Seema Pahuja CBI Officer investigating Disha Salian Case : राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या तपासाची सूत्रे अखेर सीबीआय अधिकारी सीमा पाहुजा यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यामुळे सहा वर्षापूर्वीचे हे प्रकरण देशातील गाजलेल्या गुन्हेगारी प्रकरणांचा तपास करणाऱ्या एका अनुभवी महिला अधिकाऱ्याच्या हाती आले. सीबीआयमध्ये वरिष्ठ पदावर असलेल्या सीमा यांनी यापूर्वी सीबीआयकडील अनेक प्रकरणांच्या तपासांत मोलाची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे दिशा सालियन प्रकरणात त्या नेमके कोणते धागेदोरे शोधून काढतात याचीच उत्सुकता अनेकांना लागून आहे. या पार्श्वभूमीवर सीमा पाहुजा यांच्या सीबीआयमधील कारकीर्दीचा हा सविस्तर आढावा…
कोण आहेत सीमा आहुजा?
सीमा पाहुजा यांनी अत्यंत कमी कालावधीतच सीबीआयच्या महत्वाच्या तपास अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्यांच्याकडील आलेली गुन्हेगारीची बहुतांश प्रकरणे संपूर्ण देशभरात गाजलेली होती. या प्रकरणांमध्ये परस्परविरोधी दाव्यांसह पुरावे आणि न्यायवैद्यक अहवाल यांसारखी प्रचंड आव्हाने होती. २०२० मध्ये उत्तर प्रदेशातील बहुचर्चित हाथरस प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआय पथकात सीमा पाहुजा यांचा समावेश होता. एका दलित तरुणीवरील कथित लैंगिक अत्याचार आणि तिच्या हत्येच्या आरोपानंतर हे प्रकरण देशभरात प्रचंड गाजले होते. त्यावेळी स्थानिक पोलिसांचा संशयास्पद तपास आणि पीडितेच्या मृतदेहावर घाईघाईने करण्यात आलेले अंत्यसंस्कार यावरून अनेकांमध्ये तीव्र संताप होता.
आतापर्यंत कोणकोणत्या प्रकरणांचा केला तपास?
ऑगस्ट २०२४ मध्ये कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्याल आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या सीबीआय तपास पथकातही सीमा पाहुजा यांचा समावेश होता. या तपासात गुन्ह्याचे प्रत्यक्ष ठिकाण, न्यायवैद्यक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि संपूर्ण घटनेशी संबंधित गुंतागुंतीच्या परिस्थितीची सखोल तपासणी करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. सीमा पाहुजा यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतल्यास उत्तर प्रदेशातील उन्नाव प्रकरण आणि हिमाचल प्रदेशातील बहुचर्चित ‘गुडिया’ हत्या प्रकरणासारख्या अनेक अत्यंत संवेदनशील प्रकरणांच्या तपासात त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावलेली आहे. एक धडाकेबाज आणि निष्पक्ष तपास अधिकारी म्हणून सीमा यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेत त्यांना विविध स्तरांवर गौरवलेही गेले आहे.
दिशा सालियन प्रकरण नेमके काय आहे?
दिवंगत अभिनेता सुशांतसिह राजपूत याची मॅनेजर असलेल्या दिशा सालियनचा मृत्यू अपघाती झाल्याचे यापूर्वीच्या तपासांत नमूद आहे. ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, दिशाचे वडील सतीश सालियन यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूमागील संशयास्पद परिस्थितीवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले आणि नव्याने चौकशी करण्याची मागणी लावून धरली. हे प्रकरण थेट न्यायालयापर्यंत पोहोचले असून कुटुंबाचे गंभीर आरोप असतानाही याप्रकरणी एफआयआर का नोंदवला गेला नाही, असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला. तसेच नव्याने तपासाची मागणी करणाऱ्या त्यांच्या याचिकेवर सुनावणीही घेतली.
न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर एफआयआर
उच्च न्यायालयाच्या या हस्तक्षेपानंतर अखेर तपास यंत्रणेने सतीश सालियन यांचा सविस्तर जबाब नोंदवून रीतसर एफआयआर दाखल केला. या ताज्या तपासात सीबीआय दिशाच्या मृत्यूशी संबंधित सर्व बाजूंची कसून चौकशी करण्याची शक्यता आहे. यामध्ये पूर्वी झालेल्या तपासाचा फेरआढावा घेतला जाईल, तसेच ८ जून २०२० च्या संध्याकाळी तिचा होणारा पती रोहन रॉय याच्या घरी झालेल्या पार्टीत उपस्थित असलेल्या व्यक्तींची नव्याने चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे, न्यायवैद्यक अहवाल आणि तांत्रिक पुराव्यांचीही तपास अधिकाऱ्यांकडून केला जाणार आहे.
सीबीआयसमोर कोणकोणती आव्हाने?
दिशा सालियन प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर सीबीआय अधिकारी सीमा पाहुजा आणि त्यांच्या पथकासमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे तब्बल सहा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनाक्रमाची नव्याने मांडणी करण्याचे असेल. तपास अधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांची मूळ कागदपत्रे, शवविच्छेदन व न्यायवैद्यक अहवाल, साक्षीदारांचे जुने जबाब आणि उपलब्ध डिजिटल पुराव्यांची नव्याने छाननी करावी लागणार आहे. तसेच, दिशाच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेले संशय आणि कायदेशीर प्रक्रियेदरम्यान समोर आलेले मुद्दे स्वतंत्र पुराव्यांद्वारे सिद्ध होऊ शकतात का, याचीही पडताळणी सीबायला करावी लागेल.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी जोडले नाव
दिशा सालियनच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचाही संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यामुळे ही दोन्ही प्रकरणे एकमेकांशी जोडली गेली असल्याची भावना जनमानसात निर्माण झाली. त्यातूनच अनेक तर्कवितर्कांना उधाण आले; पण केवळ आरोप आणि तर्क हे कायदेशीर पुरावे ठरू शकत नाहीत. त्यामुळे अशा कोणत्याही दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे हे सीबीआयला केवळ न्यायालयाला मान्य असलेल्या पुराव्यांच्या आधारेच सिद्ध करावे लागेल. त्यामुळे ही नवीन चौकशी प्रक्रिया दिशाच्या मृत्यूसंदर्भातील कोणत्याही वस्तुनिष्ठ पुराव्यांवर आधारितच करावी लागणार आहे. सीमा पाहुजा यांच्यासमोर गेल्या सहा वर्षांतील तपास अहवाल, संशय, आरोप-प्रत्यारोप आणि सार्वजनिक चर्चांच्या गदारोळातून ठोस कायदेशीर पुरावे जमा करण्याचे मोठे आव्हान असेल. त्यामुळे या प्रकरणात ते आपल्या अनुभवाचा फायदा घेऊन कोणते धागेदोरे शोधून काढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
