Role of Gujarati traders in 1622 Hormuz War: आज होर्मुझ पुन्हा एकदा इराणसाठी संघर्षाचे मुख्य केंद्र ठरले आहे. अमेरिकेच्या आरमारी नाकेबंदीमुळे गेल्या अनेक दशकांपासून अपेक्षित असलेली संधी अमेरिकेकडे चालून आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. होर्मुझचा हा रणसंग्राम नवा नसून, इतिहासातही हे बंदर अशाच प्रकारे अनेक युद्धांच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसून येते.

होर्मुझचे आदिम ते अर्वाचीन महत्त्व

होर्मुझची सामुद्रीधुनी ही पर्शियन आखात आणि ओमानचे आखात (पर्यायाने अरबी समुद्र) यांना जोडणारा महत्त्वाच्या मार्ग आहे. प्राचीन काळी मेसोपोटेमिया (इराक), पर्शिया (इराण) आणि सिंधू संस्कृती (भारत) यांच्यातील सागरी व्यापाराचा हा मुख्य दुवा होता. या सामुद्रधुनीवर ताबा म्हणजे संपूर्ण आखाती देशांच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग होता. मध्ययुगीन काळात भारत आणि आग्नेय आशियातून येणारे मसाल्याचे पदार्थ आणि चीनमधून येणारे रेशीम हे याच मार्गाने युरोप आणि आफ्रिकेकडे जात असे.

The city and fortress of Hormuz in the 16th century, (Wikipedia)

म्हणून पोर्तुगीजांनी होर्मुझवर ताबा मिळवला

या मार्गावरील व्यापारातून मिळणाऱ्या जकातीमुळे (Taxes) इराणमधील साम्राज्ये आणि स्थानिक सत्ताधीश प्रचंड श्रीमंत झाले होते. भारताच्या लष्करी इतिहासात होर्मुझचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मध्ययुगीन भारतातील विजयनगर साम्राज्य असो, वा दिल्लीची सल्तनत, युद्धासाठी लागणारे उत्तम प्रतीचे इराणी आणि अरबी घोडे याच सामुद्रधुनीतून जहाजांद्वारे भारतात आणले जात होते. या व्यापारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोर्तुगीजांनी १५ व्या शतकात होर्मुझवर ताबा मिळवला होता.

होर्मुझ जगाच्या व्यापाराची किल्ली

होर्मुझची सामुद्रधुनी अत्यंत अरुंद आहे (काही ठिकाणी फक्त ३३ किमी रुंद). त्यामुळे येथून जाणाऱ्या जहाजांवर लक्ष ठेवणे किंवा त्यांना रोखणे सोपे असते. प्राचीन काळातील सफाविद साम्राज्य असो किंवा नंतरचे ब्रिटीश, सर्वांनीच या मार्गावर आपले नौदल तैनात करून जगाच्या व्यापाराची ‘किल्ली’ आपल्या हातात ठेवली होती. प्राचीन काळी जे महत्त्व ‘मसाले आणि घोड्यांच्या’ व्यापाराला होते, तेच महत्त्व आज ‘तेल आणि गॅस’ यांना आहे. म्हणूनच होर्मुझची सामुद्रधुनी हा आजही जगातील सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा व्यापारी नाका (Strategic Chokepoint) आहे.

१६२२ साली झाले होते होर्मुझसाठी युद्ध

१६२२ सालातील होर्मुजचे युद्ध ही जागतिक व्यापार आणि इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. या काळात इराणचा शा ह अब्बास (प्रथम) आणि पोर्तुगीज यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला होता.

Portraits of Shah Abbas I by Bishandas (1615-1620)
बिशनदास यांनी काढलेल शाह अब्बासच चित्र, (१६१५–१६२०)

शाह अब्बास कोण होता?

शाह अब्बास (प्रथम) हा ‘शाह अब्बास द ग्रेट’ म्हणूनही ओळखला जातो. हा इराणच्या सफाविद (Safavid) राजवंशातील पाचवा आणि सर्वात शक्तिशाली राजा होता. त्याने १५८८ ते १६२९ या काळात राज्य केले. इराणच्या इतिहासात त्याचा कालखंड हा राजकीय, लष्करी आणि सांस्कृतिकदृष्ट्या ‘सुवर्णकाळ’ मानला जातो. शाह अब्बास हा एक अत्यंत मुत्सद्दी आणि दूरदृष्टी असलेला राजा होता. त्याने विखुरलेल्या इराणला एकत्र करून त्याला एक जागतिक महासत्ता म्हणून उभे केले. शाह अब्बासचे भारतातील मुघल सम्राट जहांगीर याच्याशी सुरुवातीला चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्यात पत्रांची देवाणघेवाण होत असे. मात्र, ‘कंदाहार’ (अफगाणिस्तान) या शहरावरून त्यांच्यात झालेल्या संघर्षांनंतर शाह अब्बासने १६२२ साली मुघलांकडून कंदाहार जिंकून घेतले.

Shah Abbas and Jahangir in embrace, circa 1618
शाह अब्बास आणि जहांगीर, १६१८

१६२२ मधील इराणची स्थिती आणि शाह अब्बासचे धोरण

शाह अब्बासच्या काळात सफाविद साम्राज्य आपल्या वैभवाच्या शिखरावर होते. मात्र, इराणच्या दक्षिणेकडील सागरी व्यापारावर पोर्तुगीजांचे वर्चस्व होते. पोर्तुगीजांनी होर्मुजवर ताबा मिळवून पर्शियन आखातातील (Persian Gulf) व्यापारावर पूर्ण नियंत्रण मिळवले होते. इराणला स्वतःचा सागरी व्यापार करण्यासाठी पोर्तुगीजांना कर द्यावा लागत असे. शाह अब्बासने आपल्या सैन्याच्या आधुनिकीकरणावर भर दिला, परंतु त्याच्याकडे प्रबळ आरमार (Navy) नव्हते. म्हणूनच शाह अब्बासने पोर्तुगीजांना हुसकावून लावण्यासाठी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या मदतीने एक रणनीति आखली. ब्रिटीशांनी त्यांना जहाजे पुरवली, तर शाहने जमिनीवरून लष्करी पाठबळ दिले. ‘तारीख-ए-आलम आरा-ए-अब्बासी’ (Tārīkh-e ‘Ālam-ārā-ye ‘Abbāsī) या समकालीन फारसी दरबारी ग्रंथातून शाह अब्बासचे आखातधोरण, पोर्तुगीजांविरुद्धची भूमिका आणि व्यापाराला दिलेले राजकीय महत्त्व समजते.

पोर्तुगीजांनी होर्मुज कसे ताब्यात घेतले? (१५०७ – १५१५)

पोर्तुगीजांनी १६२२ साली होर्मुज गमावले, पण त्यांनी ते (१५०७) १६ व्या शतकाच्या सुरुवातीला अत्यंत क्रूरपणे आणि नियोजित पद्धतीने ताब्यात घेतले होते. १५०७ साली अफोन्सो डी अल्बुकर्क (Afonso de Albuquerque) याने होर्मुजवर स्वारी केली. होर्मुज हे बेट भौगोलिकदृष्ट्या व्यापाराचे मुख्य केंद्र होते. अल्बुकर्ककडे केवळ ७ जहाजे आणि ४००-५०० सैनिक होते, तर होर्मुजच्या संरक्षणासाठी अनेक सैनिक होते. तरीही, पोर्तुगीजांकडे असलेल्या आधुनिक तोफा आणि जहाजांच्या शिस्तबद्ध रणनितिमुळे त्यांनी होर्मुजच्या आरमाराचा पराभव केला.

कर आणि मांडलिकत्व

सुरुवातीला पोर्तुगीजांनी तेथील स्थानिक राजाला त्यांचे मांडलिकत्व स्वीकारण्यास भाग पाडले आणि वार्षिक खंडणी (Tax) वसूल करण्यास सुरुवात केली. १५१५ मध्ये अल्बुकर्कने पुन्हा होर्मुजवर आक्रमण करून तेथे ‘अवर लेडी ऑफ कन्सेप्शन’ नावाचा मजबूत किल्ला बांधला. यामुळे पर्शियन आखातातून होणाऱ्या सर्व व्यापारावर पोर्तुगीजांची पकड घट्ट झाली.

१६२२ शाह अब्बास आणि ब्रिटीश यांची युती

परिणामी शाह अब्बासने ब्रिटीशांकडे मदत मागितली. पोर्तुगीजांनी पर्शियन आखातावर ताबा मिळवून ब्रिटीशांनाही व्यापार करण्यापासून रोखले होते. तर शाह अब्बासने ब्रिटीशांना स्पष्ट सांगितले होते की, जर त्यांना इराणमध्ये व्यापार करायचा असेल, तर त्यांना आधी होर्मुजच्या मोहिमेत लष्करी मदत करावी लागेल.

१६२२ मध्ये शाह अब्बासने इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीच्या नौदलाच्या साहाय्याने होर्मुजवरील पोर्तुगीज सत्ता संपवली. पर्शियन सैन्याने आणि इंग्रजी जहाजांनी मिळून होर्मुजच्या किल्ल्यावर वेढा घातला आणि १ मे १६२२ रोजी पोर्तुगीज गॅरिसनने शरणागती पत्करली. अशा रीतीने पोर्तुगीजांचे सुमारे ११५ वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आले. त्यानंतर शाह अब्बासने होर्मुजला प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून विकसित न करता मुख्य भूमीवरील गम्रू/ गोंब्रून या बंदराला महत्त्व दिले; पुढे हेच बंदर ‘बंदर अब्बास’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

१६२२ च्या होर्मुजच्या युद्धात भारताची भूमिका

त्या काळातील पर्शियन आखातातून होणार्‍या व्यापारात भारतीय, विशेषतः गुजराती व्यापाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. होर्मुजचे आर्थिक महत्त्व मोठ्या प्रमाणात भारताशी असलेल्या व्यापारावर अवलंबून होते. शाह अब्बास आणि पोर्तुगीज या दोघांनाही या व्यापारातून लाभ होत होता. १६२२ साली इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने प्रत्यक्ष लष्करी मदत मुख्यतः सुरत-केंद्रित सागरी जाळ्याच्या आधारे पर्शियनांना दिली. १६२०-२२ मधील ईस्ट इंडिया कंपनीच्या नोंदी आणि त्यावर आधारित संशोधनातून हे दिसते की, सुरत हे इंग्रजी-पर्शियन सहकार्याचे प्रमुख दुवाकेंद्र होते आणि होर्मुज मोहिमेच्या पार्श्वभूमीवर कंपनीचे व्यापारी व नौदलसंबंध इथूनच समन्वित होत होते.

होर्मुजमधील गुजराती व्यापाऱ्यांचे वर्चस्व

पोर्तुगीजांच्या ताब्यातील होर्मुज हे केवळ लष्करी तळ नव्हते, तर ते एक मोठे आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र होते. सोळाव्या शतकात तेथे गुजराती व्यापाऱ्यांचे, विशेषतः बनिया समुदायाचे, मोठी आणि प्रभावी अस्तित्त्व होते. सुरुवातीच्या काळात पोर्तुगीज स्थानिक बाजारपेठ, आशियाई व्यापारीजाळे आणि वित्तव्यवहारासाठी या व्यापाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून होते. पोर्तुगीजांनी लागू केलेल्या ‘कार्ताझ’ परवाना पद्धतीनंतरही गुजराती व्यापाऱ्यांनी व्यापार सुरू ठेवला. होर्मुजच्या कस्टम महसुलात भारतीय, विशेषतः गुजरातशी संबंधित व्यापाराचा मोठा वाटा होता. दियोगो द कुटोच्या Décadas da Ásia आणि त्यावर आधारलेल्या नंतरच्या अभ्यासांत होर्मुजमधील भारतीय/ बनिया व्यापाऱ्यांचे आर्थिक महत्त्व आणि पोर्तुगीज राज्यसत्तेचा त्यांच्याशी असलेला संबंध दिसतो.

शाह अब्बासला दिलेली गुप्त मदत

शाह अब्बास होर्मुज पोर्तुगीजांकडून परत मिळवण्याचे नियोजन करत असताना, त्याला केवळ लष्करी नव्हे तर व्यापारी आणि सागरी साहाय्याचीही गरज होती. त्या काळी पर्शियन आखातातील व्यापारी नेटवर्कमध्ये भारतीय, विशेषतः गुजराती व्यापारी सक्रिय होते आणि सुरतमार्गे इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीचेही या प्रदेशाशी संबंध जुळले होते. त्यामुळे या व्यापारी-जाळ्यांनी माहितीची देवाणघेवाण, संपर्क आणि व्यवहार-सुलभता यांत काही प्रमाणात भूमिका बजावली. मात्र भारतीय व्यापाऱ्यांनी शाह अब्बासला गुप्त लष्करी माहिती पुरवली आणि किल्ल्याच्या कमकुवत बाजूंबाबत निर्णायक गुप्तचर साहाय्य केले, असा ठोस निष्कर्ष काढण्यासाठी अधिक थेट पुरावे आवश्यक आहे.

पोर्तुगीजांच्या ‘कार्ताझ’ पद्धतीला विरोध

पोर्तुगीजांची ‘कार्ताझ’ पद्धती भारतीय व्यापाऱ्यांवर नियंत्रण आणणारी होती, परंतु गुजराती व्यापाऱ्यांनी व्यापार पूर्णपणे थांबवला नाही. त्यांनी पोर्तुगीज नियंत्रणाखालील होर्मुजबरोबरच गम्रूनसारख्या पर्यायी बंदरांकडेही वळण्यास सुरुवात केली. शाह अब्बासने मुख्य भूमीवरील बंदरांना प्रोत्साहन दिल्यामुळे आणि १६२२ नंतर बंदर अब्बासचे महत्त्व वाढल्यामुळे पोर्तुगीजांच्या आर्थिक वर्चस्वाला धक्का बसला. इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीला शाहकडून व्यापारसवलती मिळाल्या; भारतीय व्यापाऱ्यांनाही या बदलत्या परिस्थितीत नव्या बंदरांत संधी मिळाली. ऐतिहासिक नोंदीनुसार १६७० साली बंदर अब्बासमध्ये अंदाजे १४००-१५०० घरं होती, त्यापैकी तब्बल एक-तृतीयांश घरं भारतीय बनिया समाजाची होती.