विश्लेषण : बिहारी 'गब्बर'च्या मुसक्या आवळणारे 'दबंग' अधिकारी; 'बिहार डायरीज'चे ख-या आयुष्यातील हिरो IPS अमित लोढा कोण? | who is ips amit lodha who captured bihars most wanted gangster netflix series story | Loksatta

विश्लेषण : बिहारी ‘गब्बर’च्या मुसक्या आवळणारे ‘दबंग’ अधिकारी; ‘बिहार डायरीज’चे खऱ्या आयुष्यातील हिरो IPS अमित लोढा कोण?

आयआयटीमध्ये मन रमत नसल्या कारणाने त्यांनी UPSC ची परीक्षा द्यायचं नक्की केलं

विश्लेषण : बिहारी ‘गब्बर’च्या मुसक्या आवळणारे ‘दबंग’ अधिकारी; ‘बिहार डायरीज’चे खऱ्या आयुष्यातील हिरो IPS अमित लोढा कोण?
आयपीएस अधिकारी अमित लोढा

नेटफ्लिक्सवर ‘खाकी: द बिहार चॅप्टर’ ही वेबसीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. नीरज पांडे यांची संकल्पना असलेली ही वेबसिरीज आयपीएस अधिकारी अमित लोढा यांच्या जीवनातील काही घडामोडींवर बेतलेली आहे. यातील घटनांची अमित लोढा यांनी लिहिलेल्या ‘द बिहार डायरीज’ या पुस्तकात माहीती आहे. बिहारमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि तिथल्या एका मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यासाठी बिहार पोलिसांनी घेतलेली मेहनत यावर या सीरिजमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. आयपीएस अमित लोढा यांनी या कुख्यात गँगस्टरला कशा पद्धतीने पकडलं? नेमकं बिहार पोलिसने कोणतं ऑपरेशन केलं याविषयी सगळी माहिती त्यांनी त्यांच्या या पुस्तकात दिली आहे.

आयपीएस अमित लोढा यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल सांगताना अशाच एका भयानक गुन्हेगाराची कहाणी सांगितली जी ऐकताना आजही अंगावर काटा येतो. तो गुन्हेगार म्हणजे अशोक महतो आणि त्याची गँग. याने २४ तासांत १५ जणांची हत्या केली होती. तो खूप क्रूर होता. एका हातात मुलांचे डोके पकडून दुसऱ्या हाताने त्याच डोक्यात तो गोळी मारत असे. इतका महतो निर्दयी होता. यालाच पकडण्याची कहाणी या सीरिजमध्ये आणि या पुस्तकात मांडण्यात आली आहे.

आणखी वाचा : ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ‘प्रचारकी’ असेल, तर मग इस्रायलच्या बहुचर्चित ‘फौदा’ या वेबसीरिजला काय म्हणावं?

२००१ मध्ये महतो नवादा जेलमधून ५ पोलिस अधिकाऱ्यांना मारून फरार झाला आणि त्यानंतर मात्र त्याने बिहार पोलिसांचं जगणं मुश्किल केलं होतं. नंतर त्याने सरसकट एका गावात घुसून १५ ते २० निरपराध लोकांना गोळ्या घालून ठार केलं होतं. शिवाय पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटण्यात तो महिर होताच, पण तो कुठे लपायचा याचा थांगपत्तादेखील कुणाला लागत नसे. त्याकाळात नुकतेच मोबाइल फोन बाजारात आले असल्या कारणाने ते फोन टॅप करून महतो विरोधात कारवाई करण्यात पोलिसांना यश मिळालं आणि त्याच्या गँगमधील इतर सदस्यांनादेखील पकडणं सोप्पं पडलं.

लहानपणापासून अमित लोढा यांच्या मनावर बिंबवले गेले की सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये समाजात अत्यंत आवश्यक असलेले सकारात्मक बदल घडवून आणण्याची आणि उपेक्षितांना आवाज मिळवून देण्याची शक्ती आहे. त्यांचे आजोबा आयएएस अधिकारी होते. अमित लहानपणी प्रचंड लाजाळू असल्यामुळे, त्यांनी कधीही विचार केला नव्हता की ते स्वतः खाकी गणवेश घालून देशातील लोकांच्या हितासाठी झटतील. लोढा हे आयआयटीसाठी सिलेक्ट झाले होते, पण त्यांच्या मनात असलेल्या न्यूनगंडामुळे तिथे त्यांची म्हणावी तशी वाढ झाली नाही. आयआयटीमध्ये मन रमत नसल्या कारणाने त्यांनी UPSC ची परीक्षा द्यायचं नक्की केलं. शिवाय फार कमी वयात त्यांनी ही परीक्षा पास केली.

महतोला पकडण्यात अमित लोढा यांनी दिवसरात्र एक केलं होतं. खासगी आयुष्यसुद्धा बाजूला ठेवून बिहारच्या या कुख्यात गँगस्टरला पकडण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. शिवाय पत्रकार परिषदेतही अमित यांनी अशोक महतोच्या गँगला १५ ऑगस्टच्या आत संपवून टाकायचं आश्वासन दिलं होतं आणि म्हंटल्याप्रमाणे त्यांनी तसं करूनही दाखवलं होतं. याचसाठी बिहारमध्ये त्यांच्या नावाला एक महत्त्व होतं.

आणखी वाचा : ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ‘प्रचारकी’ असेल, तर मग इस्रायलच्या बहुचर्चित ‘फौदा’ या वेबसीरिजला काय म्हणावं?

काही वर्षांनंतर, जेव्हा अमित लोढा यांना नक्षल प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळालं तेव्हा त्यांना पोलीस शौर्य पदक देऊन सन्मानित करण्यात आलं. बिहारमधील ‘शेखपुराच्या गब्बर सिंग’ला म्हणजेच महतो गँगच्या लीडरला पकडल्यानंतर अमित लोढा यांची ख्याती सर्वदूर पसरली. याच अमित लोढा आणि महतो गँगमधला हा उंदरा मांजराचा थरारक खेळ तुम्हाला नेटफ्लिक्सच्या ‘खाकी’ या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 19:01 IST
Next Story
विश्लेषण: तीन घुमट, एक बस-स्टॉप आणि राजकीय खडाजंगी; म्हैसूरमधील बस स्थानकामुळे निर्माण झालेला वाद नेमका काय?