Pakistan Islamabad Suicide Bomb Attack : दुसऱ्याचे घर जाळू पाहणाऱ्या व्यक्तीचे घर त्याच आगीत जळून खाक व्हावे अशी अवस्था सध्या पाकिस्तानची झाली आहे. दहशतवादाला खतपाणी घालणारा हा देश सध्या त्याच दहशतवादाच्या छायेत सापडला आहे. गेल्या दोन वर्षांत पाकिस्तानमधील विविध शहरात बॉम्बस्फोटाच्या कित्येक घटना घडल्या आहेत. मंगळवारी दुपारी इस्लामाबाद शहरातील जिल्हा न्यायालयाच्या संकुलाबाहेर पुन्हा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात जवळपास १२ जणांचा मृत्यू झाला असून २० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यादरम्यान पाकिस्तानमध्ये नेमकी कोण दहशत घालतयं? असा प्रश्न उपस्थित होत आहे, त्याविषयीचा हा आढावा…

पाकिस्तानमध्ये कुणाची दहशत?

पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, इस्लामाबाद शहरातील जिल्हा न्यायालयाच्या संकुलाबाहेर मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती टेहाळणी करीत होता. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला न्यायालयीन संकुलात जाता येत नव्हते. अखेर त्याने साडेबाराच्या सुमारास मुख्य प्रवेशद्वाराजवळच स्वत:ला बॉम्बने उडवून घेतले. या घटनेत काही पोलिसांसह स्थानिक लोकांचादेखील मृत्यू झाला. हल्लेखोर न्यायालयाच्या आवारापर्यंत मोटारसायकलवरून आला होता आणि त्याने अंगावर शाल घेतलेली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मृत हल्लेखोराची ओळख पटवली जात आहे. इस्लामाबाद जिल्हा न्यायालयाच्या संकुलाबाहेर नेहमीच लोकांची वर्दळ असते. विशेष म्हणजे, संसद, सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती व पंतप्रधानांची कार्यालये यांसारख्या महत्त्वाच्या सरकारी इमारती येथून अवघ्या हाकेच्या अंतरावर आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने आत्मघाती हल्ला घडवून आणण्यासाठी सुमारे चार ते पाच किलो वजनाची स्फोटके वापरली होती. अलीकडच्या काळात शहरात झालेला हा सर्वात मोठा आत्मघातकी हल्ला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यापूर्वी सप्टेंबर २००८ मध्ये मॅरियट हॉटेलजवळ झालेल्या भीषण ट्रक हल्ल्यात ५० हून अधिक लोक ठार झाले होते. प्रत्यक्षदर्शींनी एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना या थरारक घटनेचा प्रसंग सांगितला आहे. हल्यानंतर जिल्हा न्यायालयातील वकील आणि पोलीस सैरावैरा पळत होते. संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळच प्रवेशद्वारावर मृतदेहांचा खच पडला होता आणि अनेक गाड्यांना आग लागली होती, असे एका वकिलाने सांगितले.

या स्फोटामागे नेमका कोणाचा हात?

डॉन वृत्तापत्रानुसार, इस्लामाबादमधील आत्मघाती स्फोटाची जबाबदारी जमात-उल-अहरार या संघटनेने घेतली आहे. तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेचा हा फुटीर गट आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या माहितीनुसार, या गटाने यापूर्वीही पाकिस्तानात अनेक हल्ले केले आहेत. ऑगस्ट २०१५ मध्ये, जमात-उल-अहरार संघटनेने पाकिस्तानमधील पंजाबचे गृहमंत्री शुजा खानजादा आणि त्यांच्या १८ समर्थकांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. मार्च २०१६ मध्ये पेशावरमधील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाच्या दोन पाकिस्तानी कर्मचाऱ्यांच्या हत्येसाठी हीच संघटना जबाबदार होती. त्याचवर्षी या दहशतवादी संघटनेने लाहोरमधील गुलशन-ए-इक्बाल मनोरंजन पार्कमध्ये आत्मघाती हल्ला केला, ज्यात ७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये लहान मुलांसह महिलांचा समावेश होता आणि शेकडो लोक जखमी झाले होते.

पाकिस्तानचे भारतावर गंभीर आरोप

इस्लामाबादमधील आत्मघाती स्फोटानंतर पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तेथील राजकीय नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. यापैकी काहींनी शेजारील देशांवर विशेषतः भारत आणि अफगाणिस्तानवर आरोपांचे बोट ठेवले आहे. या हल्ल्यामागे जे कोणी असतील, त्यांना सोडले जाणार नाही. आम्ही ठोस पुरावे आणि तपशीलांसह प्रत्युत्तर देऊ असा इशारा पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी मंगळवारी दिला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या हल्ल्यामागे अफगाणिस्तानचा हात असल्याचे म्हटले आहे; तर पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी एक पाऊल पुढे जात भारतावर थेट आरोप केला आहे. “हा हल्ला भारताच्या दहशतवादी प्रतिनिधींनी घडवून आणला आहे. अलीकडच्या काळात पाकिस्तानात झालेले अनेक हल्ले अफगाणिस्तानमधील भूमीवरून होत आहेत आणि त्यामागे भारताचा हात आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

भारताने फेटाळले पाकिस्तानचे आरोप

विशेष म्हणजे याआधीही पाकिस्तानने भारतावर अनेकदा गंभीर आरोप केलेले आहेत. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेला भारताकडून मदत मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या आरोपांमुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणावपूर्ण संबंध आणखीच बिघडले आहेत. त्याचवेळी, भारत आणि अफगाणिस्तानमधील राजनैतिक संबंध अधिक मजबूत होत आहेत, हे पाकिस्तानला खटकत असल्याचे तज्ञांचे मत आहे. पाकिस्तानने केलेले सर्व आरोप भारताने फेटाळून लावले आहेत. “पाकिस्तान सरकार त्यांच्या देशातील लष्करी हस्तक्षेप आणि राजकीय सत्तासंघर्षापासून तेथील लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानच्या अशा निराधार आरोपांची जाणीव आहे आणि अशा दिशाभूल करणाऱ्या प्रयत्नांना बळी पडणार नाहीत,” असे भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी माध्यमांना सांगितले आहे.