Indias First Woman on the Titans Space Mission पहिल्यांदाच एका भारतीय विद्यार्थिनीने नासाचा आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम (इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम) अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. जान्हवी दांगेती ही हा अभ्यासक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय आहे. या अभ्यासक्रमातील काही हुशार विद्यार्थ्यांची अंतराळ मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विषयात अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या जान्हवी दांगेतीने वैज्ञानिक संशोधनात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अंतराळ प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्या आजच्या पिढीसाठी तिची कहाणी प्रेरणादायी आहे.
ती सध्या टायटन ऑर्बिटल पोर्ट स्पेस स्टेशनच्या २०२९ च्या अंतराळ प्रवासासाठी प्रशिक्षण घेत आहे. त्यासाठी मोजक्या मुलांची निवड करण्यात आली. त्यात तिच्याही नावाचा समावेश आहे. आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील पलाकोल्लू या छोट्याशा गावातील रहिवासी असणाऱ्या जान्हवीने जागतिक अंतराळ संस्थेपर्यंतचा प्रवास कसा गाठला? तिने हा अभ्यासक्रम कसा पूर्ण केला? अंतराळ मोहिमेसाठी तिची निवड कशी करण्यात आली? त्याविषयी जाणून घेऊ…

२०२९ मध्ये ‘टायटन ऑर्बिटल पोर्ट स्पेस स्टेशन’च्या ऐतिहासिक प्रवासाची तयारी
‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, जान्हवीने नासातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तिची अमेरिकेतील एका संस्थेने सुरू केलेल्या टायटन ऑर्बिटल पोर्ट स्पेस स्टेशनच्या आगामी मोहिमेसाठी निवड करण्यात आली. हे अंतराळ स्थानक २०२९ पर्यंत पूर्णपणे कार्यरत होणार आहे. २०२९ मध्येच जान्हवी अंतराळ प्रवास करणार आहे. या मोहिमेसाठी तिची निवड होणे, हे केवळ तिच्यासाठीच नव्हे, तर भारतासाठीही एक मैलाचा दगड आहे. ती पृथ्वीबाहेरील मोहिमांवर काम करणाऱ्या नव्या पिढीतील अंतराळवीरांच्या विशेष समुदायाचा एक भाग आहे.
तिची नियुक्ती जागतिक अंतराळ मोहिमांमध्ये भारताच्या वाढत्या योगदानाचा एक पुरावा आहे आणि भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे. या अभ्यासक्रमासाठी जगभरातील केवळ २० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्या टीमचे नाव ‘टीम केनेडी’ असे होते. त्यासाठी तिला ‘मिशन डायरेक्टर’ म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तिने १६ देशांमधील मुलांच्या गटाचे नेतृत्व केले. तसेच सूक्ष्म रॉकेट प्रक्षेपणदेखील यशस्वीपणे केले.
जान्हवी दांगेतीचा शैक्षणिक प्रवास
- जान्हवीने तिचे प्राथमिक शिक्षण तिच्या गावात पूर्ण केले.
- त्यानंतर ती पंजाब राज्यातील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (LPU) मध्ये दाखल झाली.
- तिथे तिने इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनियरिंगमध्ये बॅचलर पदवी प्राप्त केली.
- तिच्या तंत्रज्ञान आधारित शिक्षणामुळे तिला अंतराळ विज्ञानाच्या विशेष क्षेत्रात प्रवेश मिळविण्यात मदत झाली.
- तिचे पालक पद्मश्री आणि श्रीनिवास दोघेही आता कुवेतमध्ये राहतात.
जान्हवी केवळ शास्त्रज्ञच नाही, तर तिने विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित (STEM) क्षेत्राबाबत तरुणांना मार्गदर्शनही केले आहे. जास्तीत जास्त तरुणांची विज्ञान क्षेत्रात आवड निर्माण व्हावी म्हणून तिने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपक्रमांमध्ये सक्रिय भूमिका घेतली आहे. इस्रोच्या आउटरीच कार्यक्रमांमध्ये भाषणे देणे, देशभरातील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थांना (एनआयटी) संबोधित करणे, खोल समुद्रातील डायव्हिंग उपक्रम आणि सायन्स फोरममध्ये भाग घेणे यांसारख्या अनेक गोष्टी ती करीत आहे. ‘आउटरीच’मधील जान्हवी आणि तिच्या टीमचे काम भविष्यातील अंतराळ मोहिमांची शाश्वतता, अंतराळवीरांना भेडसावणाऱ्या वास्तविक जगातील आव्हानांवर भर देणे आहे. त्यात रेडिएशन एक्स्पोजर, आयसोलेशन व संसाधनांचा वापर यांचा समावेश आहे.
जान्हवीची सर्वांत प्रतिष्ठित वैज्ञानिक कामगिरी म्हणजे नासा आणि इतर आंतरराष्ट्रीय एजन्सींनी प्रायोजित केलेल्या इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल सर्च कोलॅबोरेशन (आयएएससी) मध्ये काम करणे. तिने हवाईमधील पॅन-स्टार्स टेलिस्कोपच्या मदतीने रिअल-टाइम खगोलशास्त्रीय डेटाचा वापर करून लघुग्रहांचा शोध लावला. ती नासातील सर्वांत तरुण विदेशी अॅनालॉग अंतराळवीर आणि स्पेस आइसलँडच्या भूगर्भशास्त्र प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवडलेली पहिली भारतीय ठरली आहे. हे विशेष प्रशिक्षण बाह्य भूगर्भशास्त्रावर केंद्रित होते. त्यात विद्यार्थ्यांना शून्य गुरुत्वाकर्षण, पाण्याखालील रॉकेट प्रक्षेपण, विमान हाताळणी आणि अंतराळासंबंधित अन्य तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले.
जान्हवी दांगेतीला मिळालेले पुरस्कार
जान्हवीची जिद्द आणि कामगिरी यांमुळे तिला अनेक सन्मान मिळाले आहेत,जे खालीलप्रमाणे :
- नासा स्पेस अॅप्स चॅलेंजमध्ये पीपल्स चॉइस पुरस्कार
- इस्रोच्या जागतिक अंतराळ सप्ताह समारंभात यंग अचिव्हर पुरस्कार
देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते नरेश म्हस्के यांनीदेखील फेसबुकवर एक पोस्ट शेअर करीत तिचे अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले, “चंद्र आपला पाठलाग करतोय, असं समजणाऱ्या एका छोट्याशा मुलीने आज चंद्रापलीकडचे स्वप्न उराशी बाळगत खऱ्या अर्थानं आकाश गाठलं आहे. फक्त १९ व्या वर्षी जान्हवी दांगेती हिने पोलंडमध्ये पार पडलेलं १२ दिवसांचं अॅनलॉग अॅस्ट्रॉनॉट मिशन पूर्ण करणारी भारतातील सर्वांत तरुण व्यक्ती बनण्याचा मान मिळवला आहे.”
त्यांनी पुढे म्हटले, “आता तिच्या या अवकाशयात्रेच्या स्वप्नांना खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. कारण- २०२९ मध्ये होणाऱ्या टायटन स्पेसच्या पहिल्यावहिल्या ऑर्बिटल मिशनसाठी ती अधिकृतरीत्या अॅस्ट्रॉनॉट म्हणून निवडली गेली आहे. तिच्या या कामगिरीमुळे भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. जान्हवी दांगेती हिचे मनःपूर्वक अभिनंदन आणि तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.”