इराणचा अणुऊर्जा कार्यक्रम थांबवण्यासाठी अमेरिकेसह इतर काही देशांनी इराणवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र मोज्तबा खामेनी यांनी जागतिक पातळीवर लंडनसह इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी केल्या आहेत. इराणमध्ये कमावलेला पैसा कडक निर्बंध असतानाही मोज्तबा खामेनी यांनी इराणबाहेर नेला व गुंतवणूक केली. मोज्तबा यांच्या संपत्तीबाबत एक अहवाल प्रकाशित झाला आहे. त्यानंतर मोज्तबा खामेनी हे चर्चेत आहेत. अयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर इराणचे नेतृत्व करण्याची क्षमता मोज्तबा यांच्यात आहे असे मानले जाते, मोज्तबा खामेनी कोण आहेत ? ते जाणून घेऊ.
लंडनमधील ‘बिलिनिअर्स रो’ या जगातील सर्वात श्रीमंत लोक राहणाऱ्या भागांपैकी एक असलेल्या ठिकाणी मोज्तबा यांचा अलिशान बंगला आहे. लंडनमधील त्यांच्या या बंगल्यासमोर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात केलेले असते. मोज्तबा यांच्या जर्मनीतील फ्रँकफर्ट आणि संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) दुबई या दोन प्रमुख शहरांमध्येदेखील मालमत्ता आहेत. इराणमध्ये तेल निर्यातीतून कमावलेला पैसा विदेशात नेण्यासाठी शेल कंपन्यांचे एक जाळे तयार करण्यात आले होते. या सगळ्यांचे सूत्रधार मध्य पूर्व मधील प्रभावशाली व्यक्तींपैकी एक असलेले मोज्तबा खामेनी हे आहेत.
मोज्तबा यांची इराणबाहेर गुंतवणूक
५६ वर्षीय मोज्तबा खामेनी हे २०११ पासून खामेनी कुटुंबाचे आर्थिक व्यवहार सांभाळतात. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा वारसा पुढे चालवण्याची क्षमता मोज्तबा यांच्यात आहे, असे मानले जाते. मोज्तबा यांनी इराणच्या बाहेर मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली आहे. पर्शियन गल्फमध्ये जहाज व्यवसायात मोज्तबा यांची गुंतवणूक आहे. तसेच स्वीस बँकेत त्यांनी मोठ्या प्रमाणात धन ठेवले आहे. त्याशिवाय मोज्तबा यांची ब्रिटिश लक्झरी प्रोपर्टी १२६८ कोटी रूपयांपेक्षा (१३८ मिलियन डॉलर) अधिक असल्याचे म्हटले जाते.
ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार, त्यापैकी ३६२ कोटी रूपयांची स्थावर मालमत्ता त्यांनी लंडनमध्ये अत्यंत मोक्याच्या जागी घेतली आहे. तसेच दुबईतील ‘बेव्हेरली हिल्स ऑफ दुबई’ या परिसरातही त्यांची मालमत्ता आहे. ही मालमत्ता विकत घेण्यासाठी युके, स्वित्झर्लंड, लेचतेस्टेन आणि यूएई या देशांमधून विविध खात्यांमधून पैसे मोज्तबा यांनी मिळवले. हा पैसा मुख्यत : इराणमधून निर्यात होणाऱ्या तेलातून आलेला होता, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, ब्लूमबर्गच्या अहवालानुसार मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांवर मोज्तबा यांचे नाव नसून त्यांचे निकटवर्तीय इराणी उद्योगपती अली अन्सारी यांचे नाव आहे. अली अन्सारी यांच्यावर मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात युकेने निर्बंध लादले आहेत.
मोज्तबा खामेनी इराणचे नेतृत्व करणार ?
इराणमधील माध्यमांमध्ये सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची प्रतिमा एका धार्मिक नेत्यासारखी दाखवली जाते. इराणच्या जनतेसाठी ते काम करतात अशी त्यांची प्रतिमा बनवण्यात आली होती. परंतु, त्यांच्याजवळ असलेल्या संपत्तीने त्यांच्या या प्रतिमेला तडा गेला आहे. इराणमध्ये गरीबी व अराजकता माजल्यानंतर खामेनी यांच्या विरोधात जनआक्रोश उफाळून आला. मागील महिन्यांत झालेल्या आंदोलनात इराणमध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला.
मोज्तबा खामेनी हे इराणमधील सूत्र पडद्यामागून हलवतात अशी चर्चा कायम असते. त्यांना प्रकाशझोतात येणे फारसे आवडत नाही. परंतु, इराणमधील प्रशासनात त्यांचा हस्तक्षेप वाढत आहे. ८६ वर्षीय अयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर मोज्तबा हेच इराणचे नेतृत्व करतील अशी शक्यता इराणी नागरिक व्यक्त करतात. दरम्यान, इराणमध्ये सुरू असलेल्या अराजकतेमुळे इराणच्या नेतृत्वाची धुरा मोज्तबा यांच्याकडे लवकरच येऊ शकते, असे मानले जाते.
मोज्तबा खामेनी आणि अली अन्सारी यांचे आर्थिक व्यवहार
खामेनी परिवाराची संपत्ती इराणच्या बाहेर कशी विस्तारत गेली याबाबत एक अहवाल मागील वर्षभरात ब्लूमबर्गने तयार केला आहे. मोज्तबा खामेनी यांच्या जवळील व्यक्तींची तसेच इतर व्यक्तींची मुलाखत घेऊन अहवाल तयार करण्यात आला. त्यातून मोज्तबा खामेनी हे त्यांचे आर्थिक व्यवहार इतर कंपन्या, उद्योगांशी स्वत: करतात अशी माहिती समोर आली आहे.
“मोज्तबा खामेनी यांचे इराण व इराणबाहेरील अनेक कंपन्यांवर नियंत्रण आहे. मोज्तबा यांचे आर्थिक साम्राज्य पाहिले तर त्यात अली अन्सारी यांचे महत्व दिसून येते. मोज्तबा यांचे नियंत्रण असलेल्या अनेक मालमत्ता अली अन्सारी यांच्या नावावर आहेत. त्यामुळे अली अन्सारी हे इराणमधील महत्वाच्या व्यक्तींपैकी एक आहेत”, अशी माहिती फर्जिन नादिमी यांनी दिली. ते ‘द वॉशिंग्टन इन्स्टिट्यूट फॉर निअर इस्ट पॉलिसी’चे सिनिअर फेलो असून त्यांनी खामेनी कुटुंबाच्या अर्थकारणाचा अभ्यास केला आहे. दरम्यान, अली अन्सारी हे मोज्तबा यांच्याशी कोणतेही वैयक्तिक किंवा आर्थिक हितसंबंध नसल्याचे सांगतात.
अली अन्सारी कोण आहेत ?
अली अन्सारी (५७) हे इराणमधील महत्वाच्या उद्योगपतींपैकी एक आहेत. ब्रिटीश यंत्रणांनी अन्सारी यांना ‘भ्रष्ट इराणी बँकर आणि व्यावसायिक’ घोषित केले आहे. तसेच इराणमधील इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्सला मदत केल्यामुळे त्यांच्यावर युनायटेड किंग्डमकडून आर्थिक निर्बंधही लादण्यात आले आहेत. दरम्यान, अमेरिका व युरोपियन संघाने अन्सारी यांच्यावर कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत.
लक्झरी इराण मॉल कॉम्प्लेक्स, व्होलसेल मार्केट आणि नव्याने ताब्यात घेतलेली अयानदेह बँक यांमुळे अन्सारी हे इराणमधील महत्वाचे उद्योगपती म्हणून ओळखले जातात. १९७९ साली अन्सारी यांचे कुटुंब तेहरानमध्ये स्थलांतरित झाले होते. खामेनी कुटुंबाच्या निकटवर्तीय असलेल्या अधिकाऱ्यांशी अन्सारी यांच्या वडिलांचे चांगले संबंध होते. त्यानंतर अन्सारी हे स्वत:च अयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र मोज्तबा खामेनी यांच्या संपर्कात १९८० साली आले. त्यानंतर अन्सारी यांना महत्वाचे कंत्राट तसेच व्यवसायाचे परवाने मिळत गेले.

