Who killed Saif al-Islam Gaddafi :लिबियाचे माजी हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी यांचे पुत्र सैफ अल-इस्लाम गद्दाफी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राजधानी त्रिपोलीपासून सुमारे १३६ किलोमीटर नैर्ऋत्येला असलेल्या झिंतान शहरात मंगळवारी ही घटना घडली. सैफ अल-इस्लाम यांच्या हत्येची पुष्टी तपास यंत्रणांनी केली असली तरीही त्यांची हत्या कोणी आणि का केली? याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. लिबियावर तब्बल ४२ वर्षे राज्य करणाऱ्या हुकूमशहाच्या मुलाचीच हत्या झाल्याने देशात खळबळ उडाली आहे. या हत्येनंतर लिबियामध्ये पुन्हा एकदा गृहयुद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर कोण होते सैफ अल-इस्लाम? त्यांची हत्या नेमकी कशी झाली? त्याविषयीचा हा आढावा…
कोण होते सैफ गद्दाफी?
२५ जून १९७२ रोजी त्रिपोली येथे जन्मलेले सैफ गद्दाफी हे लिबियाचे माजी हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी आणि त्यांची दु सरी पत्नी सफिया फरकाश यांचे दुसरे पुत्र होते. लहानपणापासूनच ते लिबियाच्या राजकीय व्यवस्थेत एका वेगळ्याच स्थानावर होते. सत्ताधारी कुटुंबाचा भाग असूनही त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत सरकारी पद नव्हते. तरीही वडिलांच्या राजवटीत सैफ यांना लिबियातील अत्यंत प्रभावशाली व्यक्तींमध्ये गणले जात होते. हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी यांचे राजकीय वारसदार म्हणून सैफ यांच्याकडे पाहिले जात होते. २००० च्या दशकात सैफ यांनी लिबिया आणि पाश्चिमात्य देशांमधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम केले. यादरम्यान आंतरराष्ट्रीय निर्बंधांमधून देशाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. लिबियाने सामूहिक विनाशकारी शस्त्र कार्यक्रम सोडून देण्याच्या चर्चांमध्ये सैफ यांचा मोलाचा सहभाग होता. १९८८ मध्ये स्कॉटलंडमधील लॉकरबी येथे झालेल्या विमान बॉम्बस्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याबाबतच्या वाटाघाटींमध्येही ते सहभागी होते.
लिबियन राजवटीचा ‘आधुनिक चेहरा’
इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आणि युरोपमधील शिक्षणामुळे सैफ यांच्याकडे लिबियन राजवटीचा ‘आधुनिक चेहरा’ म्हणून पाहिले जात होते. त्यांनी घटनात्मक सुधारणांचा आणि मानवी हक्कांचा पुरस्कार केला होता. युरोपमधील राजकीय, शैक्षणिक व उद्योग क्षेत्रातील उच्चभ्रू व्यक्तींशी त्यांनी जवळचे संबंध प्रस्थापित केले होते. १९९४ मध्ये सैफ यांनी त्रिपोलीच्या अल-फातेह विद्यापीठातून अभियांत्रिकी विज्ञानातील पदवी घेतली होती. त्यानंतर फ्रान्स आणि कॅनडासह काही देशांनी विद्यार्थी व्हिसा नाकारल्यानंतर त्यांनी ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथील इमाडेक बिझनेस स्कूलमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. २००८ मध्ये सैफ यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सकडून पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्या काळात संस्थेचे लिबियाच्या राजकीय व्यवस्थेशी निकटचे संबंध होते. २००५ मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने त्यांची ‘यंग ग्लोबल लीडर’ म्हणून निवड केली होती. तसेच डब्ल्यूईएफचे संस्थापक क्लॉस श्वाब यांनी जानेवारी २०११ मधील दावोस परिषदेसाठी त्यांना वैयक्तिकरीत्या आमंत्रित केले होते.
आणखी वाचा : व्हेनेझुएलाकडून तेल खरेदीमुळे भारताला फायदा की तोटा? काय सांगते आकडेवारी?
हिंस्र प्राण्यांची होती प्रचंड आवड
राजकारणापलीकडे सैफ यांचे आयुष्य प्रचंड संपत्ती आणि विक्षिप्त छंदांनी वेढलेले होते. त्यांना हिंस्र प्राणी पाळण्याच प्रचंड आवड होती. व्हिएन्नामध्ये असताना त्यांना पाळीव वाघ तिथल्या प्राणिसंग्रहालयात ठेवण्याची विशेष परवानगी मिळाली होती. त्रिपोलीजवळील सैफ यांच्या फार्म हाऊसवर एक पांढरा वाघही होता. २००२ ते २००५ दरम्यान सैफ यांनी काढलेल्या छायाचित्रांचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यासाठी सीमेन्ससारख्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांना पाठबळ दिले होते. सैफ यांच्या ३७ व्या वाढदिवसाच्या पार्टीला मोनॅकोचे प्रिन्स अल्बर्ट आणि रशियन अब्जाधीश ओलेग डेरिपास्का यांसारख्या दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. यादरम्यान इस्रायली अभिनेत्री व मॉडेल ओर्ली वेनरमन हिच्याशी त्यांचे नाव जोडले गेले होते. मात्र, २०२१ मध्ये एका मुलाखतीत सैफ यांनी अभिनेत्रीशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते.
२०११ मध्ये सैफ यांच्या वडिलांची हत्या
२०११ साली मुअम्मर गद्दाफी यांच्या राजवटीविरोधात लिबियामध्ये मोठा उठाव झाला. त्यानंतर सैफ यांच्या प्रतिमेलाही मोठा तडा गेल्याचे पाहायला मिळाले. आंदोलनांना हिंसक वळण लागल्यावर सैफ यांनी आपल्या वडिलांच्या राजवटीची बाजू घेत पाश्चात्त्य जगाशी असलेले संबंध तोडले. त्यांनी बंडखोरांना ‘उंदीर’ अशी उपमा देत गद्दाफी यांची सत्ता गेल्यास संपूर्ण लिबिया उद्ध्वस्त होईल, असा इशारा दिला. ऑक्टोबर २०११ मध्ये मुअम्मर गद्दाफी यांची हत्या झाल्यानंतर सैफ यांनी वेशांतर करून शेजारील देश नायजरमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एका विशिष्ट समुदायातील लोकांचा वेश परिधान केला होता; परंतु एका व्यक्तीने दिलेल्या माहितीमुळे बंडखोरांनी त्यांना पकडले. या अटकेनंतर सैफ यांचा आलिशान प्रवास संपला आणि तिथून त्यांच्या आयुष्यातील प्रदीर्घ तुरुंगवासाचा काळ सुरू झाला.
अंधाऱ्या कोठडीतील सहा वर्षे
आलिशान जीवन जगणाऱ्या सैफ गद्दाफी यांना झिंतनमधील एका तुरुंगातील अंधाऱ्या कोठडीत तब्बल सहा वर्षे काढावी लागली. या काळात त्यांचे बाह्य जगाशी असलेले सर्व संबंध तुटले होते. २०१५ मध्ये त्रिपोली येथील न्यायालयाने २०११ च्या उठावादरम्यान केलेल्या युद्धगुन्ह्यांसाठी सैफ यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने ‘मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी’ त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. जून २०१७ मध्ये लिबियातील एका प्रतिस्पर्धी प्रशासनाने सैफ यांना सार्वजनिक माफी देऊन, त्यांची तुरुंगातून सुटका केली. सुटकेनंतरही हत्येच्या भीतीने ते बऱ्याच काळ सार्वजनिक जीवनापासून दूर होते. या काळात त्यांनी विविध नेत्यांशी पुन्हा संपर्क वाढवण्यास सुरुवात केली. लिबियातील ‘मशाशिया’ टोळी आणि झिंतन ब्रिगेडच्या सैनिकांनी सैफ यांना संरक्षण दिले होते.
हेही वाचा : ३१ ऑगस्टची ‘ती’ थरारक रात्र आणि चिनी रणगाड्यांची घुसखोरी; जनरल नरवणे यांच्या पुस्तकात नेमका उल्लेख काय?
निवडणूक लढवण्यास होती मनाई
नोव्हेंबर २०२१ मध्ये सैफ यांनी अचानक राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. २०११ नंतर लिबियात आलेल्या अस्थिरतेला कंटाळलेल्या मतदारांना त्यांनी साद घातली. यादरम्यान सैफ यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच राजकीय गटांमध्ये आणि त्यांच्या वडिलांच्या राजवटीविरोधात लढलेल्या सशस्त्र संघटनांमध्ये तीव्र संताप उसळला. त्यानंतर २०१५ च्या दोषसिद्धीच्या आधारे लिबियाच्या उच्च निवडणूक आयोगाने त्यांची उमेदवारी रद्द केली. या निर्णयाविरोधात त्यांनी अपील करण्याचा प्रयत्न केला होता; पण सशस्त्र सैनिकांनी न्यायालयाचा रस्ताच रोखून धरला. त्यामुळे लिबियातील संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच कोलमडली होती.
सैफ यांच्या आयुष्याचा रक्तरंजित शेवट
निवडणूक प्रक्रियेत भाग घेण्यात अपयशी ठरल्यानंतर सैफ अनेक वर्षे सार्वजनिक जीवनापासून दूर होते. झिंतानजवळील एका साध्या निवासस्थानी ते राहत असल्याचे सांगितले जाते. सत्तेपासून दूर गेल्यानंतरही त्यांच्याकडे कोट्यवधींची आर्थिक साधनसंपत्ती असल्याचे अहवालातून समोर आले आहे. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेली सैफ यांची निर्घृण हत्या ही लिबियाच्या इतिहासातील एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि वादग्रस्त राजकीय व्यक्तिमत्त्वाचा अंत ठरली आहे. एकेकाळी लिबियाचे भविष्य मानला जाणारा हा वारसदार अखेर रक्तरंजित संघर्षाचाच बळी ठरला आहे. लिबियाच्या मुख्य सरकारी वकिलांच्या कार्यालयाने मंगळवारी सैफ गद्दाफी यांची झिंतान शहरात हत्या झाल्याची अधिकृत माहिती दिली आहे.
आणखी वाचा : भारतीय बाजारपेठेत अमेरिकेची कृषी उत्पादने, व्यापार करार नसतानाही आवक कशी वाढली ?
सैफ यांची हत्या कशी झाली?
सरकारी वकिलांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात प्राथमिक तपासात सैफ यांना गोळ्या लागल्याचे सांगण्यात आले. मात्र, हल्ला नेमका कसा झाला याची सविस्तर माहिती तत्काळ देण्यात आलेली नाही. सध्या या प्रकरणातील आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबवली जात असल्याचेही कार्यालयाने स्पष्ट केले. सैफ गद्दाफी यांच्या राजकीय सहकाऱ्यांनी स्वतंत्र निवेदन जारी करत त्यांच्या हत्येबाबत तपशील सादर केला आहे. मुखवटा घातलेले चार हल्लेखोर सैफ यांच्या निवासस्थानी शिरले आणि त्यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली, असे या निवेदनात म्हटले आहे. सैफ अल-इस्लाम यांनी हल्लेखोरांचा सामना करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या घरातील सीसीटीव्ही प्रणाली बंद करून त्यांची हत्या केल्याचे निवेदनात नमूद आहे.

