JNU Student Leader Neha Bora: दिल्लीच्या रस्त्यांवर पोलिसांसोबत सुरू असलेला पाठलाग, जंतर-मंतरकडे कूच करताना झालेली धरपकड आणि अटकेत असतानाही इन्स्टाग्रामवरून तरुणांना आंदोलनाची दिशा दाखवणारी, सोशल मिडियावर ‘शेरनी’ (Sherni) म्हणून प्रसिद्ध झालेली २९ वर्षीय नेहा बोरा सध्या भारतातील विद्यार्थी राजकारणाचा सर्वात आक्रमक चेहरा ठरली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘सीजेपी’ (कॉक्रोच जनता पार्टी) आणि विरोधी पक्षांनी पुकारलेल्या आंदोलनात नेहाने ज्या प्रकारे पोलिसांच्या लाठ्याकाठ्यांचा सामना केला, त्यानंतर ती केवळ एक विद्यार्थी नेता राहिलेली नाही, तर ‘इंडिया’ आघाडीच्या (INDIA Bloc) सर्वोच्च नेत्यांबरोबर विशेषतः राहुल गांधींसोबत सर्वोच्च न्यायालयाकडे काढलेल्या मोर्चात खांद्याला खांदा लावून चालणारं एक महत्त्वाचं राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून पुढे आली आहे.

कँटोन्मेंट ते कम्युनिझम: एक अनपेक्षित वैचारिक वळण

उत्तराखंडमधील खटीमा येथे जन्मलेल्या नेहाची कौटुंबिक पार्श्वभूमी उजव्या विचारसरणीची आणि भाजप समर्थक आहे. तिचे वडील लष्करात अधिकारी असल्याने संपूर्ण बालपण देशातील विविध शहरांमधील लष्करी छावण्यांमध्ये (Cantonments) गेले. सततच्या बदल्यांमुळे कोणत्याही नव्या परिस्थितीत जुळवून घेण्याचा आणि तग धरून राहण्याचा लष्करी कणखरपणा तिच्यात लहानपणापासूनच भिनला. शालेय शिक्षण पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये पूर्ण केल्यानंतर, दिल्ली विद्यापीठाच्या ‘हिंदू कॉलेज’मधून तिने समाजशास्त्रात पदवी घेतली आणि पुढे ‘डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठातून’ पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. याच काळात घरात बंडखोरी करत तिने डाव्या विचारसरणीची वाट धरली. ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’ (AISA) या डाव्या विद्यार्थी संघटनेची राष्ट्रीय अध्यक्ष होण्यापर्यंतचा तिचा प्रवास हा वैचारिक घुसळणीचा आहे.

Neha Bora

‘जेएनयू’ची रंगभूमी आणि वकृत्वाची धार

सध्या नेहा ‘जेएनयू’च्या (JNU) ‘स्कूल ऑफ आर्ट्स अँड ॲस्थेटिक्स’मध्ये ‘नाट्य आणि सादरीकरण कला’ (Theatre and Performance Studies) या विषयात पीएचडी करत आहे. राजकारणात येण्यापूर्वी ती रंगभूमीवर (Theatre) अत्यंत सक्रिय होती. तिच्या भाषणातील अचूक शब्दफेक, खणखणीत आवाज, आवाजातील चढ-उतार आणि श्रोत्यांना खिळवून ठेवणारी नाट्यमय शैली ही याच रंगभूमीची देणगी आहे. “थिएटर करणाऱ्यांना राजकारण आयुष्यात रुजवणं सोपं जातं,” असे ती मानत असली, तरी तिच्या याच नाट्यमय आणि थेट भिडण्याच्या शैलीमुळे ती तरुणांच्या गळ्यातील ताईत ठरली आहे.

आंदोलनांची भट्टी: सीएए ते जंतर-मंतरवरील उपोषण

तिच्या सक्रिय राजकीय संघर्षाची सुरुवात २०१९ च्या ‘सीएए’ (CAA) विरोधी आंदोलनातून झाली. त्यानंतर २०२३ च्या शेतकरी आंदोलनातही ती आघाडीवर होती. मात्र, तिला राष्ट्रीय पातळीवर मोठी ओळख मिळाली ती परीक्षांमधील पेपरफुटी आणि बेरोजगारीच्या विरोधात जंतर-मंतरवर सोनम वांगचुक यांच्याबरोबर केलेल्या २३ दिवसांच्या प्रदीर्घ उपोषणामुळे. सोनम वांगचुक हे सरकारच्या ‘नव्या शैक्षणिक धोरणाचे’ (NEP) समर्थक आहेत, तर डाव्या विचारांची नेहा या धोरणाला प्रखर विरोध करते. असे वैचारिक मतभेद असतानाही, विद्यार्थ्यांच्या व्यापक हितासाठी एकत्र येण्याची राजकीय प्रगल्भता तिने या उपोषणात दाखवली.

‘सीजेपी’चे आंदोलन आणि ‘इंडिया’ आघाडीची साथ

अलीकडेच दिल्लीत ‘सीजेपी’ (Cockroach Janta Party) आणि ‘जेन-झी’ने (Gen-Z) निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवरून निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी करत मोठे आंदोलन उभे केले. या नव्या आणि अननुभवी कार्यकर्त्यांच्या पाठीशी नेहाने आपली ‘आयसा’ ही संघटना आणि स्वतःचा अनुभव पूर्ण ताकदीने उभा केला. पोलिसांनी हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी धरपकड सुरू केली, तेव्हा नेहाने दिल्ली पोलिसांशी दिलेली झुंज आणि तिचा ‘कॅट-अँड-माऊस चेस’ (Cat-and-mouse chase) सोशल मीडियावर व्हायरल झाला. या धडक कृतीमुळे ती थेट राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आली. नुकत्याच झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि ‘इंडिया’ आघाडीच्या इतर नेत्यांच्या मोर्चात ती दिसली. डाव्या विद्यार्थी चळवळीचा चेहरा आता देशातील मुख्य प्रवाहातील विरोधी पक्षांच्या (Mainstream Opposition) अजेंड्याशी जोडला जात असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत.

Neha Bora

डाव्यांचे उतरंडीला लागलेले राजकारण आणि नेहाचे महत्त्व

एकेकाळी देशाच्या राजकारणात कामगार, शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या डाव्या पक्षांचा मोठा दबदबा होता. पश्चिम बंगाल, त्रिपुरा ते केरळपर्यंत विस्तारलेला त्यांचा प्रभाव आजच्या प्रखर राष्ट्रवादाच्या आणि बदलत्या राजकीय समीकरणांच्या रेट्यात पार उतरंडीला लागला आहे. संसदीय राजकारणात त्यांची मोठी पीछेहाट झाली असून, तरुण पिढीला आपल्या विचारसरणीशी जोडून घेण्यात त्यांना सातत्याने अपयश येत आहे. पारंपरिक कामगार किंवा शेतकरी नेत्यांच्या साच्याबाहेर पडून विचार करण्याची वेळ डाव्यांवर आली आहे. नेमक्या याच राजकीय पोकळीत नेहा बोराचे महत्त्व अधोरेखित होते. जेन-झी (Gen-Z) पिढीची भाषा बोलणारा, सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावी वापर करणारा आणि प्रस्थापितांना थेट भिडणारा नेहासारखा तरुण व आक्रमक चेहरा डाव्या चळवळीसाठी केवळ संजीवनीच नाही, तर त्यांच्या भविष्यातील राजकारणाचा नवा आधार ठरू शकतो, असे मत राजकीय तज्ज्ञ व्यक्त करतात.

भविष्यातील राजकारणाची दिशा

उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्यावरील ‘युएपीए’ (UAPA) कारवाईला विरोध करण्यापासून ते बुलडोझर राजकारणावर सडकून टीका करण्यापर्यंत नेहाची वैचारिक बैठक अत्यंत स्पष्ट आहे. एकेकाळी देशभरात दबदबा असलेल्या, पण आता राजकीय पटलावर क्षीण होत चाललेल्या डाव्या राजकारणाला नेहा बोराच्या रूपाने एक नवा, तरुण, उच्चशिक्षित आणि ‘शेरनी’सारखा आक्रमक चेहरा मिळाला आहे. केवळ रस्त्यावर घोषणाबाजी करण्यापुरती ती मर्यादित नाही, तर वेळ आल्यास राजकीय निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तिची तयारी आहे. त्यामुळे, आगामी काळात भारतीय राजकारणात आणि विशेषतः प्रस्थापितांविरुद्धच्या लढ्यात नेहा बोरा हे नाव निश्चितच एक मोठे वादळ निर्माण करण्याची क्षमता बाळगून आहे