Iranian Wrestler Executed : मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडाला असतानाच इराणमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. १९ वर्षीय कुस्तीपटू सालेह मोहम्मदी याच्यासह दोन तरुणांना इराणमध्ये फाशी देण्यात आली आहे. या घटनेमुळे क्रीडा विश्वासह संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली आहे. सालेह याला देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेचा मानवाधिकार संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. जानेवारीत झालेल्या हिंसक आंदोलनानंतर इराणमध्ये अधिकृतपणे फाशी देण्याची ही पहिलीच कारवाई आहे. या पार्श्वभूमीवर कोण होता सालेह मोहम्मदी? त्याच्यावर नेमके काय आरोप होते? त्याविषयीचा हा आढावा…

कोण होता सालेह मोहम्मदी?

सालेह मोहम्मदी हा इराणमधील कुस्ती क्षेत्रातील उदयोन्मुख खेळाडू म्हणून ओळखला जात होता. देशांतर्गत स्पर्धांमध्ये सातत्याने छाप पाडल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपले वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली होती. सप्टेंबर २०२४ मध्ये रशियातील क्रास्नोयार्स्क येथे झालेल्या ‘Saitiev International Cup’ या स्पर्धेत सालेहने इराणसाठी कास्यपदक जिंकले होते. फाशीची शिक्षा देण्यात आल्यानंतर त्याचे समाजमाध्यमांवर अनेक जुने व्हिडीओ व्हायरल झाले. या व्हिडीओत तो कुस्तीच्या मैदानात आपल्या प्रतिस्पर्ध्यांना चितपट करताना दिसून आला. त्याची खेळाप्रति असलेली निष्ठा पाहून समाजमाध्यमांवर भावूक प्रतिक्रिया उमटल्या.

जानेवारीमध्ये झाली होती अटक

जानेवारी महिन्यात इराणमध्ये उसळलेल्या हिंसक आंदोलनादरम्यान सालेह मोहम्मदीला कोम शहरातून ताब्यात घेण्यात आले होते. डिसेंबर २०२५ च्या शेवटी इराणवर भीषण आर्थिक संकट ओढवले होते. देशाच्या चलनाचे मूल्य कोसळल्यामुळे महागाईचा दर ४० टक्क्यांवर पोहोचला होता. त्यावेळी इराणमध्ये अन्नपदार्थांच्या किमतींत तब्बल ७२ टक्के वाढ झाली होती. या आर्थिक असंतोषाचे रूपांतर लवकरच सरकारविरोधी निदर्शनांमध्ये झाले. ८ जानेवारी रोजी कोम शहरात आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये हिंसक चकमक झाली. १९७९ च्या इराण क्रांतीनंतरचे हे सर्वांत भीषण दडपशाहीचे सत्र मानले जात होते. त्याच रात्री पोलिसांनी अनेक आंदोलकांना अटक केली. त्यामध्ये सालेह मोहम्मदी याच्यासह त्याचे दोन मित्र मेहदी घासेमी व सईद दाऊदी समावेश होता.

आणखी वाचा : पाकिस्तानवर मोठे संकट; प्रजासत्ताक दिनाची परेड तातडीने रद्द, कारण काय?

सालेह मोहम्मदीवर कोणते आरोप होते?

इराणच्या सरकारी वकिलांनी सालेह मोहम्मदी व त्याच्या मित्रांवर दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्येचा आरोप केला होता. सरकारी दाव्यानुसार, या चकमकीत अधिकाऱ्यांवर चाकू आणि तलवारीने हल्ला करण्यात आला होता. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी घेताना तिघांनाही ‘मोहरेबेह’ म्हणजेच अल्लाहविरोधात शत्रुत्व पुकारल्याचा गुन्हा निश्चित केला. आरोपींनी अमेरिका आणि इस्रायलसारख्या परकीय शक्तींच्या सांगण्यावरून देशाविरोधात कृत्य केल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. इराणच्या कायद्यानुसार हा एक फाशीच्या शिक्षेस पात्र असलेला गुन्हा आहे. ऐतिहासिकदृष्ट्या या गुन्ह्याचा वापर सशस्त्र बंडासाठी केला जात होता; पण आता आंदोलकांना लक्ष्य करण्यासाठी त्याचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. इराणमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी सालेह मोहम्मदी व त्याच्या मित्रांना दिलेली फाशी योग्य असल्याचे म्हटले आहे.

कुस्तीपटूची फाशी संशयाच्या भोवऱ्यात

सालेह मोहम्मदीविरुद्धच्या खटल्याच्या विश्वासार्हतेवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मानवाधिकार संघटनांनी या प्रकरणातील कायदेशीर त्रुटींकडे जगाचे लक्ष वेधले आहे. न्यायालयीन नोंदीनुसार, इराणमधील हिंसाचारात दोन पोलीस अधिकाऱ्यांवर चाकूने सपासप वार करण्यात आले होते. मात्र, उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सालेह मोहम्मदी घटनास्थळी असल्याचे स्पष्टपणे दिसत नव्हते. हिंसाचार सुरू असताना सालेह मोहम्मदी घटनास्थळावर नव्हता, असा दावा त्याचे कुटुंबीय, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांनी केला होता. खुद्द मोहम्मदीनेही न्यायालयात आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. तरीदेखील त्याला फाशी देण्यात आल्याने मानवाधिकार संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

अमेरिकेन दिला होता इराणला इशारा

मोहम्मदी आणि इतरांना दिलेली मृत्युदंडाची शिक्षा हा अन्यायी खटल्याचा परिणाम आहे, जो पूर्णपणे छळ करून मिळवलेल्या कबुलीजबाबावर आधारित होता, असा आरोप मानवधिकार संघटनांनी केला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटले असून, अनेकांनी इराण सरकारचा निषेध केला आहे. मोहम्मदीला फाशी देण्यापूर्वीच अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांनी इराणला गंभीर इशारा दिला होता. जानेवारीमध्येच अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने १९ वर्षीय कुस्तीपटूच्या फाशीच्या शिक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. इराणची राजवट आपल्या तरुणांची कत्तल करून देशाचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे. आम्ही त्यांना मोहम्मदी आणि इतर आंदोलकांची फाशी त्वरित थांबवण्याचे आवाहन करतो, असे आवाहन अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने केले होते. तरीदेखील इराणने मोहम्मदीला फाशी दिल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा : इराण युद्धावरून ट्रम्प प्रशासनात वादाची ठिगणी; वरिष्ठ अधिकाऱ्याने तडकाफडकी राजीनामा का दिला?

मोहम्मदीची फाशी इराणसाठी कोणते संकेत देते?

मध्यपूर्वेत संघर्षाचा वणवा पेटला असताना सालेह मोहम्मदीला देण्यात आलेल्या फाशीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका व इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये सत्तेच्या संक्रमणाचा काळ सुरू आहे. यादरम्यान अंतर्गत बंडाळी मोडून काढण्यासाठी आणि देशावर आपली पकड घट्ट करण्यासाठी इराणची राजवट अधिक आक्रमक पावले उचलत असल्याचे या फाशीतून दिसून येत आहे. डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर इराण सरकारने हजारो लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यांना ‘मोहरेबेह’ या गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली जात आहे. सालेह मोहम्मदीच्या प्रकरणाची तुलना २०२० मध्ये फाशी देण्यात आलेल्या नवीद अफकारी या कुस्तीपटूशी केली जात आहे. खेळाडू हे देशाचे प्रतिनिधी मानले जातात, त्यामुळे त्यांना लक्ष्य करून इराण सरकार आपल्याच देशात दहशत माजवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मानवाधिकार तज्ज्ञांचे मत आहे.