Jagdish Afale Ayodhya Shri Ram Mandir News : अयोध्येतील राम मंदिराचा दैनंदिन कारभार अधिक प्रभावी करण्यासाठी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाने जगदीश आफळे यांची सचिवपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या देवस्थानाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली जाणार आहे. मंदिराच्या दैनंदिन प्रशासनाचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी विश्वस्त मंडळाने हे नवीन पद तयार केले आहे. अलीकडेच राम मंदिराला मिळालेल्या देगण्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर या नियुक्तीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोण आहेत जगदीश आफळे? त्यांचे महाराष्ट्राशी काय आहे कनेक्शन? श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंडळाचे सचिव म्हणून आफळे यांच्याकडे कोणती जबाबदारी असणार? त्याविषयीचा हा आढावा…

जगदीश आफळे आहे तरी कोण?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले जगदीश आफळे हे मूळ महाराष्ट्रातील पुणे शहरातील रहिवासी आहेत. त्यांनी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विषयात बीटेक (B-Tech) पदवी घेतली असून, आयआयटी बॉम्बे येथून एमटेकचे (M-Tech) शिक्षण पूर्ण केले आहे. आपल्या अभियांत्रिकी कारकिर्दीत जगदीश आफळे यांनी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये महत्वाच्या पदांवर काम केले आहे. युरोप आणि अमेरिका यांसारख्या प्रगतशील देशांतही त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रातील निवृत्तीनंतर ते भारतात परतले होते. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रकल्पाशी त्यांचा जुना संबंध आहे. मंदिराच्या बांधकामासाठी तांत्रिक मार्गदर्शन करणाऱ्या चार वरिष्ठ अभियंत्यांच्या पथकात त्यांचा समावेश होता. मंदिराच्या पायाभरणीपासून ते इतर महत्त्वाच्या संरचनांच्या उभारणीपर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मंदिराच्या उभारणीपासूनच ते तीर्थ क्षेत्र भवनात वास्तव्यास आहेत.

आफळेंकडे काय असतील जबाबदाऱ्या?

याबाबत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंडळाचे कार्यवाहक सरचिटणीस कृष्ण मोहन यांनी माध्यमांना सांगितले की, ६ जुलै रोजी झालेल्या देवस्थानाच्या बैठकीत सचिवपदी जगदीश आफळे यांच्या नावाचा प्रथम प्रस्ताव ठेवण्यात आला होता. ही बैठक तीर्थक्षेत्र मंडळाचे माजी सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यांना मंजुरी दिल्यानंतर झाली होती. याच बैठकीत विश्वस्त मंडळाने पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरील नियुक्ती एका महिन्यासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. कारण, छाननी समितीला सुमारे पाच हजार २०० हून अधिक अर्जांमधून निवडलेल्या तीन उमेदवारांचे मूल्यमापन करण्यासाठी अतिरिक्त वेळ आवश्यक होता. राम मंदिराचे सचिव म्हणून जगदीश आफळे हे आता कार्यवाहक सरचिटणीस कृष्ण मोहन यांना अहवाल सादर करतील. प्रशासकीय पदाधिकारी म्हणून ते काम पाहतील; मात्र तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे कायमस्वरुपी सदस्य नसतील. सचिव या नात्याने श्रीराम मंदिराच्या दैनंदिन प्रशासनाचा आणि कामकाजाचा संपूर्ण कारभार आफळे यांच्या अखत्यारीत असेल. मंदिरातील नियमित व्यवस्थापन, प्रशासकीय समन्वय आणि दैनंदिन कार्य सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

आर्थिक व्यवहारांवरही असेल आफळे यांची नजर

राम मंदिराचे सचिव म्हणून दैनंदिन प्रशासनाची जबाबदारी सांभाळण्याबरोबरच जगदीश आफळे यांची मंदिराच्या आर्थिक व्यवहारांसाठी संयुक्त स्वाक्षरीकर्ता म्हणूनही नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबत श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे कार्यवाहक सरचिटणीस कृष्ण मोहन यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, बँक व्यवहारांसाठी मी आणि जगदीश आफळे हे संयुक्त स्वाक्षरीकर्ते राहणार असून विश्वस्त मंडळाने यास मंजुरी दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सुरुवातीला स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा या तीन बँकांनी तीर्थक्षेत्राच्या नियमावलीत बदल न करता आफळे यांना खात्यांचे संयुक्त स्वाक्षरीकर्ता म्हणून स्वीकारण्याबाबत नकार दिला होता. दरम्यान, गेल्या १५ दिवसांपासून जगदीश आफळे राम मंदिराच्या प्रशासकीय कामकाजाची माहिती घेत असून, नव्या जबाबदाऱ्यांशी स्वतःला जुळवून घेत आहेत. मात्र, आपल्या नव्या भूमिकेबाबत विचारले असता त्यांनी २ सप्टेंबरनंतरच माध्यमांशी संवाद साधणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

राम मंदिरातील देणगी गैरव्यवहार प्रकरण काय आहे?

श्रीराम मंदिराला मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणगीतील रक्कम गायब झाल्याचा आरोप जून महिन्याच्या सुरुवातीला झाला होता. या आरोपामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने या कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापना केली. हे पथक देणगी निधीतील कथित अनियमितता आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करत आहे. आतापर्यंत या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. एसआयटीच्या चौकशीदरम्यान देणगी निधीच्या कथित अपहाराचे प्रथमदर्शनी पुरावे समोर आल्याचे वृत्त आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेला माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आठही आरोपींनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कार्यपद्धतीची माहिती असल्याचा फायदा घेत त्यांनी देणगीतील रक्कम हडप केली होती.

देणगी वादानंतर तीर्थक्षेत्र मंडळात मोठे बदल

देणगी गैरव्यवहाराच्या वादानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र विश्वस्त मंडळाचे तत्कालीन सरचिटणीस चंपत राय आणि तीर्थक्षेत्र मंडळाचे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तसेच, विशेष निमंत्रित सदस्य गोपाल राव यांनाही त्यांच्या पदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर ६ जुलै रोजी देवस्थानात महत्त्वाचे प्रशासकीय बदल करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी कृष्ण मोहन यांच्याकडे मंदिराच्या दैनंदिन कारभाराची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. ७४ वर्षीय कृष्ण मोहन यांची तीर्थ क्षेत्र विश्वस्त मंडळाच्या हंगामी सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर त्यांनी मंदिराच्या दैनंदिन कारभाराची सूत्रे अत्यंत प्रभावीपणे सांभाळण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील रहिवासी असलेले कृष्ण मोहन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रभावशाली पदाधिकारी मानले जातात. लखनौ विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही वर्षे अणुऊर्जा विभागात काम केले. १९७८ मध्ये कृष्ण मोहन यांची महाराष्ट्र केडरमध्ये वनसेवा अधिकारी म्हणून निवड झाली. दीर्घ प्रशासकीय कारकीर्दीनंतर २०१२ मध्ये ते अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक पातळीवर त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.