Sheema Kermani pakistani dancer detained viral video: गेल्या काही दिवसांपूर्वी कराचीच्या रस्त्यावरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. कराची पोलिसांच्या बुरखाधारी लेडी कॉन्स्टेबल पांढर्या साडीतील एका ७५ वर्षीय महिलेला ताब्यात घेत होत्या. विशेष म्हणजे या महिलेच्या कपाळावर ठसठशीत लाल टिकली होती आणि केसात सफेद फूल. त्यामुळे त्या महिलेकडे लक्ष वेधलं जाण साहजिकच होतं. पाकिस्तानमधील कराचीसारख्या शहरातील रस्त्यावर अशी महिला दिसणं दुर्मीळच. त्यामुळे हा व्हिडिओ अधिक वेगाने व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल होताच जगभरातील अनेकांना या महिलेची लगेचच ओळख पटली. ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून पसूरी या प्रसिद्ध गाण्याच्या व्हिडिओत झळकलेल्या शीमा केर्मानी (सीमा केर्मानी) होत्या. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या नावाची चांगलीच चर्चा रंगली.
पोलिसांनी त्यांना का ताब्यात घेतले?
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार नृत्यांगना आणि सामाजिक कार्यकर्त्या शीमा केर्मानी यांना औरत मार्च कार्यक्रमासाठी परवानगी मागताना पोलिसांनी काही काळ ताब्यात घेतले होते. कराचीमध्ये दरवर्षी होणाऱ्या औरत मार्च कार्यक्रमासाठी ना हरकत प्रमाणपत्राची (NOC) मागणी करण्यासाठी महिलांचा गट नियोजित पत्रकार परिषदेसाठी जमला होता, त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सिंधचे गृहमंत्री झियाउल हसन लंजार यांनी त्यांच्या सुटकेचे आदेश दिले. या घटनेमुळे केर्मानी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. ‘पसूरी’मधील त्यांच्या नृत्यामुळे त्या जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या होत्या. परंतु, इतकीच त्यांची ओळख नाही.
औरत मार्च काय आहे?
पाकिस्तानमध्ये यावर्षी ‘औरत मार्च’ १० मे २०२६ (रविवार) रोजी आयोजित करण्यात आला होता. दरवर्षी हा मार्च ‘आंतरराष्ट्रीय महिला दिनी’ म्हणजेच ८ मार्चला आयोजित केला जातो; परंतु यावर्षी (२०२६) मार्च महिन्यामध्ये मुस्लिमांचा पवित्र ‘रमजान’ महिना आल्यामुळे हा निर्णय बदलण्यात आला. रमजानच्या काळात महिलांवर घरगुती जबाबदाऱ्यांचा ताण जास्त असतो. त्यामुळे कष्टकरी आणि मध्यमवर्गीय महिलांना आंदोलनात सहभागी होता यावे, म्हणून आयोजकांनी हा मार्च (मोर्चा) ८ मार्चऐवजी ‘मदर्स डे’चे (Mother’s Day) औचित्य साधून १० मे रोजी आयोजित केला होता. कराचीतील ‘बीच व्ह्यू पार्क’ (Sea View) येथे प्रशासनाने लादलेल्या तब्बल २८ अटी आणि कडक निर्बंधांनंतरही हा मोर्चा यशस्वीरित्या पार पडला.
पुरुषी मानसिकतेला आव्हान देणारी धाडसी सामाजिक-राजकीय चळवळ
‘औरत मार्च’ (Aurat March) ही पाकिस्तानात दरवर्षी आयोजित केली जाणारी एक अत्यंत महत्त्वाची आणि धाडसी सामाजिक-राजकीय चळवळ आहे. प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे (८ मार्च) औचित्य साधून पाकिस्तानातील विविध मोठ्या शहरांमध्ये (कराची, लाहोर, इस्लामाबाद, मुलतान) या मोर्चाचे आयोजन केले जाते. या आंदोलनाची सुरुवात २०१८ साली कराचीतील ‘हम औरते’ (Hum Aurtein) या महिलांच्या एका स्वतंत्र समूहाने केली. पहिल्या वर्षी याला मर्यादित प्रतिसाद मिळाला, परंतु नंतरच्या काळात यात केवळ महिलाच नव्हे, तर तृतीयपंथी (Transgender) समुदाय, लहान मुले आणि पुरुषही मोठ्या संख्येने सहभागी होऊ लागले. शीमा केर्मानी या पहिल्यापासून या मोर्चाच्या मुख्य आयोजकांपैकी एक आहेत. ‘औरत मार्च’चा हेतू केवळ रस्त्यावर उतरून आंदोलन करणे नाही, तर पाकिस्तानी समाजातील पुरुषसत्ताक पद्धतीला (Patriarchy) आव्हान देणे हा आहे. पाकिस्तानातील अतिशय पुराणमतवादी आणि धार्मिक गटांकडून ‘औरत मार्च’ला तीव्र विरोध केला जातो. या आंदोलनाला ‘पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण’ असे म्हणत ‘अधार्मिक’ ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा या मोर्चावर बंदी घालण्यासाठी न्यायालयात याचिकाही दाखल केल्या गेल्या आहेत.
या औरत मार्चच्या सर्वात प्रसिद्ध आणि वादग्रस्त घोषणा
- मेरा जिस्म, मेरी मर्जी
- खुद खाना गरम करलो

शीमा केर्मानी कोण आहेत?
पाकिस्तानी गायक अली सेठी यांनी कोक स्टुडिओ पाकिस्तानबरोबर ‘पसूरी’ हे गाणे रिलीज केले होते. हे गाणं केवळ पाकिस्तानातच नाही तर जगभर प्रसिद्ध झाले. त्याचे संगीत, बोल आणि दृश्य सादरीकरणाने जगभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधले. या मधुर गाण्याबरोबरच सुरुवातीच्या दृश्यांमध्ये दिसणाऱ्या पारंपरिक नृत्यप्रदर्शनाकडेही प्रेक्षकांचे लक्ष गेले. यात नृत्यांगना शीमा केर्मानी होत्या. केर्मानी या शास्त्रीय नृत्यप्रकारांना होणाऱ्या पुराणमतवादी विरोधानंतरही पाकिस्तानात भरतनाट्यमला प्रोत्साहन देण्यासाठी ओळखल्या जातात.

पसूरी हे गाणे त्यातील पंजाबी बोल आणि दक्षिण आशियाई सांस्कृतिक घटकांमुळे भारतातही मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले. या व्हिडिओतील शीमा केर्मानी यांच्या छोट्याशा सादरीकरणाने त्यांना पुन्हा एकदा जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली आणि त्यांची अपरिचित कारकीर्द तरुण प्रेक्षकांपर्यंत पोहोचली.
शीमा केर्मानी यांचे भारताशी असलेले नाते?
शीमा केर्मानी यांचा जन्म १६ जानेवारी १९५१ रोजी पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील रावळपिंडी येथे झाला. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी शास्त्रीय नृत्यांगना, रंगभूमी कलाकार आणि महिला हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्यांचे वडील पाकिस्तानी लष्करात कार्यरत होते आणि पुढे कराची इलेक्ट्रिक सप्लाय कॉर्पोरेशनचे अध्यक्ष झाले. त्यांच्या वडिलांचे मूळ भारतातील लखनऊ आणि इराणमधील केरमानशी जोडलेले आहे, तर त्यांच्या आईचे कुटुंब मूळचे दक्खनचे (हैदराबाद) होते. शालेय जीवनात भारतभेटीदरम्यान केर्मानी यांना भारतीय शास्त्रीय नृत्याची आवड निर्माण झाल्याचे सांगितले जाते. त्यांनी भरतनाट्यमचे गांभीर्याने शिक्षण घेतले. त्यांचा विवाह पाकिस्तानी रंगभूमीवरील अभिनेते आणि लेखक खालिद अहमद यांच्याशी झाला आहे.

सांस्कृतिक संघर्ष आणि स्त्रीवादी चळवळ
पाकिस्तानातील पुराणमतवादी गटांकडून नेहमीच शास्त्रीय नृत्यप्रकारांवर कडक टीका होत आली आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही पाकिस्तानात ‘भरतनाट्यम’ जिवंत ठेवण्याचे मोठे श्रेय शीमा केर्मानी यांना दिले जाते. गेल्या अनेक दशकांतील त्यांचे रंगमंचावरील बहारदार सादरीकरण, नाट्य क्षेत्रातील योगदान आणि महिला हक्कांसह सामाजिक जागृतीसाठीची धडपड, यांमुळे त्या कराचीसह संपूर्ण पाकिस्तानात एक अग्रगण्य सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व म्हणून नावारूपास आल्या. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी ‘तहरीक-ए-निस्वान’ (वुमेन्स मूव्हमेंट कल्चरल अॅक्शन ग्रुप) या संस्थेची स्थापना केली. १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ही संस्था पाकिस्तानात नाट्यप्रयोग, शैक्षणिक जनजागृती आणि महिलाकेंद्रित सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून अविरतपणे कार्यरत आहे. शीमा केर्मानी स्वतःला उघडपणे स्त्रीवादी आणि मार्क्सवादी विचारसरणीच्या मानतात. त्यामुळेच त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचा मुख्य गाभा नेहमीच पाकिस्तानी समाजातील महिलांचा आवाज बुलंद करणे आणि त्यांचे हक्क मिळवून देणे याभोवती केंद्रित राहिला आहे.

हुकूमशाहीशी लढा आणि ‘पसूरी’नंतरचे पुनरागमन
जनरल झिया-उल-हक यांच्या लष्करी राजवटीदरम्यान शीमा केर्मानी यांचे कार्य विशेष महत्त्वाचे आणि धाडसी ठरले. हा काळ पाकिस्तानातील अत्यंत कठोर धार्मिक व सांस्कृतिक निर्बंधांसाठी ओळखला जातो. अशा दडपशाहीच्या वातावरणात, शास्त्रीय कलाप्रकारांना तीव्र विरोध होत असतानाही, त्यांनी नृत्य शिकवणे आणि त्याचे जाहीर कार्यक्रम आयोजित करणे सुरूच ठेवले. एकुणातच ज्या समाजात महिलांच्या स्वातंत्र्यावर वारंवार गदा आणली जात होती, तिथे केर्मानी यांनी कला आणि रंगभूमीला अन्यायाविरुद्धच्या अभिव्यक्तीचे एक प्रभावी माध्यम केले.
जागतिक स्तरावर गाजलेल्या ‘पसूरी’ गाण्यातील त्यांच्या नृत्याविष्कारामुळे नव्या पिढीला त्यांची ओळख झाली. या अफाट लोकप्रियतेनंतर, काही वर्षांनी केर्मानी पुन्हा एकदा सार्वजनिक चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. यावेळी कराचीतील एका आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, त्या निमित्ताने पाकिस्तानातील महिलांचे हक्क आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयांवर पुन्हा एकदा नव्याने आणि तितक्याच गांभीर्याने चर्चा सुरू झाली आहे.
