गुन्हेगारी आणि राजकारण अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये दबदबा असलेल्या तसेच आमदारकी, खासदारकी भूषवलेल्या उत्तर प्रदेशमधील अतिक अहमद या नावाची सध्या देशभरात चर्चा होत आहे. अतिक अहमद सध्या तुरुंगात असून त्यांना नुकतेच अहमदाबादमधील साबरमती तुरुंगातून प्रयागराज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना आज ( २८ मार्च) २००७ सालच्या अपहरण खटल्याप्रकरणी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले तसेच खून, अपहरण, खुनाचा प्रयत्न असे जवळपास ७० खटले असलेले अतिक अहमद कोण आहेत? त्यांनी राजकारणात आपले प्रस्थ कसे निर्माण केले? त्यांना तुरुंगात का जावे लागले? हे जाणून घेऊ या. उमेश पाल हत्या प्रकरणात आरोपी अतिक अहमद यांना साबरमती तुरुंगातून प्रयागराज पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी तुरुंगातून बाहेर पडताना माझे एन्काउंटर करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप अहमद यांनी केला आहे. उमेश पाल अपहरण आणि हत्या प्रकरणात अहमद यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. उमेश पाल यांची त्यांच्या दोन पोलीस रक्षकांसह हत्या करण्यात आली होती. २००५ साली राजू पाल यांची हत्या झाली होती. याच हत्या प्रकरणात उमेश पाल हे साक्षीदार होते. हेही वाचा >> विश्लेषण : भारताबाहेर खलिस्तानवादी तग धरून का आहेत? अन्य देशांच्या सरकारांची त्यांना फूस आहे का? अमहद यांच्यासह पत्नी, भाऊ यांच्यावरही अपहरणाचा आरोप अहमद यांनी २००६ साली उमेश पाल यांचे अपहरण केले. तसेच आपल्या बाजूने साक्ष देण्याची धमकी दिली, असा आरोप उमेश पाल यांच्या पत्नीने केलेला आहे. मागील महिन्यात उमेश पाल यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर अहमद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अहमद यांच्यासह अहमद यांची पत्नी सहिस्ता परवीन, अहमद यांची दोन मुले, छोटा भाऊ खालीद अझीम अलियास अश्रफ हेदेखील या प्रकरणात सहआरोपी आहेत. अतिक अहमद राजकारणात कसे स्थिरावले? अतिक अहमद माजी खासदार आहेत. विशेष म्हणजे ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. २०१६ साली प्रयागराज येथील कृषी संशोधन संस्थेच्या प्राध्यापकांवर हल्ला केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याच आरोपाप्रकरणी ते साबरमती तुरुंगात होते. त्यांच्या राजकीय प्रवासाला १९८९ साली सुरुवात झाली. त्यांनी १९८९ साली अलाहाबाद पश्चिम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत त्यांनी विजयही मिळवला होता. पुढे दोन वेळा त्यांनी याच जागेवरून विजय मिळवला. हेही वाचा >> विश्लेषण : राहुल गांधींच्या अपात्रतेनंतर इंदिरा गांधींवरील कारवाईची चर्चा; कोर्टाच्या एका निर्णयानंतर देशात लागू केली होती आणीबाणी! फुलपूर मतदारसंघातून झाले खासदार राजकारणात स्थिरावण्यासाठी पुढे त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश करत १९९६ सालचीही निवडणूक जिंकली. तीन वर्षांनंतर त्यांनी अपना दल पक्षात प्रवेश केला आणि २००२ साली पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक जिंकली. २००३ साली त्यांनी परत समाजवादी पक्षात प्रवेश केला आणि २००४ साली फुलपूर या लोकसभा मतदासंघातून निवडणूक लढवत खासदारकी मिळवली. कधीकाळी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही याच मतदारसंघातून निवडणूक लढवलेली आहे. …आणि अतिक अहमद यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली २००५ साली अलाहाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीत अतिक अहमद यांचे बंधू अश्रफ उभे होते. मात्र अश्रफ यांचा राजू पाल यांनी पराभव केला होता. या पराभवामुळे अतिक अहमद यांना चांगलाच धक्का बसला होता. पुढे राजू पाल यांची हत्या झाली. याच हत्या प्रकरणात अतिक अहमद यांचे नाव आले. २५ जानेवारी २००५ रोजी राजू पाल यांची त्यांच्या घरासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हेही वाचा >> विश्लेषण : रामायण ज्याच्यामुळे रचले गेले तो ‘सारस क्रौंच’ पक्षी आणि उत्तर प्रदेशचा मोहम्मद आरिफ यांचा नेमका संबंध काय? अतिक अहमद यांना २००८ साली अटक, २०१२ साली सुटका पुढे राजू पाल यांच्या पत्नीने अतिक अहमद, अश्रफ तसेच इतर सात जणांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. या हत्या प्रकरणात राजकीय दबाव वाढल्यामुळे अतिक अहमद यांना २००८ साली अटक करण्यात आली. २०१२ साली त्यांची सुटकाही झाली. पुढे २०१४ साली अतिक अहमद यांनी समाजवादी पक्षाकडून तिकीट मिळवत लोकसभा निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्याशी संबंध बिघडल्यानंतर अतिक अहमद जास्तच अडचणीत सापडले. मोदींविरोधात लढवली होती निवडणूक अतिक अहमद यांना फेब्रुवारी २०१७ मध्ये प्रयागराजमधील सॅम हिंगनबॉटम कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तुरुंगात असूनही अतिक यांनी २०१९ साली नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांना अवघी ८५५ मते मिळाली. वेगवेगळ्या माध्यमांच्या वृत्तानुसार ६० वर्षीय अतिक अहमद यांच्याविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, धमकी, हल्ला करणे अशा वेगवेगळ्या ७० प्रकरणांत गुन्हे दाखल आहेत.