Ayatollah Ali Khamenei Funeral Updates : २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. या घटनेला तब्बल चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे. खामेनी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी जगभरातील लाखो शोकाकुल इराणमध्ये दाखल झाल्याचे वृत्त आहे. इराणमधील मशहद शहरातील ‘इमाम रेझा’ यांच्या दर्ग्याजवळ येत्या ९ जुलैला खामेनी यांच्या पार्थिवाचे दफन केले जाणार आहे. यादरम्यान खामेनी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कर्नाटकातील एका छोट्याशा गावातून जवळपास १०० नागरिक इराणला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे इराणचे या गावाशी नेमके काय कनेक्शन आहे?असा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे, त्याविषयी…

कर्नाटकातील चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील अलीपुरा या छोट्याशा गावातील सुमारे १०० जण मंगळवारी इराणमध्ये दाखल झाले. साधारण: दुपारच्या सुमारास त्यांनी जाहीर शोकसभेत शांतपणे हजेरी लावली आणि अयातुल्ला अली खामेनी यांच्या पार्थवाचे दर्शन घेतले. अलीपुरा हे मुस्लीमबहुल असून, येथील नागरिकांचे खामेनी यांच्याशी विशेष भावनिक आणि धार्मिक नाते असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हे गाव भारत आणि इराणमधील भावनिक संबंधांचे एक अनोखे प्रतीक बनले आहे. याबाबत इंडो-इराण चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सय्यद हकीम रझा यांनी द हिंदूला सांगितले की, खामेनी यांच्या अंत्यविधीला उपस्थित असलेल्या या १०० नागरिकांपैकी बहुतांश जण आधीपासूनच इराणमध्ये वास्तव्यास आहे. त्यापैकी काहीजण धार्मिक अभ्यासक, वैद्यकीय विद्यार्थी, डॉक्टर आणि व्यावसायिक म्हणून काम करत आहेत. ५ जुलै रोजी या सर्व जणांनी शोकसभेत सहभागी होण्यासाठी बेंगळुरू येथून मुंबईमार्ग इराणला जाण्यासाठी चार्टड विमानाने प्रवास केला आणि खामेनी यांच्या पार्थिवाचे दर्शन अंतिम घेतले.

अलीपुरा येथील रहिवासी फैजान रझा यांनी इराणच्या स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितले की, “खामेनी हे आम्हाला आमच्या वडिलांपेक्षाही अधिक प्रिय होते. त्यांच्या हौतात्म्याने आमची मने आणि आत्मा हादरून गेला आहे. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहणे आमच्यासाठी आवश्यक होते. त्यामुळे मी अलीपुराहून इराणला आलो आहे. अलीपुरा गावाचा खामेनी यांच्याशी असलेला हा भावनिक संबंध १९८१-८२ या काळात सुरू झाला. त्यावेळी इराणच्या सर्वोच्च नेत्याने या गावाला भेट दिली होती. कर्नाटकाशी त्यांचे हे नाते फारसे परिचित नसले तरी अलीपूर येथील नागरिकांसाठी ते अत्यंत महत्त्वाचे होते. १९८० च्या दशकात खामेनी यांनी शिया मुस्लीम बहुसंख्य असलेल्या अलीपुरा गावाला भेट दिली होती. त्यावेळी इराण सरकारच्या मदतीने उभारण्यात आलेल्या इमाम खोमेनी रुग्णालयाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. या घटनेनंतर गावकऱ्यांचे त्यांच्याशी असलेले नाते अधिकच घट्ट झाले. त्यांच्या या भेटीची आठवण आजही अनेक गावकऱ्यांच्या मनात आहे.

अलीपुरामधील रहिवासी शफीक आबिदी म्हणाले की, अयातुल्ला खामेनी हे आमचे आध्यात्मिक मार्गदर्शक होते. त्यांनी सुरू केलेले रुग्णालय हे गावावरील त्यांच्या प्रेमाचे प्रतीक आहे. आज अलीपुरात असे एकही घर असे नाही, जिथे त्यांच्या स्मरणार्थ दिवा लावण्यात आलेला नाही. आम्हाला असे वाटत आहे की, आम्ही आमच्या स्वतःच्या कुटुंबाचा प्रमुख गमावला आहे. दरम्यान, अयातुल्ला अली खामेनी यांचे भारताशी संबंध केवळ कर्नाटकापुरते मर्यादित नव्हते. त्यांचे जम्मू-काश्मीरमधील नागरिकांशीही ऐतिहासिक नाते असल्याचे विविध नोंदींमध्ये नमूद करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, १९८१ मध्ये खामेनी यांनी श्रीनगरला पहिल्यांदा भेट दिली होती आणि अनेक सभांना संबोधित केले होते. ही भेट काश्मीर खोऱ्यात शिया आणि सुन्नी समाजामधील सांप्रदायिक तणावाच्या काळात झाली होती. या दौऱ्यात खामेनी यांनी श्रीनगरमधील एका सुन्नी मशिदीत मीरवाइज मौलवी फारूक यांच्यासोबत शुक्रवारी नमाज अदा केली आणि त्यानंतर सुमारे १५ मिनिटांचे भाषण केले होते, असे काश्मिरी कार्यकर्ते कल्बी हुसेन रिजवी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात नमूद केले आहे.

रिजवी यांनी आपल्या आत्मचरित्रात असाही दावा केला की, अयातुल्ला अली खामेनी यांच्या या दौऱ्यामुळे काश्मीरमधील शिया आणि सुन्नी समाजातील दीर्घकाळचा तणाव कमी होण्यास मदत झाली. त्यानंतर दोन्ही पंथांतील लोक एकमेकांच्या मशिदींमध्ये जाऊन नमाज अदा करू लागले आणि परस्परांतील दुरावा कमी झाला. खामेनी यांचे पूर्वज व १९७९ च्या इराणी इस्लामिक क्रांतीचे नेते अयातुल्ला खोमेनी यांचे उत्तर प्रदेशशी भावनिक नाते होते. त्यांचे आजोबा सय्यद अहमद मुसवी हिंदी यांच्या आध्यात्मिक परंपरेचा प्रभाव खोमेनी यांच्यावर होता. सय्यद अहमद यांनी भारतातून इराणमध्ये स्थलांतर केले होते. त्यांच्या या स्थलांतराचा इराणच्या धार्मिक आणि राजकीय इतिहासावर दीर्घकालीन प्रभाव पडला. पुढे अयातुल्ला खोमेनी हे इराणचे पहिले सर्वोच्च नेते बनले आणि त्यांनी इराणला धर्माधिष्ठित राष्ट्राच्या स्वरूपात घडवले.

बीबीसीचे पत्रकार बाकेर मोईन यांच्या माहितीनुसार, सय्यद अहमद यांनी आपल्या भारतीय मूळाची ओळख कायम ठेवण्यासाठी आपल्या नावामागे ‘हिंदी’ हे उपनाम लावले होते. अहमद यांनी १८३० मध्ये उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्हा सोडला होता. त्यापूर्वी १७०० च्या दशकात त्यांचे वडील ‘दिन अली शाह’ यांनी मध्य इराणमधून भारतात स्थलांतर केले होते. १८०० च्या दशकात जन्मलेले अहमद हे लखनऊपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या बाराबंकीजवळ लहानाचे मोठे झाले. त्या काळात भारतात मुघल साम्राज्याचा अस्त होऊन ब्रिटिशांची सत्ता आली होती. त्यावेळी अनेक इस्लामिक विद्वानांप्रमाणेच सय्यद अहमद यांचाही असा विश्वास होता की, इस्लामचे पुनरुज्जीवन होणे आवश्यक असून मुस्लिमांनी समाजात आपले स्थान पुन्हा मिळवले पाहिजे. दरम्यान, खामेनी यांच्या अंत्यविधीत सहभागी झालेल्या इराणी नागरिकांनी “अमेरिका मुर्दाबाद”, “इस्रायलचा विनाश असो” आणि “ट्रम्प-नेतान्याहू यांना संपवा” अशा घोषणा दिल्याचे समोर आले. या गर्दीतील लोकांच्या हातात इराणचे राष्ट्रध्वज, खामेनी यांचे फोटो आणि सूडाचे प्रतीक मानले जाणारे लाल रंगाचे झेंडे पाहायला मिळाले. या कृतीमुळे पश्चिम आशियातील संघर्षाला पुन्हा खतपाणी मिळू शकते, अशी भीती विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.