Who is Goldy Brar : २०२३ मध्ये कॅनडात खलिस्तान समर्थक नेता हरदीपसिंग निज्जर याची हत्या झाली होती. फरार गँगस्टर आणि कथित दहशतवादी गोल्डी ब्रार याचं नाव या हत्याप्रकरणाशी पुन्हा जोडलं जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये ब्रारने निज्जर यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली, असा दावा केला जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गोल्डी बरारचं नाव चर्चेत आलं आहे.
निज्जर यांच्या हत्येनंतर कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या हत्येमागे भारतीय एजंट्सचा संभाव्य संबंध असल्याचा आरोप केला होता. भारताने हा आरोप ठामपणे फेटाळून लावला होता. या प्रकरणामुळे भारत आणि कॅनडामधील संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला.
निज्जर यांची हत्या का करण्यात आली, याबद्दलचं कारण गोल्डी ब्रारने व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्ट केलं आहे. निज्जर हे तरुणांना ड्रग्स विक्रीसाठी प्रवृत्त करत होते, असा आरोप ब्रारने केला आहे. ब्रारवर अनेक गुन्हे दाखल असून तो भारताला हवा असलेला फरार आरोपी आहे. अमेरिकेच्या एफबीआयने गेल्या महिन्यात त्याच्याबाबत माहिती देणाऱ्यास ५० हजार डॉलरचं बक्षीस जाहीर केलं आहे. भारत सरकारने यापूर्वीच बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा अर्थात यूएपीए अंतर्गत ब्रारला दहशतवादी घोषित केलं आहे.
गोल्डी ब्रार कोण आहे?
गोल्डी ब्रार हा पंजाबमधील फरीदकोट जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा साथीदार मानला जातो. बिश्नोईच्या टोळीने २०२२ मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला आणि २०२४ मध्ये काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या केली होती. पंजाबमध्ये या टोळीवर खंडणीचे रॅकेट चालवल्याचेही आरोप आहेत. २०२१ मध्ये युवक काँग्रेसचे नेते गुरलाल पहलवान यांच्या हत्येशीही बिश्नोईचा संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता.
सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा अकाली दलाचे नेते विक्की मिद्दूखेडा यांच्या हत्येशी संबंध आहे, असं पंजाबचे माजी डीजीपी व्ही. के. भावरा यांनी म्हटलं होतं. त्यानंतर गोल्डी ब्रारच्या नावाने सोशल मीडियावर एक पोस्टही समोर आली होती. मिद्दूखेडा यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मूसेवालांची हत्या करण्यात आल्याचा दावा त्यात करण्यात आला होता. हा प्रकार उत्तर भारतातील टोळ्यांमधील संघर्षाशी संबंधित असल्याचंही त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
भारतीय केंद्रीय तपास यंत्रणांनी गोल्डी ब्रारबाबत तयार केलेल्या डोसियरमध्ये (माहितीचा सविस्तर अहवाल) नमूद करण्यात आलं की, बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) या दहशतवादी संघटनेशी गोल्डीचे संबंध होते. तसेच या अहवालात गोल्डीवर अनेक हत्यांमध्ये सहभाग असल्याचा, खंडणीसाठी धमकीचे फोन केल्याचा आणि सोशल मीडियावर हत्यांची जबाबदारी घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, त्याला सीमेपलीकडून मदत मिळत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
गोल्डी ब्रारने सीमेपलीकडून ड्रोनच्या माध्यमातून उच्च दर्जाची शस्त्रं, दारुगोळा आणि स्फोटकं आणून हत्यांसाठी पुरवले, असा आरोपही या डोसियरमध्ये करण्यात आला आहे. या हत्यांसाठी शार्पशूटर्सचीही व्यवस्था केल्याचं डोसियरमध्ये नमूद आहे.
२०२२ मध्ये गोल्डी ब्रार कॅनडातून काम करत असल्याचं मानलं जात होतं. पंजाबमधील एका मॉड्यूलच्या माध्यमातून तो कारवाया करत असल्याचा आरोप होता. मात्र, त्याचं ठिकाण वारंवार बदलत असल्याचं सांगितलं जातं. एफबीआयच्या मते, सध्या गोल्डी ब्रार अमेरिकेत आहे. याच वर्षी जुलैमध्ये अमेरिकेने लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्यावर निज्जरच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आणि ब्रारबाबत माहिती देण्यासाठी बक्षीस जाहीर केलं. त्याच महिन्यात कॅनडाने मात्र निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग नसल्याचं स्पष्ट केलं.
गोल्डी ब्रारचा कॅनडाशी संबंध काय?
गोल्डी ब्रारचा चुलत भाऊ गुरलाल ब्रार याची २०२१ मध्ये चंदीगडच्या इंडस्ट्रियल एरियातील एका डिस्कोबाहेर हत्या झाली होती. गुरलाल हा लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रारचा जवळचा साथीदार होता. या हत्येचा बदला घेण्यासाठी गोल्डी ब्रारने फरीदकोटमधील गुरलाल पहलवानच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप कऱण्यात आहे. पोलिसांनी त्याला या प्रकरणातील मुख्य संशयित ठरवल्यानंतर अटकेपासून वाचण्यासाठी तो कॅनडाला पळून गेल्याचं सांगितलं जातं.
कॅनडात गेल्यानंतरही त्याने तिथूनच आपलं नेटवर्क चालवल्याचा आरोप आहे. १ मे २०२२ रोजी अँटी गँगस्टर टास्क फोर्सने (AGTF) भटिंडा येथून गोल्डी ब्रारच्या तीन साथीदारांना अटक केली. हे तिघे गोल्डी ब्रारच्या खंडणीच्या प्लॅनचा भाग म्हणून एका व्यावसायिकाला लक्ष्य करण्याच्या तयारीत होते, असा पोलिसांचा दावा होता. पोलिसांच्या मते, गोल्डी भारतात हत्यांसाठी शूटरची व्यवस्था करतो आणि सध्या तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात राहून या कारवायांचा कट रचतो.
हरदीपसिंग निज्जर कोण होता?
भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, हरदीपसिंग निज्जर खलिस्तान टायगर फोर्स (KTF) या संघटनेच्या कारवायांमध्ये सहभागी होता. संघटनेसाठी तरुणांची भरती करणे, आर्थिक मदत उभी करणे आणि कारवायांचं नियोजन करणे असे आरोप त्याच्यावर होते. KTF ला २०२३ मध्ये UAPA अंतर्गत दहशतवादी संघटना घोषित करण्यात आलं. निज्जरला १९९७ मध्ये कॅनडाचं नागरिकत्व मिळालं होतं.
