scorecardresearch

लोकसत्ता विश्लेषण: अमेरिकेत तुरुंगवास भोगणाऱ्या पाकिस्तानी शास्त्रज्ञासाठी चार जणांचे ओलीसनाट्य; कोण आहे आफिया सिद्दीकी?

आफिया सिद्दीकी लेडी अल कायदा म्हणून ओळखली जाते.

(फोटो सौजन्य- Reuters आणि फेसबूक)

अमेरिकेतील टेक्सासमध्ये चार जणांना ओलीस ठेवण्यात आलंय. या लोकांना टेक्सासमधील ज्यूंच्या धार्मिक स्थळावर (सिनेगॉग) ओलीस ठेवण्यात आले आहे. थोड्या वेळानंतर त्यापैकी एकाची सुटका करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, ओलीस ठेवलेल्या व्यक्तीने पाकिस्तानी शास्त्रज्ञ आफिया सिद्दीकीच्या सुटकेची मागणी केली आहे. आफियावर अफगाणिस्तानच्या ताब्यात असताना अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. आफिया सध्या टेक्सासच्या फेडरल कारागृहामध्ये बंद आहे. चला जाणून घेऊया कोण आहे ही आफिया सिद्दीकी, जिच्या सुटकेसाठी लोकांना ओलीस ठेवण्यात आलंय.

अमेरिकेच्या तुरुंगात असलेली आफिया सिद्दीकी ही पाकिस्तानी नागरिक आणि शास्त्रज्ञ आहे. आफिया सिद्दीकीला तीन मुले आहेत. अमेरिकन एजन्सीच्या म्हणण्यानुसार, आफिया ही भयंकर दहशतवादी असून एका अमेरिकन सैनिकाला मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली होती. न्यूयॉर्क शहराच्या फेडरल कोर्टाने तिला संशयित दहशतवादी कारवायांमध्ये कथित सहभागाबद्दल शिक्षा सुनावली आणि आफिया आता टेक्सासच्या फोर्ट वर्थ येथील कार्सवेल येथे ८६ वर्षांची शिक्षा भोगत आहे. तिला ‘लेडी अल कायदा’ म्हणूनही ओळखले जाते.

आफियाची पार्श्वभूमी…

आफिया सिद्दीकी, एक पाकिस्तानी नागरिक, मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची पदवीधर आहे आणि तिने ब्रॅंडिस विद्यापीठातून न्यूरोसायन्समध्ये पीएचडी केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या म्हणून काम करत असताना अल-किफा रेफ्युजी सेंटरशी संबंधित असल्याचा तिच्यावर आरोप आहे. अमेरिकेत असलेल्या या सेंटरला अमेरिकन एजन्सी अल कायदाच्या ऑपरेशनचे केंद्र मानतात. तसेच या केंद्राशी संबंधित काही लोकांवर केनियातील अमेरिकन दूतावासावर हल्ला केल्याचा आरोप होता.

आफिया चर्चेत कधी आली?

२००२ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतर एफबीआयने आफिया आणि तिचा पती अमजद खान यांची चौकशी केली तेव्हा आफिया सिद्दीकीचे नाव चर्चेत आले. एका वर्षानंतर, एफबीआयने तिला अल कायदा गटाच्या मोस्ट वॉन्टेड यादीत टाकले. अमेरिकन एजन्सीच्या हाती लागलेल्या खालिद शेख नावाच्या दहशतवाद्याने आफिया सिद्दीकीचे नाव घेतले होते.

अमेरिकेत बंदुकधाऱ्या व्यक्तीने चार जणांना ठेवले ओलीस; एकाची सुटका करत पाकिस्तानी शास्त्रज्ञाच्या सुटकेची केली मागणी

स्फोट घडवण्याची योजना…

अमेरिकन एजन्सीनुसार, २००८ मध्ये आफियाला एफबीआयने स्थानिक पोलिसांच्या मदतीने अफगाणिस्तानमधून अटक केली होती. तिच्या अटकेदरम्यान तिच्याजवळ दोन किलो सोडियम सायनाइड आणि काही पुस्तके सापडली होती. त्यावेळी ती न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन ब्रिज आणि एम्पायर स्टेट बिल्डिंगवर हल्ल्याची योजना आखत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

एफबीआय अधिकाऱ्याच्या हत्येचा आरोप…

२००८ मध्ये अटक केल्यानंतर आफियाला बगराम तुरुंगात नेण्यात आले, जिथे तिच्यावर एफबीआय अधिकाऱ्याची हत्या केल्याचा आरोप होता. त्यानंतर तिला अमेरिकेत पाठवण्यात आले. तिथे तिला २०१० मध्ये अमेरिकन कोर्टात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. याशिवाय त्याच्यावर पाकिस्तानचे माजी राजदूत हुसैन हक्कानी यांची हत्या आणि २०११ च्या मेमोगेट घोटाळ्यातील मुख्य आरोपी असल्याचाही आरोप आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Who is lady al qaeda afia siddiqui in us jail for her terrorist hostage four people in america hrc

ताज्या बातम्या