Last Queen of Darbhanga Raj donated 600 kg gold: दरभंगा राजघराण्याच्या राणी कामसुंदरी देवी यांचे अलीकडेच १२ जानेवारी २०२६ रोजी वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले. बिहारमधील दरभंगाच्या ऐतिहासिक कल्याणी निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला; त्या गेले काही दिवस आजारी होत्या. त्यांच्या निधनाने केवळ दरभंगा राजघराण्याचेच नव्हे, तर सेवा, त्याग आणि देशभक्तीवर आधारलेल्या त्यांच्या वारशामुळे संपूर्ण मिथिलांचल प्रदेशातील एक सन्माननीय पर्व संपुष्टात आले आहे. दरभंगा राजघराण्याला राष्ट्रीय इतिहासात विशेष स्थान आहे. विशेषतः १९६२ च्या भारत-चीन युद्धादरम्यान दिलेल्या असाधारण योगदानासाठी दरभंगा ओळखले जाते. राष्ट्रीय संकटाच्या काळात सरकारने नागरिकांना मदतीचे आवाहन केले त्यावेळेस, दरभंगा राजघराणे सर्वप्रथम पुढे आले. या घराण्याने दरभंगातील इंद्रभवन मैदानावर राष्ट्रीय संरक्षणासाठी १५ मण (सुमारे ६०० किलो) सोनं दान केले होते, ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोटी संस्मरणीय घटना होती.
१९६२ चा चीनचा हल्ला-राष्ट्रीय संकट
१९६२ च्या भारत-चीन युद्धाला ६४ वर्ष पूर्ण झाली. हे युद्धं भारतासाठी अत्यंत गंभीर राष्ट्रीय संकट होते. या काळात भारत सरकारने आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी नागरिकांना विविध प्रकारे मदतीचे आवाहन केले होते. २० ऑक्टोबर १९६२ रोजी चीनने अचानक आक्रमण केले. सरकारने ‘राष्ट्रीय संरक्षण निधी’साठी (National Defence Fund) देणग्यांचे आवाहन केले. सामान्य नागरिक, व्यापारी, कर्मचारी, शेतकरी सर्वांनी स्वेच्छेने देणग्या दिल्या. अनेकांनी एका दिवसाचा/एका महिन्याचा पगार दिला होता.
दरभंगा राजघराण्याचा इतिहास
दरभंगा राजघराणे हे उत्तर बिहारमधील मिथिला प्रदेशातील अत्यंत प्रभावी आणि प्रतिष्ठित राजघराणे होते. हे राजघराणे प्रामुख्याने धर्म, शिक्षण आणि लोककल्याण या क्षेत्रांतील योगदानासाठी ओळखले जाते. मुघल काळात महसूल व्यवस्थापनाच्या माध्यमातून या घराण्याचा प्रभाव वाढला आणि ब्रिटिश राजवटीत ते भारतातील सर्वात मोठ्या जमीनदारांपैकी एक होते. दरभंगा राजे मैथिल ब्राह्मण परंपरेतील असून त्यांनी मिथिला संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यावर विशेष भर दिला. संस्कृत शिक्षण, वेदाध्ययन, न्यायशास्त्र, धर्मग्रंथांचे प्रकाशन तसेच मैथिली साहित्याला त्यांनी मोठा राजाश्रय दिला. अनेक गुरुकुले, संस्कृत पाठशाळा, महाविद्यालये आणि ग्रंथालये त्यांच्या मदतीने उभी राहिली. त्यामुळे मिथिला हा प्रदेश दीर्घकाळ उत्तर भारतातील एक महत्त्वाचे बौद्धिक केंद्र राहिला.
राजघराण्याचे धार्मिक योगदान
या राजघराण्याचे धार्मिक योगदानही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. काशी, प्रयाग, अयोध्या तसेच मिथिला परिसरात अनेक मंदिरे, धर्मशाळा आणि घाटांच्या उभारणीसाठी दरभंगाच्या राजांनी मोठ्या प्रमाणावर दान दिले. शिव-शक्ती उपासना, वैदिक परंपरा आणि धार्मिक विधी यांना त्यांनी संस्थात्मक स्वरूप दिले. दुष्काळ, आपत्ती किंवा सामाजिक संकटाच्या काळात अन्नछत्रे, वस्त्रदान व आर्थिक मदत देण्याची परंपराही या घराण्याने जोपासली. ब्रिटिश काळात महाराजा लक्ष्मीश्वर सिंह, महाराजा रमेश्वर सिंह आणि महाराजा कामेश्वर सिंह यांसारख्या राजांनी प्रशासन, शिक्षण आणि सामाजिक सुधारणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, १९५० नंतर जमीनदारी व्यवस्था रद्द झाल्यानंतर दरभंगा राजघराण्याची राजकीय व आर्थिक सत्ता कमी झाली.

दरभंगा घराण्याची भूमिका
दरभंगा घराण्याने राष्ट्रीय संरक्षणासाठी १५ मण (सुमारे ६०० किलो) सोनं दान केलेच. या शिवाय, त्यांनी तीन खासगी विमाने आणि ९० एकरांची खासगी हवाई पट्टीही सरकारकडे सुपूर्द केली. आजचा दरभंगा विमानतळ याच जमिनीवर उभा आहे. इतिहासकारांनी या कृतीचे वर्णन भारतासाठी राजघराण्यांकडून मिळालेल्या सर्वात महत्त्वाच्या योगदानांपैकी एक म्हणून गौरवले आहे. देशनिर्मितीतील दरभंगा राजघराण्याची भूमिका ही फक्त स्वातंत्रोत्तर नव्हे तर स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या प्रारंभीच्या टप्प्यात दरभंगा राजघराण्याने महात्मा गांधींना मोलाची साथ दिली होती. महाराजा लक्ष्मीश्वर सिंह यांनी केवळ आर्थिक मदतच केली नाही, तर स्वातंत्र्य चळवळीचा सक्रिय प्रचारही केला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या (INC) घडणीच्या काळात तिला टिकवून ठेवण्यात त्यांची भूमिका निर्णायक ठरली.
ऐतिहासिक वारशाचे शाश्वत प्रतीक
राणी कामसुंदरी देवी यांचे संपूर्ण आयुष्य विशेषाधिकारांपेक्षा कर्तव्याला अग्रक्रम देण्याच्या परंपरेचे प्रतीक होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने दरभंगा आणि संपूर्ण मिथिलांचलमध्ये शोककळा पसरली आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दरभंगा राजवाडा संकुलात पारंपरिक सन्मानांसह त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे निधन हे केवळ कुटुंबासाठीच नव्हे, तर पिढ्यान्पिढ्या दरभंगा राजघराण्याने जपलेल्या मूल्ये आणि परंपरांसाठीही भरून न येणारे नुकसान असल्याचे राजघराण्याचे वारस युवराज कुमार कपिलेश्वर सिंह यांनी सांगितले. दरभंगा राजघराणे शतकानुशतके चालत आलेली अंत्यसंस्कारांची परंपरा पाळते. सर्व राजे आणि राण्यांवर कामेश्वर नगरमधील मधेश्वरनाथ संकुलातच अंत्यसंस्कार केले जातात. राजांच्या चितास्थळांवर मंदिरे उभारण्यात आली असून, आज या संकुलात नऊ मंदिरे आहेत. ही मंदिरे दरभंगा राजघराण्याच्या धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाची शाश्वत प्रतिके म्हणून उभी आहेत.

राणी कामसुंदरी देवी
राणी कामसुंदरी देवी या दरभंगा संस्थानाचे अखेरचे शासक महाराजा कामेश्वर सिंह यांच्या तिसऱ्या पत्नी होत. १९४० च्या दशकात त्यांचा विवाह झाला होता. महाराजांचे १९६२ साली निधन झाले. त्यांची पहिली पत्नी राणी राजलक्ष्मी देवी यांचे १९७६ मध्ये निधन झाले, तर दुसरी पत्नी राणी कामेश्वरी प्रिया यांचे निधन त्याआधीच झाले होते. तीन विवाह असूनही महाराजा कामेश्वर सिंह यांना पुत्ररत्न नव्हते. यानंतर राणी कामसुंदरी देवी यांनी आपल्या मोठ्या मुलीचा मुलगा कुमार कपिलेश्वर यांची दरभंगा राजचे विश्वस्त (ट्रस्टी) म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दरभंगा राज ट्रस्टने समाजसेवा, शिक्षण आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनाच्या क्षेत्रातील आपले कार्य सातत्याने सुरू ठेवले. राणी कामसुंदरी देवी यांची ओळख राजेशाही वैभवापेक्षा परंपरा, कर्तव्य आणि जबाबदारी जपणाऱ्या संरक्षिका म्हणूनच अधिक मानली जात होती.
