पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात एका हिंदू तरुणीने महिला सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती मिळवून इतिहास रचला आहे. पाकिस्तानातील २५ वर्षीय हिंदू महिलेची बलुचिस्तानमधील अशांत प्रदेशात सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे. बलुचिस्तान लोकसेवा आयोग (बीपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कशिश चौधरीची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी (ता. १२) कशिश आणि त्यांचे वडील गिरधारी लाल बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांना भेटण्यासाठी क्वेट्टाला गेले. कशिश चौधरी कोण आहेत? त्यांनी हा इतिहास कसा रचला? ते जाणून घेऊयात.

कशिश चौधरी कोण आहेत?

कशिश चौधरी यांचे वय केवळ २५ वर्षे असून, त्यांनी बलुचिस्तानमधील पाकिस्तानी हिंदू अल्पसंख्याक समुदायातील पहिल्या महिला सहायक आयुक्त होऊन इतिहास रचला आहे. त्या बलुचिस्तानातील चागई जिल्ह्यातील नोशकी या दुर्गम भागातील रहिवासी आहेत. बलुचिस्तान लोकसेवा आयोग (बीपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. सोमवारी (१२ मे) कशिश आणि त्यांचे वडील गिरधारी लाल यांनी क्वेटा येथे बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान त्यांनी महिलांच्या प्रगतीसाठी काम करणे, अल्पसंख्याक समुदायांना पाठिंबा देणे आणि प्रांताच्या सर्वांगीण विकासात मदत करण्याच्या त्यांच्या उद्दिष्टाविषयी सांगितले. त्यांचे वडील गिरधारी लाल यांनी पत्रकारांना सांगितले, “माझी मुलगी तिच्या कठोर परिश्रमामुळे सहायक आयुक्त झाली आहे आणि ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे.” कशिश या मध्यमवर्गीय कुटुंबातील असून. त्यांचे वडील व्यापारी म्हणून काम करतात. त्यांच्या वडिलांनी पुढे सांगितले की, त्यांच्या मुलीला नेहमीच शिक्षण पूर्ण करायचे होते आणि त्याद्वारे महिलांच्या जीवनात बदल घडवून आणायचा होता.

मुख्यमंत्री बुगती म्हणाले, “अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तीने समर्पण आणि प्रयत्नांद्वारे अशा पदावर पोहोचणे, हा संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे.” ते पुढे म्हणाले, “कशिश बलुचिस्तानसाठी अभिमानाचे प्रतीक आहे.” कशिश आपल्या यशाविषयी ‘साम टीव्ही’शी बोलताना म्हणाल्या की, त्यांनी दररोज किमान आठ तास अभ्यास केला आणि तिच्या तयारीला तीन वर्षे लागली. त्या म्हणाल्या, “शिस्त, कठोर परिश्रम व समाजात योगदान देण्याची इच्छा या सर्व गोष्टींनी मला या प्रवासाकरिता प्रेरणा दिली.”

पाकिस्तानमधील हिंदू तरुणींचे यश

पाकिस्तानमधील अनेक हिंदू महिलांमध्ये कशिश यांनी प्रेरणा निर्माण केली आहे. कशिश यांनी पुरुषप्रधान व्यवसायांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. गेल्या काही काळात अनेक हिंदू महिला सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक अडथळ्यांना मागे टाकत महत्त्वाच्या पदांवर पोहोचल्या आहेत. हिंदू समुदायातील अनेक महिलांनी अशा भूमिकांमध्ये पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एकेकाळी ही पदे महिलांच्या आवाक्याबाहेरची मानली जायची. जुलै २०२२ मध्ये मनीषा रोपेता या कराचीमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या हिंदू महिला ठरल्या. त्या अजूनही या सेवेत कार्यरत आहेत.

कराची येथील ३५ वर्षीय उपनिरीक्षक पुष्पा कुमारी कोहली म्हणाल्या, “हिंदू महिलांमध्ये यशस्वी होण्याची क्षमता आणि दृढनिश्चय आहे. त्यांनी सांगितले, “मी सिंध पोलिस सार्वजनिक सेवा परीक्षादेखील उत्तीर्ण झाले आहे. अनेक हिंदू तरुणी आपले शिक्षण पूर्ण करून काहीतरी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.” कोहली या अनुसूचित जातीतील आहेत. २०१९ मध्ये सिंधमधील शहदादकोट या गावी सुमन पवन बोदानी यांची दिवाणी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. मुख्य म्हणजे त्या याच गावातील रहिवासी आहेत. आता त्या पाकिस्तानच्या हैदराबादमध्ये दिवाणी न्यायाधीश म्हणून काम करीत आहेत.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सिंधमधील राजकारणी रमेश कुमार वंकवानी म्हणाले, कुटुंबाच्या पाठिंब्याने अनेक तरुण हिंदू मुलींनी उच्च शिक्षण घेण्याची दृढ इच्छाशक्ती दर्शवली आहे. “आमच्या तरुणी आमचा अभिमान आहेत. आमच्याकडे सिंधमध्ये अनेक तरुणी डॉक्टर, नागरी सेवक, पोलीस अधिकारी इत्यादी भूमिका बजावत आहेत,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी असेही म्हटले की, सिंधमध्ये तरुण हिंदू मुलींचे अपहरण आणि जबरदस्तीने त्यांचे धर्मांतर करणे यांसारख्या घटना सातत्याने घडत आल्या आहेत. परंतु, हिंदू समुदायाकरिता शिक्षण सुविधा सुधारल्याने, या समस्या सोडवण्यास मदत होऊ शकते. पाकिस्तानमध्ये हिंदू हा सर्वांत मोठा अल्पसंख्याक समुदाय आहे. देशात सुमारे ७५ लाख हिंदू आहेत. परंतु, पाकिस्तानातील हिंदू समुदायाचा अंदाज आहे की, ही संख्या ९० लाखांपेक्षा जास्त आहे. पाकिस्तानमधील बहुतेक हिंदू सिंध प्रांतात वास्तव्यास आहेत, असे अधिकृत आकडेवारीतून समोर आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बलुचिस्तान इतर कारणांनीही चर्चेत

बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळे होण्याची मागणी करीत आहे. त्याने पाकिस्तानी सैन्याविरुद्ध उघड बंड पुकारले आहे. बलूच लिबरेशन आर्मीकडून सातत्याने पाकिस्तानमध्ये हल्ले घडवून आणले जात आहेत. बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वांत मोठा प्रांत आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ ४६ टक्के आहे; परंतु लोकसंख्या केवळ सहा टक्के आहे. खनिज संपत्तीने समृद्ध असलेले हे क्षेत्र आर्थिक, राजकीय व सामाजिकदृष्ट्या सतत दुर्लक्षित राहिले आहे. लोकांच्या मनात त्याचाच तीव्र राग आहे. मुख्य म्हणजे, भारत-पाकिस्तान तणाव सुरू असतानादेखील बलुच लिबरेशन आर्मीकडून पाकिस्तानात हल्ले केले जात आहेत.