Jayshree Ullal The Indian-Origin Billionaire : सुंदर पिचाई आणि सत्य नाडेला यांना मागे टाकून जयश्री उल्लाल यांनी भारतीय वंशाच्या सर्वांत श्रीमंत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. हुरुन इंडियाने जाहीर केलेल्या क्रमवारीतून ही बाब समोर आली आहे. या आकडेवारीमुळे जागतिक स्तरावर भारतीय वंशाच्या व्यावसायिक नेतृत्वाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. उल्लाल या तुलनेने कमी प्रसिद्धीझोतात राहणाऱ्या कार्यकारी अधिकारी असल्या तरीही वैयक्तिक संपत्तीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे त्यांची सर्व स्तरांवर चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर कोण आहेत जयश्री उल्लाल? त्यांची एकूण संपत्ती नेमकी किती आहे? त्याविषयीचा हा आढावा…

हुरुन इंडियाच्या अहवालानुसार, जयश्री उल्लाल यांची एकूण संपत्ती ५०,१७० कोटी रुपये इतकी आहे. त्यांनी संपत्तीच्या बाबतीत सत्य नाडेला (९,७७० कोटी रुपये) व सुंदर पिचाई (५,८१० कोटी रुपये) कित्येक पटींनी मागे टाकले आहे. जयश्री उल्लाल या ६४ वर्षांच्या असून, त्या १७ वर्षांपासून अरिस्ता नेटवर्क्स कंपनीत कार्यरत आहेत. अरिस्ता नेटवर्क्स ही एक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. या कंपनीकडून डेटा सेंटर्स आणि क्लाउड सेवा पुरवठादारांसाठी सॉफ्टवेअर-आधारित क्लाउड नेटवर्किंग सोल्यूशन्स प्रदान केले जाते. त्यांच्या कंपनीने पारंपरिक नेटवर्किंग पद्धतींपेक्षा वेगळा विचार करून, आपल्या नेटवर्किंग क्षेत्रात मोठा बदल घडवून आणला आहे.

जयश्री उल्लाल कोण आहेत?

जगातील सर्वांत श्रीमंत भारतीय वंशाच्या व्यावसायिक महिला म्हणून नाव गाजवणाऱ्या जयश्री उल्लाल यांचा प्रवास थक्क करणारा आहे. सुंदर पिचाई व सत्या नडेला यांच्यापेक्षाही अधिक वैयक्तिक संपत्ती असलेल्या उल्लाल या १७ वर्षांपासून ‘अरिस्ता नेटवर्क्स’मध्ये सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. ‘ब्लूमबर्ग’च्या अहवालानुसार, जयश्री यांना जन्म ब्रिटनमध्ये झाला असून, वयाच्या पाचव्या वर्षी त्या भारतात आल्या होत्या. त्यांचे वडील भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयात कार्यरत होते आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था स्थापन करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले होते.

आणखी वाचा : ‘ऑपरेशन आघात 3.0’ नेमके काय आहे? थर्टीफर्स्टच्या आधी अनेकांना अटक; कारण काय?

दिल्लीत प्राथामिक शिक्षण

जयश्री यांनी नवी दिल्लीतील प्रसिद्ध ‘कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी’ या शाळेतून आपले प्राथामिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को स्टेट युनिव्हर्सिटीमधून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये पदवी मिळवली. १९८६ मध्ये जयश्री यांनी सांता क्लारा विद्यापीठातून इंजिनियरिंग मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. २०२५ मध्ये त्यांच्या अनेक दशकांच्या व्यावसायिक योगदानाची दखल घेऊन, शैक्षणिक क्षेत्राने त्यांना अभियांत्रिकीतील मानद डॉक्टरेट प्रदान करून सन्मानित केले. जयश्री उल्लाल यांनी ‘अरिस्ता’मध्ये येण्यापूर्वी सिस्को सिस्टीम्स, एएमडी व फेअरचाइल्ड सेमीकंडक्टर यांसारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये काम केले. त्यामुळे त्यांना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे सखोल ज्ञान मिळाले.

२००८ पासून अरिस्ता कंपनीत कार्यरत

२००८ मध्ये त्यांनी ‘सिस्को’मधील वरिष्ठ पद सोडून ‘अरिस्ता’ या छोट्या स्टार्टअपमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ‘अरिस्ता’मध्ये ३० पेक्षाही कमी लोक कार्यरत होते आणि या कंपनीचे कामकाज एका कायदेविषयक फर्मच्या तळघरातून चालत होते. जयश्री उल्लाल यांच्या नेतृत्वाखालील ही कंपनी आज जागतिक स्तरावरील आघाडीची क्लाउड नेटवर्किंग कंपनी झाली आहे. जयश्री उल्लाल यांच्या नेतृत्वाची जागतिक पातळीवरही वेळोवेळी दखल घेण्यात आली आहे. २०१५ मध्ये त्यांना Ernst & Young ‘Entrepreneur of the Year’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१८ मध्ये Barron’s ‘World’s Best CEOs’च्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला. २०१९ मध्ये Fortune या मासिकाने त्यांना जगातील ‘Top 20 Business Persons’मध्ये स्थान दिले. आज जयश्री उल्लाल या केवळ भारतीय वंशाच्या नव्हे, तर जागतिक उद्योगविश्वातील सर्वाधिक प्रभावी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपैकी एक मानल्या जातात.

जयश्री उल्लाल यांची एकूण संपत्ती किती?

‘हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२५’ च्या अहवालानुसार, जयश्री उल्लाल यांनी वैयक्तिक संपत्तीच्या बाबतीत जागतिक स्तरावर भारतीय वंशाच्या अधिकाऱ्यांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांनी ‘गूगल’चे सुंदर पिचाई व ‘मायक्रोसॉफ्ट’चे सत्या नाडेला यांसारख्या प्रसिद्ध नेत्यांनाही श्रीमंतीच्या बाबतीत मागे टाकले आहे. जयश्री उल्लाल यांची एकूण संपत्ती ५.७ अब्ज डॉलर्स (सुमारे ४७,००० कोटी रुपये) इतकी असल्याचे सांगितले जाते. परंतु, हुरुन इंडियाच्या मते- त्यांची संपत्ती एकूण संपत्ती ५०,१७० कोटी रुपये आहे. या संपत्तीसह त्या जगातील श्रीमंतांच्या यादीत ७१३ व्या क्रमांकावर आहेत. २०२० पासून जयश्री यांच्या संपत्तीत ३४ दशलक्ष डॉलर्सची वाढ झाली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि सॉफ्टवेअर सर्व्हिसेस क्षेत्रात आलेली मोठी तेजी असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांना न जुमानणारे निकोलस मादुरो नेमके आहे तरी कोण?

अरिस्ता कंपनीत जयश्रींची किती भागीदारी?

‘अरिस्ता नेटवर्क्स’मध्ये जयश्री यांची तीन टक्के भागीदारी आहे. आज त्यांच्या मेहनतीमुळे ही कंपनी क्लाउड नेटवर्किंग क्षेत्रात अव्वल स्थानावर आहे. ‘फोर्ब्स’च्या मते, त्यांच्या नेतृत्वाखाली या सार्वजनिकरीत्या सूचीबद्ध असलेल्या कंपनीने २०२४ मध्ये सात अब्ज डॉलर्सचा महसूल नोंदवला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास २० टक्क्यांनी वाढला आहे. जयश्री सध्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहतात; पण त्यांच्या बोलण्यातील साधेपणा आजही जाणवतो. यशाचा कोणताही शॉर्टकट नाही; फक्त मेहनत, विश्वास आणि योग्य वेळी जोखीम घेणे गरजेचे असल्याचा संदेश त्या देतात. भारतीय वंशाच्या व्यक्ती जगातील टेक क्षेत्रात कशा प्रकारे इतिहास घडवून आणू शकतात, हे त्यांच्या कहाणीतून दिसून येते.