-अन्वय सावंत

मँचेस्टर सिटीचा आघाडीपटू अर्लिंग हालँड हा सध्याच्या घडीला फुटबॉल विश्वात सर्वाधिक चर्चेत असलेला खेळाडू आहे. गेल्या काही हंगामांतील गोल धडाक्यामुळे नॉर्वेच्या २२ वर्षीय हालँडने जागतिक फुटबॉलमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदाच्या हंगामात त्याने आपली कामगिरी अधिकच उंचावत लिओनेल मेसी, ख्रिस्टियानो रोनाल्डो आणि रॉबर्ट लेवांडोवस्की यांसारख्या तारांकित खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. त्याने कमी वयातच अनेक विक्रम आपल्या नावे केले असून फ्रान्सच्या किलियान एम्बापेसह हालँडकडे फुटबॉलचे भविष्य म्हणून पाहिले जात आहे. त्याच्या विक्रमी कामगिरीचा आढावा.

novak djokovic
जोकोविचकडून फेडररचा विक्रम मोडीत; क्रमवारीत अग्रस्थानी राहिलेला सर्वात वयस्क टेनिसपटू
Vidit Gujarathi defeated Hikaru Nakamura in the Chess Candidates competition sport news
विदितचा नाकामुराला धक्का; गुकेशचा प्रज्ञानंदवर विजय; हम्पीची सलग दुसरी बरोबरी
Captains Salary List in IPL 2024
IPL 2024 : धोनी-पंड्या नव्हे, ‘हा’ कर्णधार घेतोय सर्वाधिक पैसे, आयपीएलच्या बक्षिसापेक्षा जास्त आहे मानधन
MS Dhoni incredible records as Chennai Super Kings captain
MS Dhoni: २३५ सामने, १० फायनल अन् पाच जेतेपद, धोनीच्या नावावर अद्भुत विक्रम

हालँडची यंदाच्या हंगामातील कामगिरी लक्षवेधी का ठरते आहे?

गेल्या तीन हंगामांत जर्मनीतील क्लब बोरुसिया डॉर्टमुंडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हालँडला यंदाच्या हंगामापूर्वी इंग्लिश क्लब मँचेस्टर सिटीने ६ कोटी युरो इतक्या किमतीत खरेदी केले. मँचेस्टर सिटीची जगातील सर्वोत्तम फुटबॉल क्लबमध्ये गणना केली जाते. हालँडच्या समावेशामुळे या संघाला अधिक बळकटी मिळाली आहे. हालँडने सिटीकडून आतापर्यंतच्या ११ सामन्यांत १७ गोल केले आहेत. यापैकी प्रीमियर लीगमध्ये त्याने ८ सामन्यांतच १४ गोल केले असून यात तब्बल तीन हॅटट्रिकचा समावेश आहे. त्यामुळे प्रीमियर लीगमध्ये सर्वांत कमी सामन्यांत तीन हॅटट्रिकचा विक्रम त्याने आपल्या नावे केला आहे.

मँचेस्टर युनायटेडविरुद्धची कामगिरी खास का ठरली?

शनिवारी (१ ऑक्टोबर) प्रीमियर लीगमध्ये मँचेस्टर सिटीने पारंपरिक प्रतिस्पर्धी मँचेस्टर युनायटेडचा ६-३ असा पराभव केला. या सामन्यात हालँड आणि फिल फोडेन या दोघांनीही सिटीकडून हॅटट्रिक नोंदवली. प्रीमियर लीगमध्ये घरच्या मैदानावरील सामन्यात हालँडची ही सलग तिसरी हॅटट्रिक ठरली आणि ही कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू आहे. तसेच प्रीमियर लीगमध्ये सर्वांत कमी सामन्यांत तीन हॅटट्रिकचा मायकेल ओवेनचा विक्रमही हालँडने मोडीत काढला. ओवेनने ४८ सामन्यांत तीन हॅटट्रिक केल्या होत्या. तर मँचेस्टर युनायटेडचा आघाडीपटू रोनाल्डोने प्रीमियर लीगमध्ये तीन हॅटट्रिक करण्यासाठी २३२ सामने घेतले. तसेच युनायटेडविरुद्ध हालँडने दोन गोलसाहाय्यही (असिस्ट) केले. त्यामुळे मँचेस्टरमधील या बलाढ्य दोन संघांतील सामन्यांत पाच गोलमध्ये सहभाग असणारा हालँड पहिलाच खेळाडू ठरला.

चॅम्पियन्स लीगशी खास नाते का?

चॅम्पियन्स लीग ही व्यावसायिक फुटबाॅलमधील सर्वांत लोकप्रिय आणि प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. ही स्पर्धा आपली सर्वांत आवडती असल्याचे हालँडने अनेकदा सांगितले आहे. मात्र, केवळ बोलण्यातून नाही, तर आपल्या खेळातूनही हालँडने हे सिद्ध केले आहे. हालँडने आतापर्यंत चॅम्पियन्स लीगमधील २१ सामन्यांत २६ गोल झळकावले आहेत. चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वांत कमी सामन्यांत १०, १५ आणि २५ गोलचे विक्रम हालँडने आपल्या नावे केले आहेत. चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वाधिक गोलचा मानकरी असलेल्या रोनाल्डोने पहिल्या २० सामन्यांत एकही गोल केला नव्हता. तसेच तीन विविध क्लबकडून (आरबी साल्झबर्ग, डॉर्टमुंड व मँचेस्टर सिटी) चॅम्पियन्स लीग पदार्पणात दोन किंवा त्यापेक्षा अधिक गोल करणारा हालँड हा एकमेव खेळाडू आहे. यंदाच्या हंगामात त्याने दोन सामन्यांत तीन गोल केले आहेत.

हालँडच्या कारकीर्दीची सुरुवात कशी झाली?

मँचेस्टर सिटी आणि लीड्स युनायटेड यांसारख्या संघांकडून खेळलेले माजी फुटबॉलपटू अल्फी हालँड यांचा मुलगा अर्लिंगने अगदी लहानपणापासूनच व्यावसायिक फुटबॉलपटू होण्याचे स्वप्न बाळगले. वयाच्या पाचव्या वर्षी हालँड नॉर्वेतील क्लब ब्रायनच्या अकादमीत दाखल झाला. २०१५मध्ये वयाच्या १५व्या वर्षी त्याने व्यावसायिक फुटबाॅल खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर २०१७मध्ये त्याला नॉर्वेतील बलाढ्य संघ मोल्डेने आपल्या संघात समाविष्ट करून घेतले. पुढील वर्षीच त्याला ऑस्ट्रियन संघ रेड बुल साल्झबर्गकडून खेळण्याची संधी मिळाली. या संघाकडून खेळताना केवळ २७ सामन्यांत २९ गोल केल्यानंतर युरोपातील विविध नामांकित संघांनी त्याला खरेदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने डॉर्टमुंडला पसंती दर्शवली. या संघाकडून ८९ सामन्यांत ८६ गोल नोंदवल्यामुळे तो अधिकच प्रकाशझोतात आला. यंदाच्या हंगामापूर्वी प्रीमियर लीग संघ मँचेस्टर सिटीने त्याला खरेदी केले.

हालँडचे वैशिष्ट्य काय?

६ फूट ५ इंच उंची, चेंडूसह व चेंडूविना वेगाने धावण्याची क्षमता, बचावपटूंनी दडपण टाकल्यानंतरही चेंडूवर ताबा ठेवण्याची क्षमता आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गोलच्या संधीचे सोने करणे, हे गुण हालँडला खास बनवतात. ‘‘मी पुरेसे गोल मारत नाही. माझे सामन्यांपेक्षा अधिक गोल असले पाहिजेत,’’ असे २११ व्यावसायिक सामन्यांत १७२ गोल करणारा हालँड म्हणतो. ही मानसिकता आणि अधिकाधिक गोल नोंदवण्याची भूक, यामुळेच हालँडची वयाच्या २२व्या वर्षीच जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणना केली जाते आहे.