residential building fire safety rules in india : दक्षिण दिल्लीत बुधवारी एका हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा होरपळून मृत्यू झाला. एका निवासी इमारतीत हॉटेल चालवले जात होते. एका अधिकृत अहवालानुसार, भारतात आगीच्या घटनांमध्ये होणारे दर दहापैकी सहा मृत्यू हे निवासी इमारतीत किंवा झोपडपट्टीत लागलेल्या आगीमुळे होतात. भारतातील शहरी भागांमध्ये अग्निसुरक्षेबाबत असलेल्या त्रुटी पुन्हा एकदा या घटनेमुळे चर्चेत आल्या आहेत. अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांकडे सर्रासपणे होणारे दुर्लक्ष व यंत्रणांच्या उदासिनतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, भारतात आगीच्या घटनांमध्ये होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण घटत आहे. परंतु, निवासी इमारतीत लागणाऱ्या आगीमुळे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

इमारतीशी संबंधित नियम, रचना आणि नियोजन यांकडे होणारे दुर्लक्ष हे निवासी व व्यावसायिक ठिकाणी लागणाऱ्या आगीचे प्रमुख कारण आहे. दिल्लीत दाट वस्ती असलेल्या भागात ज्या इमारतीला आग लागली ती इमारत निवासी कारणांसाठी बांधण्यात आली होती. कालांतराने त्यात हॉटेल सुरू करण्यात आले होते. तसेच त्या इमारतीचा विस्तार करण्यात आला होता. शहरी भागातील निवासी घरांमध्ये आग लागण्याची घटना का घडते? त्याची कारणे काय? याबाबत सविस्तर जाणून घेऊ.

आगीत होरपळून होणारे ६० टक्के मृत्यू निवासी इमारतींमध्ये

भारतात २०२४ मध्ये आगीच्या घटनांमध्ये झालेले दर दहापैकी सहा मृत्यू निवासी इमारत किंवा झोपडपट्ट्यांमध्ये लागलेल्या आगीत झाल्याचे समोर आले होते. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोने या संबंधित अहवाल सादर केला होता. बियाँड कार्लटॉन या बंगळुरूतील नॉन प्रोफिट संस्थेने भारतातील अग्निसुरक्षेविषयी तीव्र चिंता व्यक्त केली होती. २०२४ मध्ये देशात ५ हजार ८८८ आगीच्या घटना घडल्या होत्या. त्यांपैकी ३ हजार ५५५ घटना घरांमध्ये तसेच निवासी इमारतींमध्ये घडल्या होत्या. कमर्शियल इमारतींमध्ये लावले जाणारे स्मोक अलार्म, आपात्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याची सोय अनेक निवासी इमारतींमध्ये केली जात नाही. त्यामुळे निवासी इमारतींमध्ये आग लागण्याचे प्रमाण वाढते.

निवासी इमारतींचा व्यवसायासाठी वापर

दिल्लीतील अनेक भागांमध्ये निवासी इमारतींचे रूपांतर ‘बेड अँड ब्रेकफास्ट’ व्यवसायात करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी इमारतींशी संबंधित नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. दिल्लीत ज्या ‘फ्लॉरिश स्टेज बी अँड बी’ हॉटेलमध्ये आग लागली, त्या हॉटेलच्या मालकाने हॉटेलमधील रूम्सची संख्या सहावरून २६ पर्यंत वाढवली होती. “शहरांना अग्नी नियोजनाची गरज आहे. तसे केल्यास आगीच्या घटनांची जबाबदारी निश्चित करून संबंधितांना दोषी ठरवणे शक्य होईल”, असे चेरिल रेबेल्लो (सीईओ, बियाँड कार्लटॉन) यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. व्यावसायिक इमारतींमध्ये आग लागून मृत्यू होण्याचे सर्वाधिक प्रमाण रूग्णालय व शॉपिंग सेंटर्सचे आहे.

आगीसाठी जबाबदार कोण?

अग्नी सेवा ही तांत्रिकपणे राज्यांच्या अखत्यारित येते. संविधानातील बाराव्या शेड्युलमधील कलम २४३ (डब्ल्यू) नुसार अग्नी सेवा पुरवण्याची जबाबदारी राज्यांवर सोपवण्यात आली आहे. केंद्र सरकारची भूमिका याबाबत सल्लागाराची आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने २०१६ मध्ये नॅशनल बिल्डिंग कोड ऑफ इंडिया प्रकाशित केले होते. त्यानुसार बांधकाम, मेनटेनन्स, इमारत व रचनांची अग्निसुरक्षा यांबाबत मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली होती. ‘नॅशनल बिल्डिंग कोड’च्या २०१६ मधील अहवालात धूर व्यवस्थापन, वेळोवेळी केली जाणारी तपासणी, विजेमुळे लागणाऱ्या आगींना प्रतिबंध, इमारत व्यवस्थापन प्रणाली, आग प्रतिबंधासाठी सेन्सर्स यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे.

LPG गॅस सिलिंडरमुळे घरात आग लागण्याचा धोका?

घरात शॉर्ट सर्किट झाल्यास आग लागण्याची शक्यता असते. शॉर्ट सर्किटशिवाय बहुतांश वेळा आगीचे मुख्य कारण गॅस गळती असते. घरगुती एलपीजी (LPG) सिलेंडरचे अपघात विविध कारणांमुळे होतात. सिलेंडरमधून होणारी गॅसची चोरी, घरगुती सिलेंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करणे, निकृष्ट दर्जाच्या उपकरणांचा वापर करणे तसेच ग्राहकांकडून गॅस सिलेंडर हाताळताना होणारी हलगर्जीही आग लागण्याचे कारण ठरते.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा हवाला देत एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, “या हलगर्जीमध्ये गॅसची नळी वेळोवेळी न बदलल्यामुळे ती खराब होणे, ओ-रिंग्स (O-rings) निकामी होणे, गॅसच्या नळीतून किंवा शेगडीतून गॅसची गळती होणे, आणि इतर कारणांमुळे लागलेल्या आगीच्या प्रचंड उष्णतेमुळे एलपीजी सिलेंडरचा स्फोट होणे, यांसारख्या बाबींचा समावेश होतो.”

घरामध्ये आग लागल्यास मृत्यूची शक्यता का वाढते?

आगीचे दुष्परिणाम अत्यंत घातक असतात. गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या आणि विविध आपत्तींवर लक्ष ठेवणाऱ्या ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थे’ने (NIDM) याबाबत माहिती दिली आहे. “आग तिच्या आसपासच्या परिसरातील ऑक्सिजन शोषून घेते. त्यामुळे आगीच्या दुर्घटनेतील मृत्यू धुरामुळे आणि ऑक्सिजनच्या कमतरतेने दम कोंडल्यामुळे होतात. याशिवाय, आगीत विविध वस्तू जळाल्यामुळे विषारी वायू बाहेर पडतात. त्यामुळे फुफ्फुसांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि बाधितांना श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच, आगीच्या उष्णतेमुळे द्रव, वायू आणि विविध धातूंचे प्रसरण होऊन अनेकदा मोठे स्फोट होतात.” आग विझवण्यासाठी सरकारी यंत्रणांकडे अनेकदा संसाधनांची कमतरता असते. देशातील अग्निशमन दलांकडे आग विझवण्यासाठी संसाधने व आधुनिक उपकरणे असावीत यासाठी १५ व्या वित्त आयोगाने राज्य पातळीवर ५ हजार कोटी रूपयांच्या तरतुदींची शिफारस केली आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या अहवालात काय?

‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थे’च्या (NIDM) मते, शहरी भागातील दाट लोकवस्ती आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या अरुंद व कोंदट रस्त्यांमुळे आगीचा धोका आणखी वाढतो. शहरी भागांत विद्युत उपकरणे आणि यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या उपकरणांसाठी करण्यात आलेली लाइट फिटिंग चांगल्या गुणवत्तेची नसेल तर आगीचा धोका वाढतो. त्यामुळे शहरी भागात आग लागण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. गृह मंत्रालयाच्या एका जुन्या अहवालानुसार (२०२२), “भारतीय शहरांमधील अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांच्या कार्यक्षमतेत मोठी तफावत आहे.” शहरी भागांत झपाट्याने वाढणाऱ्या बहुमजली इमारतींमुळे अग्निशमनासाठी विशेष उपकरणांची खरेदी करणे अत्यंत आवश्यक आहे, मात्र ही प्रक्रिया खूप संथ गतीने सुरू आहे.