते. गुरुदेवसिंग यांच्यासहित एकूण ९ जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुदेवसिंग हे तेव्हा धिलवान बाजार समितीचे अध्यक्ष होते. ते सुखपालसिंग खैरा यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सुखपालसिंग खैरा यांनी गुरुदेवसिंग यांना २७ फेब्रुवारी २०१५ ते ८ मार्च २०१५ या काळात एकूण ६५ वेळा फोन कॉल केला होता.

एकूण नऊ जणांना ठरवले होते दोषी

या प्रकरणात गुरुदेवसिंग आणि इतर आठ जणांना ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी दोषी ठरवण्यात आले होते. याच खटल्यात फाजिलका येथील ट्रायल कोर्टाने खैरा यांना अतिरिक्त आरोपी म्हणून नोव्हेंबर २०१७ मध्ये समन्स बजावले होते. मात्र पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेवर स्थगिती दिली होती. खैरा यांच्याविरोधातील तपासाला मात्र न्यायालयाने परवानगी दिली होती. पुढे कथित ड्रग्ज आणि खोटे पासपोर्ट बनवण्याच्या रॅकेटमध्ये आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोव्हेंबर २०२१ मध्ये खैरा यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. याच प्रकरणात फाजिलका येथील ड्रग्ज जप्ती प्रकरणाच्या तपासाचाही समावेश होता. या अटकेनंतर खैरा एकूण ८० दिवस तुरुंगात होते. २०२२ सालच्या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

एप्रिल २०२३ साली विशेष पथकाची स्थापना

या ड्रग्ज तस्करी आणि आर्थिक घोटाळा प्रकरणी फाजिलका ट्रायल कोर्टाने खैरा यांच्याविरोधात समन्स जारी केले होते. मात्र हे समन्स सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले होते. या प्रकरणाचा ट्रायल कोर्टाने अगोदरच निकाल दिलेला आहे, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता. मात्र याच प्रकरणाचा नव्याने तपास करण्यासाठी एप्रिल २०२३ साली एका विशेष तपास पथकाची (एसआयटी ) स्थापना करण्यात आली. जालंधर रेंजचे डीआयजी स्वपन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आली होती. मार्च २०१५ साली जेव्हा ड्रग्ज तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता, तेव्हा स्वपन शर्मा हे फाजिलका येथे एसएसपी या पदावर कार्यरत होते. याच विशेष तपास पथकाच्या चौकशीनंतर खैरा यांना आता अटक करण्यात आली आहे.

खैरा यांच्याविरोधात अन्य कोणकोणते गुन्हे आहेत?

खैरा यांच्याविरोधात २०१५ सालच्या या प्रकरणाव्यतिरिक्त अन्य काही गुन्ह्यांची नोंद आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये खैरा तसेच पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदसिंग राजा वारिंग यांच्याविरोधात आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंजाबमधील आम आदमी सरकारने नियुक्त केलेल्या कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि मंडळांची खोटी यादी प्रसिद्ध केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल खरण्यात आला होता.

खैरा यांची राजकीय कारकीर्द

खैरा यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात पंचायत सदस्यापासून झाली. त्यांचे वडील हे अकाली पक्षाचे दिग्गज नेते आणि पंजाबचे शिक्षणमंत्रीदेखील होते. वडील अकाली दलात सक्रिय असले तरी खैरा यांनी मात्र काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते १९९७ साली पंजाब युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. ते कपूरथला जिल्ह्यातील भोलाथ मतदारसंघातून आतापर्यंत ३ वेळा आमदार राहिलेले आहेत. १९९७ आणि २००२ सालच्या विधानसभा निवडणुकीत पराभावाला सामोरे जावे लागल्यानंतर त्यांनी २००७ सालची निवडणूक जिंकली. पंजाबमध्ये काँग्रेस पक्ष विरोधी पक्षात असताना ते २००७ साली पहिल्यांदा आमदार झाले. २०१२ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पुन्हा एकदा पराभव झाला. बीबी जागीर कौरा यांनी त्यांना पराभूत केले होते. २०१२ सालच्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते होते.

स्वत:चा पक्ष स्थापन केला होता

खैरा यांनी २०१५ साली आप पक्षात प्रवेश केला. त्यानंतर २०१७ साली ते पुन्हा एकदा आमदार झाले. २०१७ साली त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. मात्र जुलै २०१८ साली त्यांची आप पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पुढे २०१९ साली त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत भटिंडा येथून लोकसभेची निवडणूक लढवली. ही निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी स्वत:चा पंजाब एकता पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला होता. या निवडणुकीत मात्र त्यांना अपयश आले. या निवडणुकीत ते चौथ्या क्रमांवर होते.

२०२२ साली खैरा पुन्हा आमदार

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर खैरा यांनी जून २०२१ साली पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २०२२ सालची विधानसभा निवडणूक जिंकत ते पुन्हा एकदा आमदार झाले.

खैरा यांच्या अटकेनंतर काँग्रेस आक्रमक

खैरा यांच्या अटकेनंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. खैरा यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप काँग्रेसने केला. खैरा यांच्या अटकेनंतर काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते हे फाजिलका येथे जमा झाले होते. यावेळी शुक्रवारी (२९ सप्टेंबर) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदरसिंग राजा वारिंग यांच्यासह विरोधी पक्षनेते प्रतापसिंग बाजपा यांनीदेखील फाजिलका येथे जात खैरा यांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले. पंजाब युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहीत महिंद्रा यांनी लुधियाना येथे जोरदार निदर्शन केले. शिरोमणी अकाली दलानेदेखील खैरा यांच्यावरील कारवाईचा निषेध केला.

तेव्हा आप पक्षाच्या नेत्यांची दिला होता पाठिंबा

तर दुसरीकडे आप पक्षाने काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. खैरा यांच्यावर एसआयटीने दिलेल्या अहवालानुसारच कारवाई करण्यात आली आहे, असे पंजाबमधील आप सरकारने सांगितले आहे. २०१७ सालच्या नोव्हेंबर महिन्यात ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली खैरा यांना पोलिसांनी समन्स जारी केल्यानंतर आप पक्षाच्या नेत्यांनीच त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. हा खटला बनावट असल्याचा दावा आप पक्षाने केले होता. सध्या मुख्यमंत्री असलेले भगवंत मान संगरूर मतदारसंघाचे खासदार असताना संसदेत खैरा यांच्या समर्थन बोलले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Who is congress mla sukhpal singh khaira arrested by punjab police prd

First published on: 30-09-2023 at 22:28 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×