-संदीप कदम
भारतीय बाॅक्सिंगपटू निकहत झरीनने महिला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत आजवर सर्वाधिक सुवर्णपदके भारताची अनुभवी बॉक्सिंगपटू मेरी कोमने जिंकली आहेत. मेरीनंतर निकहतने भारतीय बॉक्सिंगच्या नवीन सुवर्णाध्यायाला सुरुवात केली आहे. तेलंगणाच्या निकहतचा जागतिक बॉक्सिंग पटलापर्यंतचा प्रवास कसा राहिला. मेरी आणि तिच्या ऑलिम्पिक निवडचाचणीचे प्रकरण काय होते, याचा आढावा…

महिलांची जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेतील आजवरची भारताची कामगिरी कशी आहे ?
मेरी कोम भारतासाठी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सर्वात यशस्वी बॉक्सिंगपटू राहिली आहे. मेरीने (२००२, २००५, २००६, २००८, २०१०, २०१८ ) एकूण सहा सुवर्णपदके (एक रौप्य आणि एक कांस्यपदक) आहेत. यानंतर सरिता देवी (२००६), जेनी आरएल (२००६) आणी लेखा केसी (२००६) यांनी सुवर्णकामगिरी केली आहे. निकहत ही सुवर्णपदक मिळवणारी केवळ पाचवीच बॉक्सिंगपटू आहे. २०१८ नंतर हे भारताचे पहिले सुवर्णपदक आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेत भारताने तीन पदके मिळवली. त्यामुळे भारताची स्पर्धेतील एकूण पदकांची संख्या ही ३९ वर पोहोचली आहे. यामध्ये १० सुवर्ण, ८ रौप्य आणि २१ कांस्यपदकांचा समावेश आहे. एकूण पदकसंख्येच्या बाबतीत भारत रशिया (६०) आणि चीननंतर (५०) तिसऱ्या स्थानी आहे. जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी २००६ मध्ये झाली होती. या स्पर्धेत भारताने एकूण आठ पदके जिंकली होती.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तेलंगणाच्या निकहतचा बॉक्सिंगमधील प्रवास कसा आहे ?
तेलंगणाच्या निझामाबाद जिल्ह्यात जन्मलेल्या निकहतने वडिलांच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सिंगचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. विशाखापट्टणम येथे तिने कसून सराव केला. २०११मध्ये तुर्कस्थानात झालेल्या कनिष्ठ आणि युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकत आपली छाप पाडली. २०११मध्येच एका आंतरविद्यापीठ सामन्यादरम्यान तिच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे जवळपास तिला वर्षभर बॉक्सिंगपासून दूर रहावे लागले. यानंतरही अनेक अडथळ्यांचा सामना करत तिने आपला प्रवास सुरु ठेवला. २०१४मध्ये युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने रौप्यपदक पटकावले. २०१५ च्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. २०१९ आणि २०२२ मध्ये तिने स्ट्रँडजा स्मृती बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण आणि थायलंड खुल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली.

मेरी कोम आणि निकहतच्या ऑलिम्पिक निवडचाचणीचे प्रकरण काय होते ?
२०१९ मध्ये निकहत समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरत होती. मात्र ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी सहा वेळा जागतिक विजेतेपद मिळवणाऱ्या मेरी कोमविरुद्ध तिला सामना खेळायचा होता. याकरिता तिने तत्कालीन क्रीडामंत्री किरेन रिजिजू  यांना पत्र लिहिले. यामुळे लोक तिची खिल्ली उडवू लागले. या लढतीत निकहतला १-९ असे पराभूत व्हावे लागले. मेरीने सामना संपल्यानंतर तिला हस्तांदोलन करण्यासही नकार दिला. यानंतर निकहतने सरावावर लक्ष केंद्रीत केले आणि येणाऱ्या काळात तिने चांगली कामगिरी करत टीकाकारांना चोख प्रत्त्युत्तरही दिले.

मेरी कोमनंतर कोणत्या महिला बॉक्सिंगपटूंकडून भारताला अपेक्षा आहेत ?
मेरीनंतर भारताला जागतिक स्तरावर पदक मिळवून देण्याची क्षमता असलेल्या तीन बॉक्सिंगपटू आहेत. तसेच मेरीचा वारसा पुढे चालवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असेल. लव्हलिना बोर्गोहेनने गेल्या वर्षी झालेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला ६९ किलो वजनीगटात कांस्यपदक मिळवून दिले.  यासह २०१८ आणि २०१९ मध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तसेच, २०१७ आणि २०२१ मध्ये झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही तिने कांस्यपदक मिळवले. पूजा राणीने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ७५ किलो वजनी गटात सहभाग नोंदवला होता. मात्र, पदक मिळवण्यात तिला अपयश आले. तिने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत (दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक) चार पदके मिळवली आहेत. तसेच, इंचॉन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने भारताला कांस्यपदक मिळवून दिले. सिमरनजीत कौरने ६० किलो वजनीगटात टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला होता. सिमरनने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत (२०१८) कांस्यपदक मिळवले. तसेच, २०१९ आणि २०२१ च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिने अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केली.

भारतीय महिला बाॅक्सिंगपटूंनी गेल्या काही वर्षांत आपला स्तर उंचावला, त्याचे प्रमुख कारण कोणते ?
 जवळपास दोन दशके मेरीने आपल्या खांद्यावर भारतीय महिला बॉक्सिंगचा भार उचलला. तिच्यानंतर दुसऱ्या फळीतील अनेक बॉक्सिंगपटू जागतिक स्तरावर भारताला पदके मिळवून देत आहेत. भारताला खऱ्या अर्थाने महिला बॉक्सिंगच्या नकाशावर स्थान मिळवून दिले ते मेरीने. ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंगचा समावेश नसतानाही मेरीने देशासाठी चांगली कामगिरी सुरू ठेवली. तिच्याकडून प्रेरणा घेत अनेक युवा बॉक्सिंगपटू पुढे आले. २०१२मध्ये मेरीने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकत सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर भारतामध्ये बॉक्सिंगसाठी असलेल्या पायाभूत सुविधांवर अधिक भर देण्यात आला. खेळाडूंना पूरक अनेक योजना सरकारकडून राबवण्यात आल्या. त्याचा फायदाही झाला. त्यांना प्रशिक्षक, चांगल्या दर्जाचा सराव, सहकारी कर्मचारी याच्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन पदके मिळवू लागल्या.