PM Narendra Modi Inaugurates Samprati Museum: अशोकाने बौद्ध धर्माचा भारताबाहेरही प्रसार केला हा इतिहास सर्वश्रृत आहे. परंतु, त्याच्या नातवाने जैन धर्माच्या प्रसारासाठी नेमकी कोणती महत्त्वाची भूमिका बजावली याबद्दल क्वचितच माहीत असते. अलीकडेच (३१ मार्च रोजी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महावीर जयंतीच्या निमित्ताने गांधीनगरमधील कोबा येथे सम्राट संप्रती संग्रहालयाचे उद्घाटन केले. हे संग्रहालय अशोकाचा नातू संप्रती याच्या कार्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ तयार करण्यात आले आहे. मौर्य सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपले मोलाचे योगदान दिले. तर, त्याचा नातू म्हणजेच सम्राट संप्रती हा जैन धर्माच्या राजश्रयासाठी ओळखला जातो.
अशोकाच्या बौद्ध वारशापलीकडे…
इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात मौर्य साम्राज्याचा उदय आणि त्याचा विस्तार झाला, त्याची साम्राज्याची भव्यता आणि प्रशासकीय व्यवस्था याबद्दल अनेक गोष्टी ज्ञात आहेत. सुमारे इ.स.पूर्व २६९ ते २३२ दरम्यान राज्य करणाऱ्या सम्राट अशोकाला साम्राज्य विस्ताराचे आणि नंतर बौद्ध मूल्यांवर आधारित नैतिक चौकट निर्माण केल्याचे श्रेय दिले जाते. इसवी सन पूर्व ३ र्या शतकात मौर्य साम्राज्याचा उदय झाला. त्यानंतर या साम्राज्याने प्रशासन, कला आणि संस्कृती अशा सर्वच क्षेत्रात आपली महत्त्वाची छाप उमटवली.
प्रथमच एकछत्री अंमल
मौर्यांनी प्रथमच एकछत्री अंमल प्रस्थापित केला. John E. Cort यांनी त्यांच्या Framing the Jina: Narratives of Icons and Idols in Jain History (२०१०) या पुस्तकात म्हटले आहे की, “मौर्यांनी नैतिक राजसत्तेचा असा एक आदर्श निर्माण केला, जो आजही आग्नेय आशियातील बौद्ध धार्मिक आणि राजकीय कल्पनांमध्ये टिकून आहे.” बौद्ध धर्माचे अनेक अनुयायी आजही उत्तर भारताच्या सीमेपलीकडे बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या प्रसाराचे श्रेय सम्राट अशोकालाच देतात.
सम्राट अशोकाची पहिली पत्नी जैन होती
परंतु, मौर्यांच्या काळात बौद्ध धर्माला अधिक महत्त्व प्राप्त झाले, तरी जैन धर्मही तेवढाच महत्त्वाचा होता. Michael C. Howard यांनी Transnationalism in Ancient and Medieval Societies (२०१२) मध्ये नमूद केले आहे की, “अशोकाच्या पत्नी प्रामुख्याने बौद्ध होत्या, परंतु त्यांची पहिली पत्नी पद्मावती जैन होती.”
जैन परंपरेतील मौर्यांचा प्रभाव
जैन परंपरेतील आणखी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. त्यांनी जैन धर्म स्वीकारला होता. John E. Cort लिहितात की, “दिगंबर पंथाचा अभ्यास करणार्या इतिहासकारांच्या मते त्यांनी मोठ्या दुष्काळापासून बचाव करण्यासाठी दक्षिणेकडे स्थलांतर केले आणि अखेरीस सध्याच्या कर्नाटकातील श्रवण बेळगोळ या पवित्र स्थळी ध्यान करताना देह ठेवला.” चंद्रगुप्त मौर्य यांना दिगंबर जैन परंपरेत मोठा मान दिला जातो. मात्र, श्वेतांबर परंपरेसाठी मौर्य वंशातील केंद्रस्थानी असलेली व्यक्ती म्हणजे अशोकाचा नातू आणि उत्तराधिकारी संप्रती, असे कॉर्ट नमूद करतात. इ.स.पूर्व २३२ मध्ये अशोकाच्या मृत्यूनंतर त्याच्या अनेक मुलांनी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला, असे सांगितले जाते; मात्र उत्तराधिकाराबाबत ऐतिहासिक स्रोतांमध्ये एकमत आढळत नाही.

संप्रती: अशोकाचा जैन समकक्ष
- Colleen Taylor Sen यांनी Ashoka and the Maurya Dynasty (2022) मध्येही म्हटले आहे की, अशोकाचे नातू दशरथ मौर्य आणि संप्रतीमध्ये मौर्य साम्राज्य विभागले गेले होते, असे मानले जाते.
- संप्रती हा कुणाल याचा मुलगा होता. विशेषतः जैन ग्रंथांमध्ये त्याचे वर्णन जैन धर्माचा निष्ठावान अनुयायी म्हणून केले जाते. त्याने भारतीय उपखंडात जिनांच्या मूर्तींचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, अशी नोंद ग्रंथांमध्ये आढळते.
- संप्रतीने अंदाजे इ.स.पूर्व २३० ते २२० दरम्यान राज्य केले, असे मानले जाते. John E. Cort यांनी म्हटले आहे की, “संप्रतीची कथा प्रथम श्वेतांबर ग्रंथांमध्ये संन्यासी आचारसंहितेच्या संदर्भात दिसून येते”
- काळानुरूप त्याची परंपरा अधिक दृढ झाली आणि त्याच्यावर पूर्णपणे आधारित अनेक अनामिक व कालविरहित मध्ययुगीन ग्रंथ रचले गेले. ४६१ श्लोकांचा संस्कृत ग्रंथ संप्रती नृप चरित्र हा त्यात विशेष प्रसिद्ध आहे.
- काही परंपरांनुसार संप्रती जन्मतःच जैन होता, परंतु बहुतांश कथांमध्ये त्याच्या धर्मांतरावर भर दिला जातो. असे मानले जाते की, महावीर यांनी स्थापन केलेल्या जैन संघाचे आठवे प्रमुख असलेले भिक्षू सुहस्तिन यांच्या प्रभावाखाली त्याने जैन धर्म स्वीकारला. त्यांची भेट उज्जैन येथे झाली, असे सांगितले जाते.
- कॉर्ट लिहितात की, “राजाने सुहस्तिन यांना आपला गुरु मानले आणि जैन श्रावक म्हणून आचार-विचार स्वीकारले, यात दररोज मूर्तीपूजेचा समावेश होता.” जैन धर्माच्या प्रसारासाठी त्याने केलेले कार्य हे वैयक्तिक आणि प्रादेशिक प्रभावांमुळे घडले असावे, असे अभ्यासक मानतात.
उत्तराधिकारी आणि धार्मिक बदल
अशोकाच्या उत्तराधिकाऱ्यांकडे त्याच्यासारखी दूरदृष्टी नसल्याचा आरोप अनेकदा केला जातो, विशेषतः ‘धम्म’ समजण्याच्या बाबतीत. H. C. Raychaudhuri यांनी म्हटले आहे की, अशोकाने आक्रमक सैनिकी धोरणाचा त्याग केल्यामुळे साम्राज्याची लष्करी क्षमता कमी झाली. तसेच, बौद्ध धर्म आणि इतर परंपरांना दिलेल्या पाठिंब्यामुळे, यज्ञांवरील बंदीसारख्या निर्णयांमुळे ब्राह्मण गटांमध्ये निर्माण झालेली नाराजीही त्याच्या उत्तराधिकाऱ्यांना बौद्ध धर्मापासून दूर जाण्यास प्रवृत्त करणारी ठरली असावी. धर्मांतरानंतर संप्रती याला जैन धर्माचा सक्रिय प्रसार करण्याचे श्रेय दिले जाते. त्यांनी भिक्षूंना (जैन मुनींना) दूरच्या प्रदेशात पाठवण्याची व्यवस्था केली, हजारो मंदिरे बांधली व जीर्णोद्धार केले, तसेच असंख्य मूर्तींची स्थापना केली.
जैन धर्माचा प्रसार चीन, बर्मा (सध्याचे म्यानमार), अफगाणिस्तान, नेपाळ आणि भूतानपर्यंत केला तसेच आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, सौराष्ट्र, गुजरात, माळवा आणि राजपुताना या प्रदेशांमध्ये हा धर्म अधिक बळकट केला असे काही अभ्यासक मानतात. जैन धर्माचा प्रसार मध्य आशिया, अरबी द्वीपकल्प आणि पश्चिम आशियातील काही भागांत केल्याचे श्रेयही संप्रती यालाच दिले जाते. या वर्णनांमध्ये अशोकाच्या बौद्ध धर्मप्रसाराच्या कथांशी लक्षणीय साम्य दिसते. John E. Cort लिहितात; “जसे अशोकाने फक्त बौद्ध शिकवणींचा प्रसार केला नाही, तर त्या प्रदेशांमध्ये स्तूपांच्या रूपाने बौद्ध धार्मिक संस्कृतीही रुजवली, तसेच संप्रतीने फक्त धर्मप्रचारक पाठवले नाहीत, तर मंदिरे बांधली आणि मूर्तींची स्थापना केली”
संप्रतीची धार्मिक परंपरा आणि वारसा
संप्रतीच्या कृतींमागे राजकीय हेतूंपेक्षा धार्मिक निष्ठेची प्रेरणा अधिक असल्याचे मानले जाते. सुहस्तिन यांचे निष्ठावान अनुयायी म्हणून संप्रती याची जैन धर्माबरोबर सखोल बांधिलकी होती, असे मानले जाते. John E. Cort यांच्या मते; “अज्ञान असलेल्या परकीय प्रदेशांमध्ये भिक्षूंना प्रवास करण्यास सक्षम करणारा संप्रतीच होता आणि त्याच प्रदेशांमध्ये मंदिर व मूर्तींच्या धार्मिक परंपरेचा प्रसार करून त्या लोकांना पूर्णपणे जैन करण्याचे कार्यही संप्रतीनेच केले” परंपरेनुसार, संप्रतीने १,२५,००० नवीन मंदिरे बांधली, ३६,००० जुन्या मंदिरांचे जीर्णोद्धार केले, १,२५,००,००० दगडी आणि ९५,००० धातूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली, तसेच गरिबांसाठी ७०० धर्मादाय केंद्रांची स्थापना केली (ही संख्या ऐतिहासिक पुराव्यांपेक्षा धार्मिक श्रद्धेचा किंवा परंपरेचा भाग अधिक असल्याचे मत अभ्यासक व्यक्त करतात).
आजही पश्चिम भारतातील जैन समाज प्राचीन मंदिरे (ज्यांच्याबाबत ठोस शिलालेख किंवा लिखित पुरावे नाहीत) संप्रतीने बांधल्याचे मानतात. तसेच, दाते किंवा नोंदी नसलेल्या प्राचीन मूर्तींची स्थापना देखील त्याच्याशी जोडली जाते. कॉर्ट लिहित; “संप्रती आणि त्याची मंदिरं आणि मूर्ती यांना पश्चिम भारतातील जैन इतिहासात अशोकाप्रमाणे स्थान प्राप्त झाले आहे.”
