कॅनडात भारतीय वंशाच्या व्यक्तींवरील जीवघेण्या हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये टोरंटो शहरात भारतीय तरुणीसह एका विद्यार्थ्याची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. एकाच आठवड्यात घडलेल्या या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे त्यावेळी संपूर्ण भारतातून संतापाची लाट उसळली होती. या घटना ताज्या असतानाच ओंटारियो प्रांतात आणखी एका भारतीय महिलेची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. नॅन्सी ग्रेवाल (वय ४५) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून त्या अत्यंत परखड विचारांसाठी ओळखल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर कोण होत्या नॅन्सी ग्रेवाल? त्यांची हत्या नेमकी कशी झाली? त्याविषयीचा हा आढावा…

नॅन्सी यांची हत्या नेमकी कशी झाली?

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, नॅन्सी ग्रेवाल ओंटारियो प्रांतातील विंडसर परिसरात राहत होत्या. मंगळवारी (३ मार्च) एका अज्ञात हल्लेखोराने नॅन्सीच्या घरात शिरून त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. आरडाओरड झाल्यानंतर आसपासच्या लोकांनी नॅन्सीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे कॅनडातील भारतीय समुदायात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कॅनडा पोलिसांनी अद्याप याप्रकरणी कोणालाही ताब्यात घेतले आहे की नाही, याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. या हत्येमागील नेमका उद्देश काय होता, याचा शोध पोलिस घेत आहेत.

कोण होत्या यूट्यूबर नॅन्सी ग्रेवाल?

कॅनडाच्या ओंटारियो प्रांतात राहणाऱ्या नॅन्सी ग्रेवाल या केवळ एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नव्हत्या, तर त्या भारत-कॅनडा संबंधांवर आणि पंजाबी समुदायातील अंतर्गत प्रश्नांवर परखड भाष्य करणाऱ्या सक्रिय व्यक्ती होत्या. नॅन्सी यांनी एक गायिका आणि निवेदिका म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर ८,८०० हून अधिक सबस्क्रायबर्स असून त्यांनी ४०० पेक्षा जास्त व्हिडीओ अपलोड केले होते. नॅन्सी यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटला ११,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स होते, जिथे त्या त्यांच्या आयुष्यातील घडामोडी आणि गायनाच्या कार्यक्रमांची माहिती शेअर करीत होत्या. नॅन्सी यांनी नेहमीच भारत-कॅनडा संबंधांमधील तणावावर भाष्य केले. त्यांनी तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या भारतविषयक धोरणांवर कडाडून टीका केली होती. गुरपतवंतसिंग पन्नू आणि अमृतपाल सिंग यांसारख्या खलिस्तानी फुटीरतावादी नेत्यांवरही नॅन्सी सातत्याने टीका करीत होत्या.

आणखी वाचा : इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेचा पराभव होणार? चिनी प्राध्यापकाच्या भाकिताने खळबळ का उडाली?

खलिस्तान्यांवर ओढले होते ताशेरे

अकाली दलचे नेते बिक्रमसिंग मजिठिया आणि डेरा बियासचे गुरिंदरसिंग ढिल्लो यांच्यावरही नॅन्सी यांनी आपल्या भाषणातून ताशेरे ओढले होते. भारतीय टीव्हीवरील मुलाखती आणि पंजाबी चर्चासत्रांमध्ये त्यांनी स्वतःला कट्टरतावादाविरोधातील निर्भीड आवाज असे संबोधले होते. विंडसरमधील स्थानिक समुदायाच्या प्रश्नांवरही नॅन्सी अतिशय आक्रमक होत्या. हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांनंतर त्यांनी सीसीटीव्ही बसवण्याची मागणी लावून धरली होती. गुरुद्वारांमधील कथित बेकायदेशीर कृत्ये, काही निहंग शिखांच्या पद्धती आणि समुदायातील अंतर्गत वादांवर त्यांनी अनेक व्हिडीओ तयार केले होते. काही टीकाकारांनी त्यांच्यावर शीख परंपरांचा अवमान केल्याचा आरोप केला होता; तर काहींनी यांना धाडसी शीख आवाज म्हणून गौरवले; मात्र काही खलिस्तानी समर्थकांनी त्यांच्या वक्तव्यांमुळे स्वतःच्या समुदायाची प्रतिमा खराब होत असल्याचा आरोप केला होता.

हत्येची घटना नेमकी कशी घडली?

गेल्या वर्षी जूनमध्ये पंजाबमधील बठिंडा येथील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कांचन कुमारी (ऊर्फ कमल कौर भाभी) यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी नॅन्सी ग्रेवाल यांनी समाजमाध्यमांवरून आक्रमकपणे आवाज उठवला होता. त्या घटनेनंतर आता नॅन्सी यांचीच हत्या झाल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. कॅनडातील लासाले पोलिस विभागाने नॅन्सी यांच्या हत्येप्रकरणी अधिकृत निवेदन जारी केले असून, या घटनेने पुन्हा एकदा परदेशातील भारतीय समुदायाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (३ मार्च) रात्री साडे नऊच्या सुमारास नॅन्सी यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे एक पथक तातडीने घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना नॅन्सी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यांच्या अंगावर चाकूने वार केल्याच्या अनेक जखमा होत्या. नॅन्सी यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या निवेदनात नमूद आहे.

तपासाचे चक्र वेगाने, दोन घरे सील

पोलिसांनी अद्याप संशयित हल्लेखोराची कोणतीही माहिती उघड केलेली नाही. या प्रकरणात आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आल्याचे वृत्त नाही. बुधवारी (४ मार्च) सकाळपासूनच पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपासच्या परिसरात मोठी शोधमोहीम हाती घेतली होती. तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी कॅनडा स्ट्रीट आणि बिशप स्ट्रीटदरम्यान असलेल्या टॉड लेनवरील दोन घरे पूर्णपणे सील केली. या हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी स्थानिक नागरिकांची मदत मागितली आहे. परिसरातील रहिवाशांकडे त्यांच्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज असल्यास ते पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेबाबत कोणाकडेही काहीही माहिती असल्यास त्यांनी डिटेक्टिव्ह सार्जंट जेमी नेस्टर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन लासाले पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा : इराणवरील हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन? अमेरिकेच्या कायद्यांचीही पायमल्ली?

कॅनडातील भारतीयांना कोण लक्ष्य करतंय?

गेल्या काही वर्षांत कॅनडातील भारतीय वंशांच्या प्रामुख्याने हिंदू समुदायातील नागरिकांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. एका आकडेवारीनुसार- २०१९ ते २०२५ या कालावधीत कॅनडातील भारतीय वंशाच्या व्यक्तींवरील हल्ल्यांमध्ये २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. स्थलांतरितांच्या संख्येत वेगाने वाढ झाल्याने हे हल्ले होत असल्याचा दावा काहींनी केला आहे. कॅनेडियन लोक याला गृहनिर्माण संकट, नोकऱ्यांची कमतरता आणि सार्वजनिक सेवांवरील भार मानतात, त्यामुळे तिथे स्थलांतरविरोधी भावना वाढल्या आहेत; ज्या द्वेषपूर्ण गुन्हे आणि ऑनलाइन गैरवर्तनातून दिसून येतात, असे एका स्थानिक माध्यमाने आपल्या वृत्तात म्हटले आहे. भारत-कॅनडा संबंधांमधील तणावामुळे (खालिस्तान मुद्द्यावर) काही गटांमध्ये भारतविरोधी भावना वाढल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, कॅनडामधील हिंदू समुदायाच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करण्यात आले आहेत, त्यामुळे भारत सरकारकडून या संदर्भात काय कठोर भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.