Who is Hassan Khomeini : अमेरिका व इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा रविवारी (१ मार्च) मृत्यू झाला. त्यांच्याबरोबर संरक्षण दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनाही आपले प्राण गमावावे लागल्याची माहिती इराणच्या दूरचित्रवाहिन्यांनी दिली. अयातुल्ला खामेनी यांच्या हत्येनंतर इस्लामिक रिपब्लिकमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात इराणचे नेतृत्व नेमके कोण करणार असा प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या शर्यतीत हसन खोमेनी यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. त्याविषयीचा हा आढावा…
कोण आहेत हसन खोमेनी?
हसन खोमेनी हे इस्लामिक क्रांतीचे जनक व इराणचे पहिले सर्वोच्च नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांचे नातू आहेत. इराणच्या कट्टरपंथी व्यवस्थेत तुलनेने मवाळ व उदारवादी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. मुस्लीम राष्ट्रातील सुधारणावादी गटांशी हसन खोमेनी यांचे चांगले संबंध असल्याचे सांगितले जाते. इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद खतामी आणि हसन रुहानी यांनी आपल्या कार्यकाळात पाश्चात्य देशांशी संबंध सुधारण्याचे आणि चर्चेचे धोरण अवलंबले होते. हसन खोमेनी हेदेखील त्याच विचारांचे समर्थक मानले जातात. इराणमधील अनेक राजकारणी हसन यांच्याकडे कट्टरपंथीयांना पर्याय म्हणून पाहतात. अयातुल्ला खामेनी यांच्या कार्यकाळात वाढलेल्या कट्टरपंथीय गटांचा प्रभाव फक्त हसन खोमेनी हेच रोखू शकतील, अशी अनेकांना आशा आहे.
आणखी वाचा : इराणवरील अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांमुळे भारताच्या अडचणीत मोठी वाढ; कारण काय?
इराणमध्ये धर्मगुरू म्हणून कार्यरत
हसन खोमेनी हे सध्या इराणमध्ये धर्मगुरू म्हणून काम करतात. आतापर्यंत त्यांनी कोणतेही सरकारी पद भूषवलेले नाही. सुधारक विचारसरणी आणि कौटुंबिक वारशामुळे हसन यांच्याकडे अयातुल्ला खामेनी यांचे संभाव्य उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे. अमेरिका व इस्रायलने गेल्या वर्षी जूनमध्ये इराणच्या अणुप्रकल्पांवर संयुक्त हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यानंतर हसन खोमेनी यांचे नाव पहिल्यांदा चर्चेत आले. त्यावेळी आपल्या आजोबांच्या समाधीस्थळी भाषण करताना “सन्मान युद्धातूनही मिळू शकतो आणि वाटाघाटींमधूनही” असे मत हसन यांनी व्यक्त केले होते.
इराणचा मवाळ चेहरा म्हणून ओळख
हसन खोमेनी यांना आपल्या सुधारणावादी विचारांमुळे कट्टरपंथीयांच्या विरोधाला सामोरे जावे लागले आहे. सुधारक गटाशी असलेल्या निकटच्या संबंधांमुळे २०१६ मधील ‘असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स’च्या निवडणुकीसाठी त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. ५३ वर्षीय हसन खोमेनी यांचा निकाह एका अयातुल्लांच्या कन्या सैयदा फातिमा यांच्याशी झाला असून त्यांना चार अपत्ये आहेत. हसन यांनी अरबीसह इंग्रजी भाषेवर मजबूत प्रभुत्व मिळवले आहे. तरुण वयात असताना त्यांना फुटबॉल खेळण्याची प्रचंड आवड होती; मात्र आजोबांच्या आग्रहाखातर त्यांनी फुटबॉल सोडून ‘कोम’ शहरात इस्लामिक धर्मशास्त्राचे शिक्षण घेतले.
निवडणूक प्रक्रियेवर केली होती टीका
हसन खोमेनी यांनी यापूर्वी इराणमधील प्रस्थापित नेतृत्वाला आणि त्यांच्या नियमांना अनेकदा आव्हान दिले आहे. २०२१ मध्ये राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सुधारणावादी असल्याचे सांगून त्यांना अपात्र ठरवल्यानंतर त्यांनी इराणच्या गार्डियन कौन्सिलवर टीका केली होती. तुम्ही माझ्यासाठी एखादा उमेदवार निवडू शकत नाही आणि मला त्यालाच मतदान करायला सांगू शकत नाही असे ते म्हणाले होते. हसन यांना अपात्र ठरवल्यानंतर कट्टरपंथीय उमेदवार इब्राहिम रईसी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, २०२४ मध्ये त्यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यामुळे पुन्हा हसन यांचे नाव चर्चेत आले.
इराणच्या व्यवस्थेशी निष्ठाही जपली
२०२२ मध्ये हिजाब प्रकरणावरून महसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीचा कोठडीत मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण इराणमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यावेळी हसन खोमेनी यांनी प्रशासनाकडून उत्तरदायित्वाची मागणी केली होती. प्रबोधन आणि शिक्षणाच्या नावाखाली कोठडीत ठेवलेल्या या तरुणीबरोबर नक्की काय घडले याचे उत्तर सरकारने द्यायला हवे, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती. एकीकडे सुधारणांची मागणी करीत असतानाच हसन यांनी इराणच्या व्यवस्थेशी असलेली आपली निष्ठाही जपली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अयातुल्ला खामेनी यांच्याविरोधात इराणमध्ये मोठी हिंसक आंदोलने झाली होती, त्यावेळी आंदोलन करणारे इस्रायलचे हस्तक असल्याचा आरोप त्यांनी केला. काही हिंसक घटनांची तुलना त्यांनी इस्लामिक स्टेटच्या (ISIS) कृत्यांशी केली होती.
हेही वाचा : पाकिस्तानने त्यांच्याच देशातील लोकांना ठार का मारले? खामेनी यांच्या हत्येनंतर कराचीत काय घडले?
आधुनिक आणि पुरोगामी दृष्टिकोन
अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या झाल्यानंतर हसन यांनी एक शोकपत्र जारी करीत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांनी अयातुल्ला यांना इराणच्या जनतेचे आणि मुस्लिमांचे नायक म्हणून संबोधले होते. इराणची महान जनता खामेनी यांच्या दु:खातून लवकरच बाहेर निघेल आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालेल, असे त्यांनी नमूद केले होते. हसन यांच्या एका निकटवर्तीयाने २०२५ मध्ये रॉयटर्सशी बोलताना त्यांना दूरदृष्टी असलेले धर्मगुरू असे संबोधले होते. हसन खोमेनी हे इराणमधील महिलांचे अधिकार आणि सामाजिक स्वातंत्र्य या विषयांवर अत्यंत प्रगत विचार मांडतात. त्यांना जेवढी इस्लामिक शिकवणीबद्दल उत्सुकता आहे तेवढीच पाश्चात्य तत्त्वज्ञानाबद्दलही आहे, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.
हसन खोमेनी इराणचे सर्वोच्च नेते होणार?
इराणच्या सर्वोच्च पदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे हसन खोमेनी यांचा राजकीय प्रवास संघर्षाने भरलेला आहे. कधीकाळी इराणच्या शक्तिशाली लष्करी दलावर टीका करणाऱ्या हसन यांनी आता मात्र इस्रायलविरुद्धच्या संघर्षात लष्कराच्या पाठीशी उभे राहणे पसंत केले आहे. साधारणत: दहा वर्षांपूर्वी हसन यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी अयातुल्ला खामेनी यांनीदेखील त्यांना हिरवा कंदील दिला होता. आजोबांच्या नावाला कलंक लागेल असे काहीही करू नका, अशी तंबीही त्यांनी हसन यांना दिली होती. तरीदेखील इराणच्या गार्डियन कौन्सिलने त्यांची उमेदवारी रद्द केली होती. विश्लेषकांच्या मते, एका संभाव्य सुधारणावादी नेत्याला सत्तेच्या सर्वोच्च वर्तुळापासून दूर ठेवण्यासाठी ही खेळी खेळली गेली होती. यादरम्यान खामेनी यांच्या निधनानंतर इराणच्या सर्वोच्च नेतेपदी हसन यांची निवड होणार की गार्डियन कौन्सिल दुसऱ्याच नेत्याचे नाव सुचवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
