Neha Singh India AI Impact Summit Controversy : राजधानी दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ या कार्यक्रमाने सगळ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. बंगळुरूमधील कंपनीचे गॅझेट्स चोरी झाल्यामुळे हा कार्यक्रम पहिल्या दिवशीच चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्यातच नोएडातील गलगोटियास विद्यापीठाने चिनी बनावटीचा रोबोटिक डॉग स्वतःच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न केल्याने समाजमाध्यमांवर वादंग उठला आहे. या प्रकारामुळे एआय समिटची बदनामी होत असल्याने आयोजकांनी गलगोटियास विद्यापीठाच्या प्रतिनिधींना त्यांचे मंडप रिकामे करण्याचा आदेश दिला आहे. या संपूर्ण वादात प्राध्यापिका नेहा सिंह यांचे नाव चर्चेत आले आहे. एआय समिटमध्ये झालेल्या गोंधळासाठी गलगोटियास विद्यापीठानेही त्यांनाच जबाबदार धरले आहे. या पार्श्वभूमीवर कोण आहेत नेहा सिंह? त्या रोबोटिक डॉगमुळे वादात कशा सापडल्या? त्याविषयीचा हा आढावा…

कोण आहेत प्राध्यापक नेहा सिंह?

नेहा सिंह या स्वतःचा परिचय गलगोटियास विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बिझनेस विभागातील ‘हेड ऑफ डिपार्टमेंट – कम्युनिकेशन्स’ असा करून देतात. भाषेवरील प्रभुत्व आणि सार्वजनिक मंचावरील उपस्थिती या कौशल्याच्या जोरावर इतरांना प्रेरणा देण्याची क्षमता आपल्याकडे असल्याचे त्यांनी लिंक्डइन प्रोफाईलमध्ये नमूद केले आहे. नेहा सिंह यांनी २००६ मध्ये देवी अहिल्या विश्वविद्यालयामधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी वाणिज्य शाखेची (बी.कॉमची) पदवी घेतली. २०२३ मध्ये नेहा यांनी गलगोटियास विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कामाला सुरुवात केली. त्यापूर्वी ग्रेटर नोएडातील शारदा विद्यापीठात त्यांनी सहाय्यक प्राध्यापक या पदावर काम केले. नेहा सिंह यांचे नाव ‘गीतम’ संस्थेशीही जोडले गेले आहे.

नेहा सिंह वादात कशामुळे सापडल्या?

दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ या कार्यक्रमात गलगोटियास विद्यापीठातील प्रतिनिधींनी काही वस्तूंच्या सादरीकरणासाठी मंडप लावला होता. यादरम्यान एका रोबोटिक डॉगचे प्रात्यक्षिक दाखवताना नेहा सिंह दिसून आल्या. सदरील रोबोटिक डॉग हा गलगोटियास विद्यापीठाच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये विकसित केल्याचा दावा नेहा यांनी केला. त्यांचा हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानेही आपल्या अधिकृत अकाउंटवरून या रोबोटचे व्हिडीओ शेअर केले. त्यानंतरच्या काही तासांतच नेटकऱ्यांनी या रोबोटिक डॉगची पोलखोल करण्यास सुरुवात केली. सदरील रोबो हा चिनी बनावटीचा असून तो सुमारे १,६०० डॉलर्सना (साधारण २-३ लाख रुपये) बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे अनेकांनी सांगितले.

आणखी वाचा : भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडणार? शाहपूर कांडी धरणामुळे पाकिस्तानची चिंता का वाढली?

गलगोटियास विद्यापीठाच्या प्रतिनिधींची हकालपट्टी

नेहा सिंह यांनी सादर केलेल्या रोबोटिक डॉगवरून समाजमाध्यमांवर वादंग उठल्यानंतर आयोजकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या प्रकारामुळे एआय समिटची बदनामी होत असल्याचे सांगून गलगोटियास विद्यापीठाच्या प्रतिनिधींना त्यांचे मंडप रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनीही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली. आम्हाला या एआय समिटमध्ये केवळ खऱ्या आणि प्रत्यक्ष कामांचेच प्रदर्शन हवे आहे, जनतेची दिशाभूल करणाऱ्या वादग्रस्त संस्थांना आम्ही येथे अजिबात थारा देणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

वादानंतर नेहा सिंह यांची प्रतिक्रिया काय?

रोबो डॉगवरून निर्माण झालेल्या वादानंतर नेहा सिंह यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली. घाईघाईत आणि उत्साहाच्या भरात माझ्याकडून काही गोष्टी सांगण्याच्या राहून गेल्याने हा गोंधळ निर्माण झाला. एआय समिटमध्ये सादर करण्यात आलेला रोबोटिक डॉग गलगोटियास विद्यापीठाने स्वत: तयार केल्याचा दावा मी कुठेही केलेला नाही. मी सर्वांना हेच सांगितले होते की- सदरील डॉग आम्ही विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आणला आहे, जेणेकरून ते भविष्यात स्वत:हून यापेक्षाही काहीतरी चांगले उपकरण तयार करतील. या रोबो डॉगवर त्याच्या मूळ कंपनीचे नाव स्पष्टपणे दिसत होते, मग आम्ही तो स्वत: विकसित केल्याचा दावा कसा करू शकतो? काहींनी माझ्या सादरीकरणाचा चुकीचा अर्थ काढून जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांनी हा मुद्दा उपस्थित केला नसता तरीही आम्ही त्याची स्वत:हून माहिती देणार होतो, असे नेहा सिंह यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : मुस्लीम आरक्षणाचा विषय कायमचा निकालात? राज्य सरकारने २०१४ चे धोरण का गुंडाळले? कारण काय?

गलगोटियास विद्यापीठाची प्रतिक्रिया काय?

रोबोडॉग वादामुळे झालेल्या नाचक्कीनंतर गलगोटियास विद्यापीठाने आक्रमक पवित्रा घेत या संपूर्ण गोंधळाचे खापर नेहा सिंह यांच्यावरच फोडले आहे. आमच्या प्रतिनिधींकडे (नेहा सिंह यांना उद्देशून) रोबोडॉगबद्दल अपूर्ण माहिती होती आणि त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्याची कोणतीही अधिकृत परवानगी नव्हती. एआय समिटमध्ये निर्माण झालेल्या गोंधळाबद्दल आम्ही मनापासून माफी मागतो. कॅमेऱ्यासमोर जाण्याच्या उत्साहापोटी नेहा सिंह यांनी जनतेला चुकीची आणि वस्तुस्थितीला धरून नसलेली माहिती दिली. रोबोडॉगला स्वत:च्या नावावर खपवून जनतेची दिशाभूल करण्याचा आमचा मुळीच उद्देश नव्हता, असे गलगोटियास विद्यापीठाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. आयोजकांच्या भावनांचा आदर करून विद्यापीठाने आपले प्रदर्शन केंद्र रिकामे केले आहे. जनतेची दिशाभूल करणारी माहिती दिल्यामुळे केंद्र सरकारने विद्यापीठाविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.