How To Keep AC Safe During Summer: सेवा निवृत्त झालेले आयएएस अधिकारी आणि कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष धनेंद्र कुमार यांचा एसीचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांना आहे. दिल्लीतील हौज खास या भागात ही घटना काल (गुरूवार, २८ मे) घडली. उन्हाळ्यात एसीला आग लागून किंवा एसीचा ब्लास्ट होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याच आठवड्याच्या सुरूवातीला गाझियाबादमधील इंदिरापुरम येथे एका रहिवासी इमारतीत पंधराव्या मजल्याला आग लागली होती. एसीचा स्फोट झाल्याने आग लागल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच या महिन्याच्या सुरूवातीला दिल्लीतल्या शाहदरा भागात एका रहिवासी इमारतीत एसीचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला. देशातील शहरी भागांमध्ये उन्हाळ्यात एसीचा स्फोट होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. उन्हाळ्यात तापमानात सरासरीपेक्षा जास्त वाढ होते. त्यामुळे देशात एसीची विक्री वाढते. परंतु, काही गोष्टींची काळजी घेतल्यास अशा दुर्घटना टाळता येतात. एसीचा स्फोट होण्यामागील कारणे काय? एसीमुळे होणारी दुर्घटना रोखण्यासाठी काय करावे? याबाबत जाणून घेऊयात.

एसीला (एअर कंडिशनर) आग का लागते? नेमकं काय होतं?

उन्हाळ्यात विजेवर चालणारी उपकरणे सतत सुरू असतात. त्यामुळे ती उपकरणे प्रचंड तापतात, गरम (ओव्हरहिटिंग) होतात. या उपकरणांचे तापमान वाढण्यास बाहेर असणारे उष्ण वातावरणही कारणीभूत असते. तसेच दुसरे कारण म्हणजे उपकरणाला लागणारा विजेचा प्रवाह मर्यादेपेक्षा अधिक झाल्यास उपकरण जळण्याचा धोका असतो. शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची शक्यता वाढते. विद्युत उपकरणाला आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात विजेचा पुरवठा होत असल्यास ते गरम होते. त्यातील तारा (वायर) वितळण्यास सुरूवात होते. परिणामी त्या उपकरणाला आग लागते.

विद्युत उपकरणावर येणारा विजेचा ओव्हरलोड टाळण्यासाठी एमसीबीचा (मिनिएचर सर्किट ब्रेकर्स) वापर केला जातो. ‘श्नाइडर इलेक्ट्रिक’ (Schneider Electric) वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, एमसीबीमध्ये द्विधातूची पट्टी (बायमेटालिक स्ट्रिप) बसवलेली असते. विद्युत प्रवाह मर्यादेपेक्षा अधिक झाल्यास या पट्टीमार्फत एमसीबीच्या सहाय्याने विद्युत उपकरणाला होणारा वीज पुरवठा बंद होतो. त्यामुळे पुढील अनर्थ टळतो. काही प्रकरणांमध्ये एमसीबीची ही प्रक्रिया वीज पुरवठा खंडित करण्यात अपयशी ठरते. परिणामी उपकरणात शॉर्ट सर्किट होऊन आग लागते. दिल्ली सरकारच्या अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, “जवळपास ६० टक्के आग लागण्याच्या घटना इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट, ओव्हरहिटिंग, ओव्हरलोडिंग, अतिवापर किंवा कमी दर्जाची उपकरणे वापरल्याने होतात. “

इन्व्हर्टर एसी नॉन-इन्व्हर्टर एसीपेक्षा सुरक्षित आहे का?

कोणत्याही एसीमध्ये कम्प्रेसर (बाहेर ठेवला जाणारा, पंखा असलेला बॉक्स) हा सर्वात महत्वाचा घटक असतो. आतील बाजूची गरम हवा बाहेर काढण्यात कम्प्रेसर व रेफ्रिजरंट गॅस महत्वाची भूमिका बजावतो. नॉन-इन्व्हर्टर एसी मध्ये एक फिक्स्ड – स्पीड कम्प्रेसर असते. रूमधील तापमान कमी होण्यासाठी हे कम्प्रेसर वेगाने कार्य करते. निश्चित केलेले तापमान गाठल्यानंतर हे कम्प्रेसर त्याचे कार्य थांबवते. त्यानंतर पुन्हा रूममधील तापमान बदलल्यास हे कम्प्रेसर सुरू होऊन निश्चित केलेले तापमान कायम होईपर्यंत सुरू राहते.

नॉन-इन्व्हर्टर एसी जर दीर्घकाळ सुरू असेल तर त्याच्या आतील यंत्रणा तापते. कम्प्रेसर, कॅपॅसिटर किंवा वायरिंग हे घटक ओव्हरहिट होतात. जर एसी जुना असेल, त्याचे मेनटेनन्स व्यवस्थित ठेवले गेले नसेल तर त्यात शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे एसीचा कधीकधी ब्लास्टही होऊ शकतो. इन्व्हर्टर एसी सतत चालू – बंद होत नाही. त्यामुळे त्याच्यावर कमी ताण येतो. परंतु, तो देखील पूर्णपणे सुरक्षित नसतो. ओव्हरहिटिंगमुळे इलेक्ट्रॉनिक सर्किट बोर्ड, वायरिंगमधील बिघाड, रेफ्रिजरंट लिकेज, पुअर इन्स्टॉलेशन, कमी जास्त होणारे व्होल्टेज किंवा कमी मेनटेनन्स यांमुळे इन्व्हर्टर एसीतही बिघाड होऊन आग लागण्याची शक्यता असते.

एसीमुळे धोका असल्याचे कसे समजते? एसीतून कोणते संकेत मिळतात?

एसीमध्ये बिघाड झाल्यास त्यातून काही महत्वाची लक्षणे दिसून येतात. हायरच्या (Haier) मते, एसीचा आवाज बदलणे, त्यातून कर्कश अथवा आगळावेगळा आवाज येणे, एसी आपोआप चालू अथवा बंद होणे, एसी लावूनही रूम थंड न होणे, एसीमधून धूर किंवा काहीतरी जळाल्याचा वास येणे, असे आढळल्यास एसी दुरूस्त करणाऱ्या तज्ज्ञाला बोलावणे अत्यंत महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत एसी तात्काळ दुरूस्त करून घेणे आवश्यक ठरते. एसीच्या घरातील अथवा बाहेरील उपकरणांना आग लागण्याची शक्यता असते. घरात लावल्या जाणाऱ्या एसीमध्ये इव्हॅपोरेटर (जे हवेतून उष्णता बाहेर काढते), ब्लोअर आणि फिल्टर असते. तर बाहेर कम्प्रेसर (फॅन असलेला बॉक्स) लावले जाते.

एसीला आग लागू नये म्हणून काय काळजी घ्याल?

१) LG च्या मार्गदर्शक तत्वांनुसार, एसीच्या घरातील आणि बाहेरील युनिटचे सर्व वायरींग कनेक्शन्स घट्ट जोडलेले असावेत. केबलची मांडणी योग्य प्रकारे केलेली असावी. कमकुवत कनेक्शन्समुळे उष्णता निर्माण होऊन आग लागण्याचा धोका असतो.

२) सर्किट ब्रेकर आणि फ्यूज चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी.

३) जर तुमच्या भागात विजेचे व्होल्टेज कमी जास्त होत असेल तर स्टॅबिलायझर बसवून घ्यावे. स्टॅबिलायझर तुमच्या AC ला स्थिर विद्युतप्रवाह पुरवून त्याचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतो. इन्व्हर्टर एसीसाठी सहसा स्टॅबिलायझरची गरज भासत नाही.

४) एसी इन्स्टॉलेशन हे केवळ अधिकृत सेवा केंद्रांच्या (authorised repair centres) मदतीनेच केले पाहिजे. एसीची नियमित देखभाल करावी. तसेच एअर फिल्टरवर जमा होणारी धूळ नियमितपणे साफ करावी. कारण त्यावर धूळ जमा झाल्यास हवेचा प्रवाह रोखला जातो आणि एसीवर ताण पडू शकतो.

५) एसीचे तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस दरम्यान ठेवावे. तापमान खूप कमी ठेवल्यास कम्प्रेसरवर जास्त ताण येतो.

६) एसीच्या घरातील युनिटला पाणी लागू देऊ नये.

७) बाहेरील युनिटच्या अगदी जवळ कोणत्याही वस्तू ठेवू नका. युनिटच्या आजूबाजूला सुका कचरा, वाळलेली पाने जमा होऊ देणे धोकादायक ठरू शकते. वाळलेल्या पानांमुळे लहान प्राणी आकर्षित होऊ शकतात आणि ते युनिटच्या आत शिरण्याची शक्यता असते.

८) एसीचा सतत वापर करणे टाळा, तसेच तो वारंवार चालू-बंद करू नका. जर एसीचा वापर दीर्घकाळासाठी केला जाणार नसेल, तर मुख्य पॉवर स्विच (Main Switch) बंद करून ठेवावा.