Who was Dr. Dwarkanath Kotnis? चीनने हेबेई प्रांतात ‘डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक सभागृह’ उभारले आहे. दुसऱ्या चीन-जपान युद्धादरम्यान चीनमध्ये सेवा देऊन शेकडो जीव वाचविणाऱ्या भारतीय डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या सन्मानार्थ हे स्मारक उभारण्यात आले आहे. चीनमधील रणांगणावर वैद्यकीय सेवा देत असताना १९४२ साली वयाच्या ३२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. भारतामधील चीनचे राजदूत शू फेईहोंग यांनी मंगळवारी ‘एक्स’वर पोस्ट करत याविषयी माहिती दिली. भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये डॉ. कोटणीस यांना मानाचे स्थान आहे. या महिन्याच्या सुरुवातीला डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक समितीने पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या निधनाच्या ८३व्या पुण्यतिथिनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. भारत-चीन मैत्रीचे चिरंतन प्रतीक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला चीनचे कॉन्सुल जनरल शू वेई उपस्थित होते.
मराठी मध्यमवर्गीय घरातील डॉक्टर
डॉ. द्वारकानाथ कोटणीस म्हणजेच के दिहुआ (柯棣华 – Kē Dìhuá). के दिहुआ हे त्यांचं चीनी भाषेतील नाव. १९३८ साली दुसऱ्या चीन-जपान युद्धाच्या कालखंडात वैद्यकीय मदतीसाठी त्यांना आणि त्यांच्या आणखी चार सहकाऱ्यांना चीनमध्ये पाठवण्यात आले होते. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या कर्तव्याला जागलेल्या या डॉक्टरांना भारत-चीन मैत्री आणि सहकार्याचे आदर्श उदाहरण मानले जाते. द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म १० ऑक्टोबर १९१० रोजी सोलापूरमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला होता. त्यांना दोन भाऊ आणि पाच बहिणी होत्या. त्यांनी मुंबईत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका
१९३८ साली जपानने चीनवर आक्रमण केल्यानंतर जनरल झू दे (चिनी कम्युनिस्ट पक्ष) यांनी जवाहरलाल नेहरू यांना चीनसाठी काही डॉक्टर पाठवण्याची विनंती केली होती. त्या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ३० जून १९३८ रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जनतेला आवाहन केले. ७ ते ९ जुलै दरम्यान साजऱ्या झालेल्या ‘अखिल भारतीय चीन दिन’ आणि ‘चीन फंड’ मधून २२००० रुपयांचा निधी गोळा करून त्यांनी स्वयंसेवक डॉक्टरांचे पथक आणि एक रुग्णवाहिका चीनला पाठवण्याची व्यवस्था केली. जपानची सुदूर पूर्वेतील भूमिका आणि चीनवरील आक्रमण याबाबत नेताजींनी मॉडर्न रिव्ह्यू या नियतकालिकात लेखही लिहिला होता.
भारतीय वैद्यकीय मिशन
१९३८ साली सप्टेंबर महिन्यात पाच डॉक्टरांचे वैद्यकीय पथक ‘भारतीय वैद्यकीय मिशन’ म्हणून चीनला पाठवण्यात आले. या पथकात अलाहाबादचे डॉ. एम. अटल (मोहिमेचे प्रमुख), नागपूरचे डॉ. एम. चोलकर, सोलापूरचे डॉ. द्वारकानाथ कोटणीस, तसेच कोलकत्याचे डॉ. बी. के. बासू आणि डॉ. देवेश मुखर्जी यांचा समावेश होता. या सर्वांपैकी डॉ. कोटणीस वगळता इतर सर्व डॉक्टर सुरक्षित भारतात परतले.

हे पथक सर्वप्रथम चीनमधील वुहान शहरातील हानकोउ बंदरावर पोहोचले. त्यानंतर १९३९ साली त्यांना त्या वेळच्या क्रांतिकारी केंद्र असलेल्या यानआन येथे पाठवण्यात आले. तेथे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख नेते माओ झेदोंग, झू दे आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले. कारण इतर आशियाई देशातून आलेले हे पहिलेच वैद्यकीय पथक होते.
२८ वर्षांचे असताना डॉ. कोटणीस या पाच सदस्यीय पथकाचा भाग म्हणून चीनमध्ये गेले होते आणि जवळजवळ पाच वर्षे तेथेच राहिले. त्यांनी फिरत्या दवाखान्यांत जखमी सैनिकांवर उपचार केले. १९३९ साली उत्तर चीनमध्ये विविध ठिकाणी काम केल्यानंतर, वुताई पर्वतरांगांच्या परिसरात जिन-चा-जी सीमाभागात त्यांनी माओ झेदोंग यांच्या नेतृत्वाखालील आठव्या मार्गसेनेत (एइथ रूट आर्मी) प्रवेश केला. रणांगणावरील डॉक्टर म्हणून डॉ. कोटणीस यांचे काम अत्यंत तणावपूर्ण होते.
७२ तास एक क्षणही न झोपता शस्त्रक्रिया
औषधांची नेहमीच मोट्या प्रमाणावर कमतरता भासत असे. १९४० मध्ये जपानी सैन्याविरुद्ध झालेल्या एका दीर्घकाळ चाललेल्या लढाईदरम्यान, डॉ. कोटणीस यांनी सलग तब्बल ७२ तास एक क्षणही न झोपता शस्त्रक्रिया केल्या. त्या लढाईत त्यांनी ८०० हून अधिक जखमी सैनिकांवर उपचार केले. पुढे त्यांची नियुक्ती प्रसिद्ध कॅनेडियन शल्यविशारद नॉर्मन बेथ्यून यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या डॉ. बेथ्यून आंतरराष्ट्रीय शांतता रुग्णालयाचे संचालक म्हणून करण्यात आली.

गुओ छिंगलान यांची डॉ. कोटणीस यांच्याशी भेट
१९४० साली बेथ्यून रुग्णालयातील परिचारिका गुओ छिंगलान यांची डॉ. कोटणीस यांच्याशी भेट झाली. पहिल्या भेटीतच गुओ छिंगलान डॉ. कोटणीस यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाल्या. डॉ. कोटणीस चिनी भाषा लिहू व बोलू शकत असल्याचे पाहून त्या प्रभावित झाल्या. १९४१ मध्ये दोघांनी विवाह केला. २३ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांना पुत्र झाला. नेई रोंगझेन यांच्या सूचनेनुसार त्या मुलाचे नाव यिनहुआ ठेवण्यात आले. त्याचा अर्थ ‘भारत’ (यिन) आणि ‘चीन’ (हुआ) असा होतो. मात्र यिनहुआ यांचा १९६७ साली वयाच्या २४ व्या वर्षी वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेण्याच्या आधीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण वैद्यकीय निष्काळजीपणा असल्याचे सांगितले जाते.
९ डिसेंबर १९४२ शेवटचा दिवस
डॉ. कोटणीस आपल्या कुटुंबाला नियमित पत्रे लिहीत असत. “त्या पत्रांत ते फार आनंदी असल्याचे जाणवत असे. लोक त्यांचे आभार मानण्यासाठी येत असल्याचे त्यांनी लिहिले आहे. चांगल्या गोष्टींचा उल्लेख ते करत होते,” असे त्यांची बहीण मनोरमा यांनी म्हटले आहे. चीनमध्ये जिथे जिथे ते गेले, त्या प्रत्येक ठिकाणचे सविस्तर वर्णन त्यांनी पत्रांत केले. भारतातील जीवनापेक्षा पूर्णतः वेगळे अनुभव असल्याने ही पत्रे वाचताना संपूर्ण कुटुंबाला ती अत्यंत रोचक वाटत होती. शेवटी तणावपूर्ण कामाचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. यिनहुआच्या जन्मानंतर अवघ्या तीन महिन्यांतच डॉ. कोटणीस यांना अपस्माराचा झटका आला. सलग झटक्यांमुळे ९ डिसेंबर १९४२ रोजी त्यांचे निधन झाले.
राष्ट्राने एक मित्र गमावला
नानछुआन गावातील हिरोज् कोर्टयार्डमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी माओ झेदोंग यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत म्हटले, “सेनेने एक मदतीचा हात गमावला आहे आणि राष्ट्राने एक मित्र गमावला आहे.” मृत्यूपूर्वी ७ जुलै १९४२ रोजी त्यांनी चिनी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला, असे सांगितले जाते; मात्र याची अधिकृत खात्री होऊ शकलेली नाही.

सन्मानार्थ एक मोठा पुतळा उभारण्यात आला
उत्तर चीनमधील हेबेई प्रांतातील शिजियाझुआंग शहरात शहीद स्मारक उद्यान आहे. हे शहरातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे डॉ. कोटणीस यांच्या सन्मानार्थ एक मोठा पुतळा उभारण्यात आला आहे. या उद्यानातील छोट्या संग्रहालयात डॉ. कोटणीस यांच्याशी संबंधित अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. त्यात भारतातून चीनला जाताना त्यांनी लिहिलेली वही, रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी वापरलेली काही शस्त्रक्रियेची साधने आणि अनेक छायाचित्रांचा समावेश आहे. काही छायाचित्रांमध्ये माओ झेदोंग यांच्यासह चिनी कम्युनिस्ट पक्षातील महत्त्वाचे नेतेही दिसतात.

डॉ. कोटणीस यांचे कुटुंब
१९४१ साली निधनाच्या सुमारे एक वर्ष आधी डॉ. कोटणीस यांचा गुओ छिंगलान यांच्याशी विवाह झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर १९४९ साली गुओ छिंगलान यांनी एका चिनी व्यक्तीशी पुनर्विवाह केला. त्या विवाहातून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. गुओ छिंगलान या भारत आणि चीनमधील अनेक महत्त्वाच्या राजनैतिक कार्यक्रमांत सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी झाल्या. २००० साली भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या समारंभात त्या उपस्थित होत्या. तसेच, २००३ साली पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या बीजिंग भेटीदरम्यान आणि २००६ मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष हू जिनताओ यांच्या भारत दौऱ्यातही त्यांनी सहभाग घेतला होता. ईशान्य चीनमधील दालियन येथे २८ जून २०१२ रोजी वयाच्या ९६व्या वर्षी गुओ छिंगलान यांचे निधन झाले.

चित्रपटातील स्मृति
डॉ. कोटणीस यांच्या जीवनावर आधारित डॉ. कोटणीस की अमर कहानी हा हिंदी चित्रपट तयार करण्यात आला. या चित्रपटाची कथा ख्वाजा अहमद अब्बास यांनी लिहिली होती आणि दिग्दर्शन व्ही. शांताराम यांनी केले होते; त्यांनीच चित्रपटात डॉ. कोटणीस यांची भूमिका साकारली होती. त्यांच्या जीवनावर आधारित के दिहुआ दाईफू (१९८२; Dr. D.S. Kotnis) हा चिनी चित्रपटही तयार करण्यात आला होता. त्याची पटकथा हुआंग झोंगजियांग यांनी लिहिली होती.
